कुटुंबसंस्था : ताकद, की कमजोरी? ‘‘अहो ताई, खरं सांगू का, आमचं घर लहान आणि घरात १० माणसं... एवढा किलकिलाट असतो ना! सगळ्यांना टीव्हीवर एकाच वेळी वेगवेगळे कार्यक्रम बघायचे असतात. मुलांना सतत कार्टून, माझ्या हिला आणि आईला त्या रोजच्या सीरिअल बघायच्या असतात, भाऊ आला की त्याला जेवताना बातम्या बघायच्या असतात, माझ्या आवडीचा एखादा सिनेमा लागला असेल तरी तो बघता येत नाही. त्यामुळं घरामध्ये सतत चिडचिड. कधी कधी खरंच असं वाटतं की घरी येऊ नये. उशीर झाला की मग परत बायकोची कटकट! वैताग आलाय नुसता! काय करू कळत नाही.’’
    ‘‘समीर, तू आता २७ वर्षांचा झालास, आता तुझ्या लग्नाचं बघायला हवं. मला सून अगदी सालस आणि सोज्वळ हवी. तिने माझं सगळं ऐकायला हवं, माझ्यासारखं घर कसं सांभाळायचं हे शिकायला हवं, माझी सेवा करायला हवी.’’ समीर पेचात पडला. आपल्याला पसंत पडलेल्या मुलीने हे सगळं केलंच नाही तर? आयुष्यभर माझी आई तिचा दु:स्वास करेल आणि परिणामी माझ्यात आणि बायकोमध्ये कायमचं अंतर पडेल. जाऊ दे, त्यापेक्षा मी लग्नच नाही करत. 
    ‘‘आई, अगं या घरात कोणी एकमेकांशी बोलतच नाहीत. आपण आपल्याकडे जेवताना किती बोलायचो. सतत तो टीव्ही चालू असतो. सासू-सासरे आपापसात भांडत असतात. मग एकमेकांशी अबोला धरला जातो. घरामध्ये सगळीकडे शांतता! मला खूप आठवण येते तुमची. इथे रहावसं वाटत नाही.’’ लग्नाला ६ महिनेच उलटले होते आणि इथे सून आणि सासू-सासर्‍यांच्या नात्यामधली आपुलकी संपत चालली होती.
    ‘‘अगं, तू नवर्‍याशी बोलून बघ. आपण सगळे शाळेतील मित्र-मैत्रिणी तर आहोत. का नाही म्हणेल?’’ ‘‘नाही गं, तुला आमचे ‘हे’ नाही माहिती. मी माझ्या कुठल्याही मैत्रिणीबरोबर गेलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. सकाळी ते उठायच्या आधी चहा तयार लागतो आणि संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर हातात गरम चहाचा कप नसेल तर ह्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. मला खूप दाबून ठेवलं जातं गं! स्वतःहून काही करायचं स्वातंत्र्य नाही. ह्यांना विचारा आणि त्यांच्या परवानगीने करा.’’ 
    काय म्हणता, अशी बरीच उदाहरणं तुम्ही ऐकली आहेत किंबहुना काही तुमच्या घरात घडली आहेत असं वाटलं? यातील काही उदाहरणांमध्ये सासू-सून भांडणं आहेत, काही नवर्‍याच्या वर्चस्वाला वैतागली आहेत, काहींना सासरच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला त्रास होतोय, तर काही घरांमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमुळे निर्माण झालेला पेच डोकावत आहे. अशा अनेक समस्या हल्ली समाजाला भेडसावत आहेत. भारताची एकत्र कुटुंबपद्धती जी काही वर्षांपूर्वी प्रचलित होती, जिचा सगळ्यांना अभिमान होता, त्याच कुटुंबपद्धतीचा आता जाच वाटत आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. घरातल्या प्रत्येक माणसाला स्वतःची वेगळी एक स्पेस हवी आहे; म्हणजे व्यक्ती-स्वातंत्र्य जपण्यावर हल्ली जास्त भर दिला जात आहे, मग त्यासाठी जेष्ठ आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायलाही मागे-पुढे बघितले जात नाही.
