शुष्क... तरीही स्वादिष्ट !    नात्यांमधला प्रेमाचा ओलावा हरवला, की नाती तुटत जातात. माणूस भावनेपासून दूर गेला, की कोरडा होत जातो. स्पर्शामधून आपुलकीची भावना जाणवली नाही, तर तो स्पर्शही अगदी कोरडा वाटतो. हा ओलावा निसर्गात भरून राहिलेला असतो म्हणून तर सर्वत्र चैतन्य असतं. निसर्ग उद्या कोरडा झाला, तर आपल्याला चालणार नाही. परंतु, असं कोरडं होताना त्यातला गोडवा टिकवून ठेवणं शक्य आहे, हे पुण्याच्या नेहा घावटे यांनी सिद्ध केलंय. फळं व भाज्या कोरड्या करून किंवा डिहायड्रेट करून (शुष्क करून) त्यांनी बाजारात आणल्या आहेत. हा व्यवसाय करणं सहजशक्य आहे, हे त्यांच्याशी गप्पा मारल्यावर जाणवलं. 
    त्या सांगत होत्या, ‘माझे वडिल दत्तात्रय घावटे हे शेती आणि आई निलीमा घावटे नोकरी करते. आमच्या शेतात आम्ही वेगवेगळी पिकं घेतो. त्यामुळे, शेती आणि शेतीतून मिळणारं उत्पन्न मी लहानपणापासूनच पाहात आली आहे. रसायनशास्त्रात बीएससी केल्यानंतर पुढे काय करायचं, कोणतं करिअर निवडायचं, असा विचार करत असताना माझं लक्ष शेतीकडे गेलं. शेतीचा वापर करून काहीतरी करावं, असं वारंवार मनात येत होतं. आईनं छोट्या प्रमाणात भाज्या डिहायड्रेट करून त्यांची पावडर करून, वाया जाणारा शेतमाल वाचवायचा प्रयत्न सुरू केला होताच. तोच आदर्श माझ्यासमोर होता. त्या दरम्यान मी राहुरी कृषी विद्यापीठातून दोन महिन्यांचा ‘अन्नप्रक्रिया तंत्र’ किंवा ‘फूड प्रोसेसिंग’ हा कोर्स पूर्ण केला. या कोर्समध्ये आम्हाला फळांपासून शीतपेय तयार करणं, अन्न टिकवणं यांसारखे अभ्यासक्रम शिकवले होते. त्यामुळे, नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करायचा, हे मी ठरवलं. अन्नप्रक्रियेशी संबंधित उद्योग करायचा असंही मनाशी ठरवलं. परंतु, मला फळांची सरबतं किंवा त्यांचा संपृक्त अर्क (कॉन्सन्ट्रेट) तयार करायचा नव्हता. कारण, तो टिकवण्यासाठी टिकवण किंवा प्रिझर्व्हेटिव्ह घालावं लागतं. कोणतंही प्रिझर्व्हेटिव्ह न घालता काय करता येईल, याचा विचार करताना भाज्या, फळं शुष्क (डिहायड्रेट) करता येतील, अशी कल्पना मला सुचली. मग मी आईच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊन व्यवसाय वाढवायचं ठरवलं.’
    नेहाताईंना ही कल्पना सुचल्यावर त्यासाठी त्यांनी तत्काळ प्रयत्न सुरू केले. तुम्हाला आठवत असेल, आपण सर्वांनी शालेय वयात दोन टिपकागदांच्यामध्ये गुलाबाची पाकळी, जास्वंदाचं फूल, सोनचाफ्याचं फूल ठेवून त्यावर दोन-चार वह्या ठेवून ते वाळवलं आहे. तसा एक प्रकल्पच आपण प्रत्येकाने त्या वयात केला होता. 
    भाज्या किंवा फळं शुष्क करणं म्हणजे असंच काहीतरी आहे का, असं विचारल्यावर नेहाताई म्हणाल्या, ‘या व्यवसायाची कल्पना सुचायचं कारण झाला पुदिना. आपण प्रत्येकजण ताजा-टवटवीत पुदिना बाजारातून विकत आणतो किंवा परसातून तोडून आणतो. त्यातला थोडासा आपण वापरतो आणि बाकीचा नंतर वापरण्यासाठी ठेवतो. परंतु, बर्‍याचदा हा उरलेला पुदिना सडून जातो, वाया जातो. त्याऐवजी हाच पुदिना वाळवून ठेवला तर तो केव्हाही पुन्हा वापरता येतो. या विचारातून पुदिन्याची पावडर करून पाहिली. अर्थात त्यासाठी काही यंत्रांची आवश्यकता होती. त्याविषयी काही लोकांशी बोलून, माहिती घेऊन तशी यंत्रं तयार करवून घेतली. उद्योग सुरू करायचा ठरवल्यावर जागेचा प्रश्‍न आला. सुदैवाने आमचं घर, शेती अशी जागा हातात होती. घरचीच शेती, विहीर, घर त्यामुळे बाहेर कुठें शोध घ्यावा लागला नाही. शेतीमुळे कच्चा माल घरातच उपलब्ध होता. शेतमाल नाशवंत असतो. त्यामुळे, तो बाजारात पोहोचायला उशीर झाला, की सगळी मेहनत वाया जाण्याचा धोका वाढतो. शिवाय बाजारभाव चांगला मिळाला तर ठीक. भाव नेमका त्याच दिवशी पडलेला असेल, तर उत्पन्न कमी येण्याचा धोका. थोडक्यात काय, शेतीतून मिळणारं उत्पन्न हे भरवशाचं नाही हे लक्षात यायला लागलं होतं.’ 
