अडाणी शिक्षित स्त्रिया    सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना दाखवलेला शिक्षणाचा मार्ग आणि स्वातंत्र्याचा कानमंत्र यामुळे त्यांचं जगणं बदलेल, शिक्षणामुळे त्या विचार करू लागतील, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील, स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला लागतील; एवढंच नाही, तर या समाजात त्यांना पुरूषांच्या बरोबरीने स्थान मिळेल, अशी स्वप्नं गेली काही वर्षे आपण पहात आहोत. पण, तरीही वर्तमानपत्रांतून रोज तिच्यावरच्या अत्याचाराच्या वेगवेगळ्या बातम्या येताहेत. यावरून हेच सिध्द होतं की, स्त्रीला अजूनही केवळ मादी समजणार्‍या समाजाची मानसिकता बदललेली नाही. पुरूषाची मानसिकता ज्या प्रमाणात शिक्षणामुळे बदलायला हवी होती त्या प्रमाणात बदलली नाही, हे सत्य तर आहेच. पण, स्त्रीची मानसिकता तरी कुठे बदलली आहे? स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिला कळला आहे का? परंपरा आणि संस्कृतीचा नेमका काय अर्थ लावताहेत त्या?
    आज कार्पोरेट क्षेत्रात लिलया वावरणारी स्त्री जेव्हा मार्गशीर्षातले गुरुवार भक्तीभावाने करते, आपल्या जगण्यातून खास वेळ काढून वटसावित्रीला वडाची पूजा करून त्याला दोरा गुंडाळते, हळदीकुंकू करते वा विज्ञान शिकवणारी शिक्षिका ‘नेमकी पाळी आल्यानं या वेळचा गुरुवार करता आला नाही’ अशी तक्रार करते, महाविद्यालयीन प्राध्यापिका आठवड्याचे रंग व ग्रहाप्रमाणे ठरवून त्या त्या वारी त्या विशिष्ट रंगाचे कपडे घालून येतात, तेव्हां आपण कोणत्या काळात आहोत, हेच कळत नाही.
    ...तर नवश्रीमंत वर्गातील मुली या फॅशन, मुक्तपणे फिरण्याची मुभा व पार्टीज् करायला मिळणं म्हणजेच स्वतंत्र होणं, असं समजायला लागल्या आहेत. मध्यमवर्गातील मुली या सगळ्या पलिकडे जाण्याचा प्रयत्न करताहेत. परंतु, त्यांच्या आईवडिलांनी जे तथाकथित परंपरेचं स्वरूप त्यांना सांगितलं आहे, त्यात अडकून द्विधा मनस्थितीत पडल्या आहेत. म्हणजे हॉट पँट घालून बीचवर जायचं आणि नऊवारी नेसून, नथ वगैरे घालून मंगळागौर आणि सत्यनारायण करत आपण आधुनिकता आणि परंपरा दोन्हीची छान सांगड घालू शकतो, असा आभास निर्माण करून आत्मानंदात मश्गुल व्हायचं, असं काहीसं झालं आहे.
    मला वाटतं, आजच्या आधुनिक होणार्‍या मुलींनी परंपरांचे अर्थ समजून घेण्याची गरज आहे. आता त्यांनी या कर्मकांडातून बाहेर यायला हवं. व्रतवैकल्याच्या जंजाळातून स्वत:ला सोडवायला हवं. बाईला येणारी पाळी हा निसर्गधर्म आहे व त्याचा शुध्द-अशुध्दतेशी तसेच शुभ-अशुभाशी काही संबंध नाही, हे समजून घ्यायला हवं. बलात्कार करणारा दोषी असतो. जिच्यावर झाला आहे ती नाही, हे लक्षात घ्यायला हवं. बाईसाठी तयार केलेल्या पावित्र्याच्या आणि योनीशुचितेच्या भ्रामक कल्पनांतून तिने स्वत:ला सोडवायला हवं.
    स्त्रीत्वाचा खरा अर्थ जाणून घेतला तर कदाचित स्त्रिया स्वत:ला सापडूही शकतील. पण, जर का त्या समाजाच्या पारंपारीक चौकटीत अडकून पडल्या, तर अधिकाधिक आधुनिक अंधश्रध्दा निर्माण करत रहातील. बायकांना या चौकटीत जखडून ठेवण्याचा डाव स्मृर्तीकारांनी फार पूर्वीच खेळला आहेच. पण आता त्यातून बाहेर पडायची वेळ आली आहे. त्यासाठी स्त्रियांनी आता खर्‍या अर्थाने बहुश्रुत व्हायला हवं. जर वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली नवी पिढी घडवायची असेल, तर प्रथम स्वत: त्यातून बाहेर पडायला हवं.