    मुळात आपण आपल्या पालकांबद्दल, आपल्या जोडीदाराबद्दल, आपल्या मुलांबाबत सदैव नाखुश किंवा असमानाधी असू तर हे प्रॉब्लेम्स शेवटच्या थरापर्यंत जातात आणि याचंच रुपांतर बहुतांश वेळा घटस्फोटात होतं. आई-वडिलांच्या सततच्या भांडणाचा परिणाम मुलांच्या आत्मविश्वासावर होतो. जोडीदाराबरोबरच्या भांडणातून उदासीनता येऊ शकते. घरामध्ये जर सून नवीन वातावरणाशी आणि सासू-सासरे नवीन सुनेशी जुळवून नाही घेऊ शकले तर घरामध्ये अशांतता प्रस्थापित होते. याचा परिणाम थेट पती-पत्नीच्या वैवाहिक आयुष्यावर होऊ शकतो. पुढे त्या विफलतेमधून नशा करणे किंवा दररोज दारू पिण्याचे, सिगरेट ओढण्याचे प्रमाण वाढत जाते. तसेच, विवाहबाह्य संबंध किंवा जोडीदाराकडून विश्वासघात होऊ शकतो. 
    म्हणजेच, तुमच्या लक्षात येईल की हे प्रॉब्लेम्स फक्त त्या-त्या व्यक्तीपुरते मर्यादित नसून ते ‘कुटुंब’ या एका मोठ्या संस्थेचा घटक बनतात. एखादी कुटुंबरचना समाजात सर्वमान्य झाली, की त्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी काही नियम बांधावे लागतात आणि मग कुटुंबाचे रूपांतर कुटुंबसंस्थेत होत असते. अशा रीतीने कुटुंब, घर आणि कुटुंब संस्था या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. प्रेम, विश्वास आणि सुरक्षितता व्यक्तीला ज्या सहजीवनातून मिळण्याची खात्री आहे, ते त्या माणसाचं कुटुंब असेल. मग हे कुटुंब फक्त दोन किंवा अधिक पुरुषांचं असेल, तर कुठे दोन किंवा अधिक स्त्रियांचं असेल. काही कुटुंबे ‘माता-मुलं’ अशी असतील, तर काही ‘पिता-मुलं’ अशी असतील. काही स्त्री, पुरुष एकेकटे राहतील. काही जण फक्त दत्तक मुलांबरोबर राहतील. ‘माता-पिता-मुलं’ असं कुटुंब हवं असणारे विवाह करतील. पण, खुशीने एकत्रित राहणार्‍यांची कुटुंबसंस्था अनैतिक म्हणता येईल का? 
    समाजाचा स्थायी विकास साधण्यासाठी भारतीय संस्कृतीचे बलस्थान असलेली कुटुंब संस्था टिकली पाहिजे, असं मत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश डी. पी. खोत यांनी व्यक्त केलं. पण, बदलत्या काळानुसार कुटुंब व्यवस्थेमध्ये आढळून येणार्‍या समस्यांचाही विचार व्हायला हवा. हल्ली प्रेम विवाह करावा की आई-वडिलांच्या मान्यतेनुसार अरेंज पध्दतीने लग्न करावं, लग्न विधिवत करावं की कोर्टात विवाह नोंदणी करावी, याबाबत मुलं-मुलींमध्ये मतभेद असू शकतात. पती-पत्नीने वेगळा संसार थाटावा की आई-वडिलांबरोबर एकत्र राहावं, हा एक मोठा मुद्दादेखील भेडसावतो आहे. हल्ली प्रत्येकाला स्वतंत्र राहण्याची, आपल्याच मनाप्रमाणे वागण्याची एवढी सवय झाली आहे, की एकत्र राहण्यामध्ये करावी लागणारी तडजोड कुठेतरी कमी होताना दिसत आहे. या तडजोडीची अपेक्षा फक्त सुनेकडून ठेवली जाते. हा या एकत्र कुटुंब पद्धतीचा पराभव म्हणावा लागेल. का फक्त सुनेनेच मुलाच्या घरच्या पद्धती, चालीरितींना आत्मसात करावे, ज्या चालीरीती ती एवढी लग्नाआधीची वर्षे तिच्या आई-बाबांच्या घरी पाळत आली, त्या सासू-सासर्‍यांनी किंवा बाकी इतरांनी का अवलंबू नयेत? कधी तुमच्या मनाप्रमाणे, कधी सुनेच्या, कधी आपल्या कमावत्या मुलाच्या, कधी मोठ्या मुलीच्या मतांशी सहमत होऊन बघा, कुटुंब म्हणून तुम्ही अजून प्रगल्भ व्हाल. 
