नात्यांची गुंतागुंतनमस्कार मित्रांनो! 
    जगभरातला अत्यंत गुंतागुंतीचा पण तितकाच मनोहारी विषय असतो तो नात्यांचा. याचं सर्वाधिक महत्त्वाचं कारण म्हणजे नात्यातल्या भागिदारांना अभिप्रेत असलेले एकाच नात्याचे वेगवेगळे अर्थ. इंग्रजीतला ६ हा अंक दुसर्‍या बाजूने ९ असा दिसतो. नात्यांचंही असंच असतं. कृष्णाशी संबंधित महाभारतातील विविध नाती उलगडून बघा, त्यांचे वेगवेगळे अर्थ आणि छटा अनुभवास येतील. कृष्ण एकच आहे, त्याला आपापल्या उद्देशांनी आणि कुवतीने समजणारे अनेक आहेत. आपणही हे आपल्या बाबतीत एकदा मान्य केलं, की नात्यांना निभावणं सोपं जातं. नाती = न अती हा या समजून घेण्याच्या प्रक्रियेचा आधार म्हणायला हवा. माझ्या अगदी साध्या निरीक्षणानुसार  नात्याचे आठ प्रकार असू शकतात - प्रेमाची, आदराची, दिखाव्याची, व्यावहारिक, पारंपरिक, ओझं वाटणारी, कपटाची वा घृणेची आणि आयुष्यभर न कळलेली नाती !
    या आठ प्रकारातील आधी दोन स्निग्ध नाती पाहुयात - प्रेमाची आणि आदराची. कृष्ण आणि सुदाम्याचं नातं प्रेमाचं तर कृष्ण आणि विदुराचं नातं हे आदराचं होतं. प्रेम आणि आदर यांना एकत्र आणणारं नातं होतं कृष्णाचं नि अर्जुनाचं. साधारणपणे बहुतेक कुटुंबात आई आणि मुलांचं नातं हे पूर्ण प्रेमाचं असतं. वडील आणि मुलांच्या प्रेमात मात्र प्रेम आणि आदराचं वा अपेक्षांचं मिश्रण असतं. पारंपरिक अध्यात्मिक भाषेत, आई आणि मुलांचं नातं अद्वैत प्रेमाचं असतं. वडिलांच्या बाबतीत या प्रेमात थोडी द्वैताची झाक असते. यास्तव आईने मारलेले सगळेच रट्टे मुलं आनंदाने स्विकारतात; पण वडिलांचा एक तिखट शब्द मुलांच्या डोळ्यात पाणी आणू शकतो. माझ्या मते म्हणूनच आई आणि मुलांचं नातं हे सर्वश्रेष्ठ. या नात्यात ना अपेक्षा, ना अहंकार, ना बेगड्या आदराची भावना. सारं काही निरपेक्ष, निरागस आणि निर्मळ! आमच्याकडे पती - पत्नीमधल्या नात्याची मात्र पारंपरिक गम्मत असते. पतीला पत्नीकडून अद्वैती प्रेमाची अपेक्षा असते. म्हणजे, तिने आपलं सारं व्यक्तीमत्व पतीच्या व्यक्तीमत्वात विसर्जित करायचं. पतीला मात्र पारंपरिक द्वैताची मुभा!
    पूर्वीच्या काळी तोच राजा लोकप्रिय व्हायचा जो आपल्या रयतेशी पालक - बालक असं नातं जोडायचा. बळीराजा याच कारणास्तव प्रजेच्या हृदयावर राज्य करु शकला. अब्राहम लिंकनने अमेरिकी जनतेवर पित्यासारखं प्रेम केलं नि अमेरिकन यादवी टाळली. कृष्ण द्वारकेचा ‘राजा’ नव्हता, पण ‘द्वारकाधीश’ जरुर होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे आपल्या अनुयायांवर व विद्यार्थ्यांवर पित्यासमान प्रेम करायचे नि म्हणून मोठा बदल घडवू शकले. 


