बेबी नव्हे, बाळ !    ती एक विमलबाई. वय फार तर २५ वर्षांचं. खेड्यात राहणारी. तिला एक मुलगी, सात वर्षांची. पहिलं बाळंतपण घरीच दाईनं केलेलं. ती माझ्याकडे आली ती काही तक्रार घेऊन. गर्भाशय खाली सरकलं होतं. मी तपासलं आणि ऑपरेशन करवून घेण्याचा सल्ला दिला. खेड्यातली माणसं ऑपरेशनसाठी चट्कन तयार होत नाहीत. ही गोष्ट साधारणत: १९९५ ची. गोळ्याच द्या, असा दोन-चार वेळा आग्रह करून गेली. काही महिन्यानंतर आली. ऑपरेशन झालं. सगळं व्यवस्थित झालं. गर्भाशय खाली सरकल्यामुळे तिला गर्भधारणा होत नव्हती आणि त्रासही खूप व्हायचा. त्रास बंद झाल्याने ती खूष होती. ऑपरेशननंतर एकदा येऊन गेली. मग थेट तीन वर्षांनंतर आली, तर दोन महिन्यांची गर्भवती होती. खूप आनंदात होती. मी तेव्हां नुकतंच सोनोग्राफी मशीन घेतलं होतं. मलादेखील सोनोग्राफी करताना नवा आनंद वाटत असे. उत्साहाने मी तिची सोनोग्राफी केली. औषधं दिली. ती परत गेली. गर्भ चार महिन्यांचा झाल्यावर पुन्हा आली. पुन: सोनोग्राफी केली. माझ्याकडे दोन-तीन शिकाऊ डॉक्टर होत्या. त्यांना मी सोनोग्राफीतलं सगळं दाखवत, शिकवत होते.
    ‘हे बेबीचे हात, पाय, हे बेबीचं स्पाईन, हे हेड...’ असं त्यांना सांगत होते. शेजारीच पेशंटची आजीही होती. तीदेखील कुतुहलाने पाहत होती. सोनोग्राफी पूर्ण केली. तिला म्हटलं, ‘सगळं छान आहे, बेबीची वाढ वगैरे चांगली आहे.’ ती घरी गेली. असंच वर्ष निघून गेलं. रोजच्या कामाच्या रगाड्यात मी तिला विसरून गेले. एक दिवस तिच्याच गावची एक बाई आली तेव्हां मला तिची आठवण आली. मी विचारलं, ‘काय गं, विमलबाई आलीच नाही बाळंतपणाला. कुठं झालं तिचं बाळंतपण?’ तर तिनं सांगितलं, ‘सरकारी दवाखान्यात गेली होती. मुलगा झाला होता तिला. पण, जन्मल्यानंतर दोन-चार तासांनीच गेला तो.’
    मला खूपच वाईट वाटलं तिचं बाळ गेलं हे ऐकून. पूर्ण सत्य तर अजूनच विदारक होतं; जे मला आजदेखील विसरता येत नाही. झालं असं होतं, की ऑपरेशननंतर मी तिला व तिच्या नवर्‍याला सांगितलं होतं, आपण गर्भाशयाला वर सरकवण्याची शस्त्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे, नैसर्गिक प्रसूतीत गर्भाशयावर आणि गर्भाशयमुखावर ताण येईल. ती गर्भवती राहिल्यावर आपण दिवस पूर्ण भरले नि बाळाची पुरेशी वाढ झालेली दिसली, की नियोजन करून सिझेरीयन करू. सर्वांनीच या गोष्टीला संमती दर्शवली होती. परंतु, चौथ्या महिन्यात जेव्हा ती व तिची आजी आल्या होत्या तेव्हां सोनोग्राफी करताना मी माझ्याकडील डॉक्टरना सोनोग्राफीत बाळ दाखवताना बेबीचे हात, पाय वगैरे असे शब्द वारंवार उच्चारत होते. आम्ही सगळे डॉक्टर बाळाला ‘बेबी’च म्हणत असतो. आमच्या पाठ्यपुस्तकांमध्येदेखील बाळाबद्दल लिहिताना ‘बेबी’ असाच शब्द वापरलेला असतो. परंतु, साधारणत:  १९९०-१९९१ नंतर गर्भलिंगनिदानाचे वाईट पेव फुटलेले होते. गर्भजल तपासणी करून अनेकजण मुलगी बाळाला जन्मूच देत नव्हते. कितीतरी मुली (गर्भापात केल्यामुळे) जन्मण्यापूर्वीच देवाघरी जात होत्या. पुढे साधारणत: १९९८ पासून सर्व डॉक्टरांकडे सोनोग्राफी मशीन आल्या आणि चौथ्या महिन्यात गर्भलिंगनिदान केलं जाऊ लागलं. गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा होता. परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नव्हती.