    २०१४ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या प्रयत्नाला उद्योगाचं स्वरूप आलं ते २०१५ मध्ये. ‘नॅचरल अ‍ॅग्रो’ या ब्रँडने नेहाताईंच्या वाळवलेल्या भाज्यांच्या पावडरी, तुकडे तसंच फळांचे वाळवलेले काप बाजारात येऊ लागले. त्यासाठी त्यांनी लघुउद्योग म्हणून या उद्योगाची नोंदणी करवून घेतली. फूड लायसन्स घेतलं. हा उद्योग अन्नप्रक्रिया उद्योग असल्याने सरकारने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करणं आवश्यक होतं. त्याप्रमाणे त्यांच्या युनिटमध्ये वायुवीजन (व्हेन्टिलेशन) राखण्याची योजना केली. वाळवण्यासाठी निवडलेल्या भाज्या किंवा फळे धुण्यासाठी विहिरीच्या किंवा कूपनलिकेच्या (बोअरवेल) पाण्यापेक्षा शुद्ध पाणी वापरण्याचा आग्रह धरत आरओ सिस्टिम बसवली. मेथी, पुदिना, कारलं, बीट, कढीपत्ता, शेवगा, तुळस अशा २१ प्रकारच्या पावडरी त्या तयार करतात. शिवाय जांभूळ, अननस यासारख्या फळांचे वाळवलेले तुकडे त्या तयार करतात. भाज्यांमध्ये वर्षभर वापरता यावेत यासाठी कांदा, लसूण यांचे फ्लेक्सही बनवतात. त्यांच्या या उद्योगाला ‘आयएसओ ९००१’ हे प्रमाणपत्र मिळालं आहे. फूडलॅबमध्ये गुणवत्तेचं परीक्षण होऊनच या शुष्क भाज्या व फळे विक्रीसाठी बाजारात पाठवली जातात.
    शेतीचं महत्त्वही मला पटलेलं आहे. मात्र, हे महत्त्व टिकवून ठेवायचं असेल तर त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी. शेतीपूरक उद्योग तयार करून शेती टिकवायला हवी. उद्योग सुरू करण्यासाठी आम्हाला आमच्या आवारात शेड बांधावी लागली. यंत्रसामग्री घ्यावी लागली. त्यासाठी जवळपास २५ ते ३० लाख रुपये खर्च आला. हा खर्च वडिलांनीच केला. परंतु, आता उद्योगाचा पसारा वाढतोय; त्यासाठी आम्ही वित्तसंस्थांना कर्जाच्या मागणीचा प्रस्ताव दिला आहे. शेतीला पूरक म्हणून असा उद्योग प्रत्येकाला सुरू करता येईल. आता सरकारने क्लस्टर संकल्पना विकसित केली आहे. त्यामुळे, बचतगटांतल्या महिलांना एकत्र येऊन आर्थिक मदत घेता येते. त्यातूनही हा उद्योग करता येईल. शिवाय स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया याअंतर्गतही वित्तपुरवठ्याची व्यवस्था करता येईल. 
    नेहाताई व त्यांच्या आई यांनी उभारलेल्या उद्योगाला कच्चा माल त्यांच्या घरच्या शेतीतून मिळतो ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. त्यामुळे, हा माल अत्यंत ताज्या स्वरूपात त्यांना मिळतो. त्यांच्याकडे गायी आहेत. त्यामुळे त्यांचं शेण हेच शेतीसाठी खत म्हणून वापरलं जातं, ज्यामुळे सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या शुद्ध भाज्या ग्राहकाला वाळवलेल्या स्वरूपात मिळू शकतात. घरच्या शेतामध्ये त्यांचे वडील या उद्योगासाठी लागणारी गवती चहा, मेथी, कारले, अंबाडी यासारख्या भाज्यांची लागवड वाफे तयार करून करतात.
    अंबाडीला वाढती मागणी आहे. त्यामुळे, केवळ अंबाडीची पावडर न करता आम्ही अंबाडीचे फ्लेक्स तयार करतो, जेणेकरून ते पाण्यात भिजत घालून त्यापासून गृहिणींना लगेच पातभाजी तयार करता येईल. नोकरी करणार्‍या गृहिणी, ज्येष्ठ नागरिक गृहिणी यांचे श्रम यामुळे मोठ्या प्रमाणावर वाचले आहेत. अनेक हॉटेलना कांद्याचे वाळवलेले फ्लेक्स, लसणाच्या वाळवलेल्या पाकळ्या वर्षभर लागतात. काहीवेळा विशिष्ट मसाल्यांमध्येही यांचा वापर केला जातो. त्यामुळे त्यांचीही खूप मागणी आहे. 
    आज ‘नॅचरल अ‍ॅग्रो’ने दुबईत भरारी घेतली आहे. आपण सर्वचजण भाज्या आणतो, साफकरतो, खातो. काही भाज्या आपण परंपरागत पद्धतीने वाळवूनही ठेवतो. या परंपरेला शास्त्राची जोड दिली, तंत्रज्ञानाची जोड दिली तर त्यातून एक व्यवसाय उभा राहू शकतो. यामुळे उद्योजक झाल्याचं मोठं समाधान आपल्याला मिळतंच; शिवाय आपण अनेकजणांना रोजगारही देऊ शकतो. नेहाताई व त्यांच्या आई निलिमा घावटे यांच्या प्रयत्नांतून हेच सिद्ध होतं.

~वृषाली वझे

Leave your comment