    हल्ली दिखाव्याच्या, व्यावहारिक आणि ओझ्याच्या नात्यांनी हैदोस घातलाय. कपटाची वा द्वेषाची नाती ही काल होतीच, आज ती आणखी क्लिष्ट व निष्ठूर झालीत. आज बर्‍याच राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था व संघटना या ‘उपयोगीते’वर आधारित अशी नाती आपल्या कार्यकर्त्यांसोबत राखतात. यातला निष्ठूरपणा इतका वाढलाय की जंगलातल्या माकडांच्या टोळ्या आठवाव्यात! म्हणजे म्हातार्‍या नरानं पळून जावं वा तरण्या नरानं त्याला ठार मारत माद्यांचा ताबा घ्यावा. नफ्यावर आधारित नाती आली की गुंतवणूक, परतावा, धोका, रोकडता असे हिशोब आलेच. जशी कुटुंबे दुभंगताहेत तशा संस्था दुभंगताहेत. अर्थात, यामुळे एक गोष्ट बरी झालीय की, तरूण कार्यकर्ते आपल्या लबाड नेत्यांच्या नातीबद्ध भूलथापांना हल्ली ओळखू लागलेत. बर्‍याच सांस्कृतिक संस्थांमध्ये आजही जातींच्या उतरंडीवर आधारित नात्यांना बेमालूमपणे सांभाळलं जातं. नात्यांमध्ये आव तर समतेचा आणला जातो, पण श्रेयावर ताव मात्र जातीनिहाय मारला जातो. 
    बर्‍याच उच्चभ्रू समाजांमध्ये भावांमधील नात्यांचे तीन अश्लाघ्य प्रकार दिसतात - आत्ममग्नतेतून आलेला कोरडेपणा, इस्टेटीसाठी माजणारी भाऊबंदकी आणि व्यापारी हिशेबानुसार वाढलेला मतलबीपणा. दुर्दैवी गम्मत म्हणजे जातींची उतरंडही अशीच दिसते. एका बाजूला महान परंपरांचे गोडवे गायचे आणि दुसर्‍या बाजूला नात्यांमधील विविध प्रकारचे स्तर आणि हिशोब सांभाळायचे! आमच्याकडील नात्यांचा सर्वात ढोंगी प्रकार म्हणजे पद, प्रतिष्ठा आणि पैका अजमावण्याचा! सोलापूरला माझ्या बालपणी आम्हाला हिडीसपिडीस करणारे माझे काही ज्ञातीबंधू आज मतलबासाठी मला गिरीशजी म्हणून संबोधत जातीचं नातं लावू इच्छितात तेव्हां मला खूप हसू येतं. मला आठवते मग गरीब बहीण आणि श्रीमंत भावाची गोष्ट. अशी कृत्रिम, दिखाऊ व मतलबाची नाती ही ओझ्याचीच असतात. ती लादून न घेणं किंवा ती असतील तर त्यातून मुक्त होणं हे उत्तम. बर्‍याचदा मी आणि माझ्या पत्नीने अशी ओझ्याची वा बनावट अथवा कपटाची नाती विनासंकोच दूर केली आहेत. तुमचा भाबडेपणा आणि समोरच्याची लबाडी, असा नात्यांचा आधार होऊच शकत नाही. 
    काही पारंपरिक नाती आवडो न आवडो, सांभाळावी लागतात. यातील काही न कळलेलीही असतात. वडीलधार्‍यांनी ती पाळली म्हणून आम्ही ती सांभाळतो. इथे क्लिनिकल म्हणजे तार्किक पद्धत वापरली की मानसिक त्रास होत नाही. हां, यासाठी कृष्णनीतीचा जरूर वापर करायला हवा. कृष्णाच्या पराक्रमावर, चातुर्यावर आणि बुद्धीप्रामाण्यवादावर जळणारे बरेच नातेवाईक होते. या सार्‍यांना कृष्णाने क्लिनिकली हाताळले. अर्थात, यासाठी आपल्याला भावनांक आणि बुद्ध्यांक या दोहोंमधील संतुलन साधावे लागते. छत्रपती शिवरायांनी हे साधले नि म्हणून ते विविध नात्यांना जोखू शकले आणि कुशलतेनं सांभाळू शकले. ही क्लिनिकल असण्याची कला बहुतेकवेळा आपल्या गुणसूत्रांमध्ये नसते. ती महत्प्रयासाने अंगी बाणवावी लागते. क्लिनिकल नाती ही समांतर पद्धतीने चालतात नि बर्‍याचदा ती दिर्घायुषीही असतात. आपल्या ध्येयसाधनेत बाधा आणणार्‍या पण टाळता न येण्याजोग्या नात्यांना तार्किक पद्धतीने हाताळल्यास विरोधाची धार कमी होते. यास राजकारणी लोक बेरजेचं राजकारण म्हणतात!
    मला भावतात नाती ती निरागस प्रेमाची! कोणत्याही अपेक्षा नाहीत, ऐटिकेट्स आणि म्यानर्सचं कोणतंही ओझं नाही, कोणतीही तुलना नाही आणि कोणताही अहंकार नाही. या नात्यांमध्ये आतबाहेर असं काही नसतं. हां, एकमेकांच्या व्यक्तीगत स्वातंत्र्याबद्दल (आजच्या भाषेत स्पेस) प्रगल्भ असा आदर मात्र असतो. अशा नात्यांमध्ये अवखळपणा असतो, मनमोकळी चेष्टा असते अन् फरशीवर बसून भाकरी - पिठलं खाण्यातली मजा असते! अशी नाती आयुष्याला ऊर्जा देतात नि कधीही न संपणारा उत्कट असा आनंद देतात!! 

~डॉ. गिरीश जाखोटिया

Leave your comment