    प्रत्येक व्रतवैकल्य स्त्रीनेच पतीसाठी का करावं? पतीने पत्नीसाठी करायचं एकही व्रत आपल्या संस्कृतीत का नाही? यातच आपल्या संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम स्थान दिल्याचं दिसते. त्यांना अज्ञानी ठेवून धार्मिक कर्मकांडात त्यागभावना मिसळून emotional blackmail करण्याचे हे कारस्थान पुरुषी वृत्तीचे निदर्शक आहे. हे बदलायाचे असेल तर पुरूषांनीच पुढाकार घेतला पाहिजे. तेव्हां, पुरुषांनी आपल्या पत्नीला कुंकू, मंगळसूत्र, हळदीकुंकू, सवाष्णी, व्रते, उपासतापास यापैकी कशाचीच बळजबरी करू नये आणि आपल्या मुलीलाही या गोष्टी (हौसेनेसुद्धा) करायला लावू नये. ज्या स्त्रियांना ही पारंपारिक गुलामगिरी मान्य नाही, त्यांनी अशा प्रथा वैयक्तिक वागण्यातून सरळसरळ बंद कराव्यात. हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांना ‘स्नेह संमेलन’ म्हणायला हरकत नाही. अशा प्रसंगी सवाष्ण-विधवा असा भेदभाव न करता, सर्व स्त्रियांना बोलवावे व योग्य तो सन्मान करावा आणि आपल्या मुला-मुलींवर पण हेच (समानतेचे) संस्कार करावेत. ज्या स्त्रियांना नवर्‍यामुळे, सासूमुळे किंवा इतर कौटुंबिक दडपणामुळे गुलामगिरी झुगारता येत नसेल, त्यांनी स्वतःशी एक शपथ घ्यावी, की मी माझ्या मुलीवर गुलामगिरी नाकारण्याचेच संस्कार करेन, माझ्या मुलामध्ये स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून वागवण्याचे गुण रुजवेन आणि सुनेलासुद्धा वैचारिक मोकळीक देईन. तिने परंपरांतून बाहेर येण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांना सासू म्हणून माझी खंबीर साथ असेल... आणि मला विश्वास आहे, की बदल आता लगेच नाही घडला, तरी भविष्यात नक्कीच फरक पडेल. स्त्रियांनी यावर विचार करावा.
    म्हणून खेदाने म्हणावेसे वाटते, की स्त्री स्वातंत्र्याची चळवळ आजच्या नव्या स्त्रीला खरंच कळली आहे? ती तिच्यापर्यंत पोहोचली आहे का? आधुनिकतेचा खरा अर्थ तिला समजला आहे का? की, तो केवळ बदललेला पोशाख, राहणीमान आणि बोलण्या-चालण्यात आलेला चमकदारपणा इथवरच सिमीत झाला आहे? एकविसाव्या शतकातील १७ वर्षं उलटून गेली. गेली १००-१२५ वर्षे स्त्रीप्रश्न, स्त्रीशोषण, स्त्रीजाणिवा, स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीवाद यांसारख्या शब्दांची जडीबुटी उगाळून उगाळून स्त्री-पुरुष दोघांनाही पाजली. पण काही अपवाद वगळता तिच्या जगण्यात विशेष फरक झाल्याचं दिसत नाही. पुरुषांची मानसिकता ज्या प्रमाणात अपेक्षित होती त्या प्रमाणात बदलली नाही हे सत्य आहेच; पण स्त्रीची मानसिकता तरी बदलली आहे का? स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिला कळला आहे का? आपल्याकडच्या ८० टक्के स्त्रिया आजही धार्मिक कर्मकांड आणि व्रतवैकल्यातच अडकल्या आहेत. त्यात शिक्षिकांची संख्याही खूप मोठी आहे. नवी पिढी घडवायची असेल, तर त्यांनी स्वत:च त्यातून बाहेर यायला हवं.

~जगदीश काबरे

Leave your comment