    मी तर अगदी माझा दवाखाना सुरू केल्या दिवसापासूनच मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी, तीला आनंदाने स्वीकारण्यासाठी पेशंटचं प्रबोधन करत असे. या विमलबाईची सोनोग्राफी करताना ‘बेबी’ हा शब्द उच्चारण्यामागे वेगळा काहीच हेतू नव्हता; असण्याचं कारणदेखील नव्हतं. माझ्याकडच्या शिकाऊ डॉक्टरना मी उत्साहाने शिकवत होते. त्याचं कारण इतकंच होतं, की सोनोग्राफी मशीनने बाळाची तपासणी करण्याचं प्रशिक्षण मी नुकतीच घेऊन आले होते. मशीनही नवंच होतं आणि काहीतरी नवं शिकल्याचा तो उत्साह होता. माझ्या ‘बेबी बेबी’ उच्चाराने त्या विमलबाईने व तिच्या आजीने असा तर्क काढला, की गर्भात मुलगीच आहे. माझ्यासमोर त्या काही बोलल्या नाहीत. परंतु, घरी जाऊन त्यांनी असं ठरवलं, की एवीतेवी मुलगीच आहे, तर सिझेरीयन कशाला आणि खाजगी दवाखान्याचा खर्च तरी कशाला? सबब त्या पुन्हा माझ्याकडे फिरकल्याच नाहीत. प्रसूतीसाठी तिला सरकारी दवाखान्यात नेलं तेदेखील उशीरा. पहिलं बाळंतपण जसं घरीच केलं होतं, तसंच त्यांनी घरीच दाईकरवी भरपूर प्रयत्न केले. पण, उशीर होऊ लागल्यावर दाईने सांगितलं, की अवघड वाटतंय; तेव्हां मंडळी सरकारी दवाखान्यात गेली. प्रसूती झाली. पण, बाळाची प्रकृती नाजूक झाली होती. प्रयत्न करूनदेखील डॉक्टर त्या बाळाला वाचवू शकले नाहीत. त्या पेशंटला आणि त्या घरातील सगळ्यांना धक्का याचा बसला होता, की ते बाळ मुलगा होतं. हे सगळं सविस्तर कळालं, तेव्हां मला चीड, निराशा, हतबलता आणि कीव येणं या सगळ्या भावनांचं एक विचित्र मिश्रण अनुभवायला आलं. प्रचंड सुन्न झालं माझं मन. सोनोग्राफी करताना माझ्याकडील शिकाऊ डॉक्टरना सांगतांना मी उच्चारलेला तो ‘बेबी’ शब्द! तो शब्दच- त्या बाळाचे प्राण घेऊन गेला होता! म्हणजे, माणसं खरोखर जे ऐकतात, ते तरी कितपत सत्य असतं? त्या पेशंटच्या आणि आजीच्या मनात त्यावेळी हेच विचार चालू होते, की हा गर्भ मुलाचा असेल की मुलीचा? त्यामुळे, माझ्या ‘बेबी’ शब्द उच्चारण्याने त्यांनी त्यांना अभिप्रेत होता तोच अर्थ काढला. तिला आधीची एक मुलगी होती त्यामुळे आता तिला पुन्हा मुलगी नको होती. शिवाय, मी असं सांगितलं होतं, की आपण आता गर्भाशयाचं ऑपरेशन केलं आहे, त्यामुळे यावेळी सिझेरीयन करूया. मुलीसाठी सिझेरीयन? त्यांना ते नको होतं. म्हणून त्यांनी माझ्याकडे येणं टाळलं. मी त्यांना सिझेरीयनचाच सल्ला दिला असता. हे मुलगी, बेबी वगैरे तर माझ्याकडे बोलणं शक्यच नव्हतं. मी मुलगा-मुलगी समानतेचा पुरस्कार करते. मुलगी नको म्हणणार्‍यांना रागावते, हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. त्यांच्या भाषेत- ‘‘किन्हाळकरबाईला तसलं काही पटत न्हाई. त्या लई रागावत्यात.’’