    काही घरांमध्ये पती-पत्नीवर बाळ होण्याबाबतचा दबाव मोठ्यांकडून केला जातो. ‘अमुक-अमुक वर्षं झाली, आता पाळणा हलला पाहिजे’, अशी गोड उक्ती सतत त्यांना ऐकवली जाते. बाळ होत नसेल तर वेगवेळ्या आर्थिक आणि भावनिक शोषण करणार्‍या उपचार पद्धती, होणार्‍या आईची शारीरिक आणि मानसिक अवस्था यावरूनसुध्दा कुटुंबामध्ये कलह होऊ शकतात. अत्यंत संवेदनशील विषयावर वैचारिक मतभेद होऊन नाती दुरावतात. निसर्गनियमाच्या विरुद्ध जाऊन काही जणांना मूल नको असेल किंवा जोडप्याला ते कधी होऊ द्यायचं, याबाबतच्या मतांचा आदर व्हायला हवा. आताचा सामाजिक विकास बघता आपण पूर्वापार चालत आलेल्या पद्धतींचा वेगळ्या प्रकारे विचार करू शकतो. ‘योग्य वयात बाळ झालं पाहिजे’ हे धरून चाललं तर प्रत्येक बाईचं आणि पुरुषाचं ‘योग्य वय’ हे त्या-त्या जोडप्यावर अवलंबून पाहिजे. या निर्णयामध्ये घरच्यांना सामावून घेणं वेगळं आणि घरच्यांनी जोडप्यावर त्यासाठी दबाव टाकणं वेगळं! 
    हल्ली सगळ्यात मूलभूत जाणवणारा घटक म्हणजे कुटुंबातील संपत चाललेला संवाद. आता खेड्यात काय किंवा शहरात काय, तंत्रज्ञानाने, मोबाईलने माणसाचं जग व्यापून टाकलंय. रात्रीचं जेवण हे टीव्हीवरील मालिका बघतच होतं. मग ‘बोलायला वेळ कुठे’ हे वाक्य बोलायला मात्र आपण अजिबात वेळ दवडत नाही. एक विचार करून बघा, रात्री जेवताना सगळे एकत्र गप्पा मारत जेवलात, दिवसभर काय झालं, कोणाकोणाला भेटलात, प्रवासात काय वेगळे प्रसंग अनुभवायला मिळाले, हे एकमेकांशी बोलून तर बघा, किती छान वेळ जाईल! मोठी माणसं त्यांचे अनुभव कथन करतील, लहान मुलंसुध्दा पटकन काहीतरी बोलून जातील, त्यांचे विचार तुम्हाला समजतील. कल्पना करा, जेवण किती रुचकर लागेल आणि नाती कशी आकार घेऊ लागतील!
    आजकालच्या तणावपूर्ण आयुष्याचा सामना करताना पती-पत्नीमधील अहंभाव, नातेवाईकांचा हस्तक्षेप, चढाओढ या दुर्गुणांमुळे त्यांच्या एकमेकांवर असलेल्या विश्वासाला तडा जातो. दिवसेंदिवस अरुंद होत असलेल्या कुटुंबात मनाचे रुंदीकरण झाले पाहिजे. लग्नासारख्या सामाजिक संस्थेतून एकत्र आलेली जोडपी केवळ अहंकारामुळे विभक्त होत असतील, तर ती त्या दोघांचीही हार असते हे नवीन जोडप्यांनी लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे, पती-पत्नीने एकमेकांना धडा शिकवण्याची भाषा न करता, वादविवाद कसे तर्कसंगत पध्दतीने सोडवता येतील, याचा विचार करायला हवा. 
    या लेखमालिकेमध्ये दर महिन्याला आपण कुटुंबातील परस्परसंबंध कसे दृढ करता येतील, जोडप्यातील वादविवाद भांडण न करता किंवा टोकाला न जाता सामोपचाराने कसे सोडवता येतील याचा अभ्यासपूर्ण प्रपंच मांडणार आहोत. सुरूवात करताना एवढंच करायचं की, माणसाने माणसाला माणसासारखं वागवायचं. कोणालाही कुठल्याही जातीवरून, रंगावरून, लिंगावरून न हिणवता एकमेकांना बरोबर घेऊन चालायचं. या प्रवासात अडथळे नक्की येतील. आपला अहंकार कुठेतरी दुखावला जाईल. पण माणूस म्हणून आपण परिपक्व होण्यासाठी वाटचाल नक्कीच करू! जेणेकरून ‘कुटुंब’ नांवाची संस्था जी व्यक्तीची ‘ताकद’ बनू शकते ती ‘कमजोरी’ बनायला नको! 

~श्वेता खंडकर

Leave your comment