    म्हणून त्यांनी सरकारी दवाखाना निवडला. तेही ठीक होतं. पण त्यांनी घरी फार अमूल्य वेळ वाया घालवला. त्यामुळे बाळ गेलं. त्यांना वाटत होतं, मुलगी आहे. पण मुलगी आहे म्हणून ही अशी दिरंगाई? अशी बेफिकीर प्रवृत्ती? माझं मन फार निराश झालं होतं. त्या लोकांना ‘मुलगा गेला’ याचंच वाईट वाटत होतं आणि हे माझ्यासाठी अधिकच क्लेशकारक होतं. बाळ गेलं- मूल गेलं या दु:खापेक्षा मुलगा होता, तो गेला; याचंच वाईट जास्त?! माझ्या वेदनेची तर्‍हा वेगळी होती. मुलगी आहे असा समज त्यांनी करून घ्यावा आणि म्हणून खाजगीतला खर्च टाळावा, दिरंगाई करावी... मुलगी किती नकोशी असते? या विमलबाईच्या घटनेनंतर मी नंतर पेशंटना प्रखरतेनं मुलीच्या जन्माचं स्वागत करा, मुलीला नाकारू नका- हे सगळं सांगू लागले. गर्भलिंगनिदान करून मुलीची विल्हेवाट लावण्याच्या प्रवृत्तीविरूद्ध लिहू लागले, बोलू लागले. 
    आजदेखील मी विमलबाईला विसरू शकत नाही. पुन्हा ती कधीच माझ्याकडे आली नाही. पुढं तिला किती मुलं/मुली झाले माहित नाही. परंतु, तेव्हापासून मी सोनोग्राफी करताना कोणत्याच नातेवाईकाला आत येऊ दिलं नाही आणि पेशंटशीदेखील ‘बेबी’ शब्द न उच्चारता बाळ असा शब्द वापरते, बोलते. या गोष्टीला आता वीस वर्षं झाली. गर्भलिंगनिदानाचा कायदा सर्वांना ठाऊक झालाय. अंमलबजावणी काटेकोर होतेय. तरीही चोरूनलपून गोष्टी चालतात, हे स्पष्टपणे जाणवतं. वाईट वाटतं. कायदा असला, तरी न्यायदेवता आंधळी असते. पुरावे सापडत नाहीत. अगदी अलीकडच्या काळात एक वेगळा, पण तरीही बोचणारा अनुभव आला. 
    खूप ओळखीतली पेशंट. घरगुती संबंध असणारी. पहिली मुलगी. आता दुसरी गर्भधारणा- पूर्वीचं सिझेरीयन- आतादेखील नियोजन करून सिझेरीयन केलं. सिझेरीयनपूर्वी मी सोनोग्राफी केली. ‘सगळं छान आहे’ असं उच्चारलं. ती म्हणाली, ‘कधी करता सिझेरीयन? शुक्रवारी’ मी म्हणाले, ‘गुरूवारी करू’. (कारण मला शुक्रवारी जरा दुसरी कामं होती) झालं! गुरूवारी सिझेरीयन केलं. मुलगा झाला. ‘आनंदी आनंद गडे...जिकडे तिकडे चोहीकडे’ असं त्या लोकांना झालं. सगळं नीट झालं व आठवड्याने ती घरी गेली. महिन्यानंतर पुन्हा आली. म्हणाली, ‘मॅडम बाळाचं नांव सुचवा ना. तुम्ही त्या दिवशी म्हणाल्या ना, गुरूवारी करू सिझेरीयन, शुक्रवारी नको. तेव्हांच मी ओळखलं, मुलगाच असणार. मुलगी असती तर तुम्ही शुक्रवारी केलं असतं ना, सिझेरीयन.’ मी उभी होते. मट्कन खुर्चीत बसले. काय हे? आता कोणत्या भाषेत पेशंटशी बोलावं? जी माणसं मला जवळून ओळखतात, त्यांना जर असं वाटत असेल, की मी या गोष्टी अशा अप्रत्यक्ष सूचक बोलून सांगते, तर याहून माझा मोठा अपमान काय असू शकतो? मी त्या पेशंटला म्हणाले, माझ्या बोलण्याचा असा वाईट अर्थ काढू नकोस. मला शुक्रवारी दुसरी कामं होती, म्हणूनच केवळ मी गुरुवार म्हणाले. तर पुढे तिचं उत्तर- ‘वाईट काहीच नाही ना मॅडम- सगळे किती खूष आहेत मुलगा झाल्याने!’ म्हणजे माझं बोलणं, त्यातला अर्थ, माझी तळमळ कशाबद्दल आहे, हे तिच्या गावीही नव्हतं..! तिच्या बोलण्यात केवळ मुलाचा आनंद ओतप्रोत भरलेला होता. प्रचंड हरल्यासारखं वाटतं अशावेळी. गेली चोवीस वर्षं समाजाच्या मनातून मुलाचा वेडा, अतिरेकी अट्टाहास काढून टाकावा यासाठी मी माझी वाणी, लेखणी झिजवत असते. मी स्वत: एका मुलीवरच माझं कुटुंब मार्यादित ठेवलं. पण आजदेखील असे प्रसंग घडतात आणि मला हतबल, एकाकी वाटत राहतं...

~डॉ. वृषाली किन्हाळकर

Leave your comment