संसारातली समानता   मागच्या लेखामध्ये आपण मुलींचं शिक्षण, त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य, त्यातून घडत जाणारं त्यांचं व्यक्तिमत्व आणि घटस्फोटांचं वाढतं प्रमाण याचा एकमेकांशी संबंध बघितला. पण, तुटत चाललेल्या संसाराला बाईच जबाबदार आहे का किंवा त्या संसाराला रुळावर आणण्याची जबाबदारी फक्त स्त्रीचीच आहे का? अजिबात नाही! लग्न हे जोडीदारांचं असतं. म्हणजेच, लग्न टिकायला किंवा मोडायला फक्त एकच व्यक्ती कधीही जबाबदार नसते. लग्न टिकवण्यासाठी आणि त्यातील प्रेम खुलवण्यासाठी दोन्ही जोडीदारांचा सहभाग महत्त्वाचा असतो, तेव्हांच ते खर्‍या अर्थाने एकमेकांचे सहधर्मचारी होतात. नाहीतर त्या दोघांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. वर नमूद केल्याप्रमाणे बाईने संसार टिकवायला किंवा तो अधिक खुलण्यासाठी काय करणं उचित ठरेल, हे आपण बघितलं. तसेच या लेखात आपण बघू की पुरुषांच्या; परिणामी समाजाच्या मानसिकतेमध्ये काय बदल करणे गरजेचे आहे. याची सुरवात खरं तर लहानपणापासून होते. 
    अगदी साधं उदाहरण बघू. काल मी ५ वर्षाच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू घ्यायला दुकानात गेले होते. दुकानदाराने ४-५ वस्तू दाखवल्या आणि मग लगेच विचारलं, मुलगा आहे की मुलगी! मी म्हटलं, त्याने काय फरक पडतो, तुम्ही तुमच्याकडे काय पर्याय आहेत ते दाखवा. त्यावर तो म्हणाला, तसं नाही ताई, मुलगी असेल तर बाहुल्या, भातुकली दाखवतो आणि मुलगा असेल तर बंदुकी, गाड्या वगैरे! मी त्यांना समजावण्याच्या सुरात म्हटलं, अहो पण मुलीलाही गाड्या आवडू शकतात की, आणि मुलांनाही भातुकली खेळायला आवडत असेल की, असा विचार का नाही करत? त्यावर त्याचं लगेच उत्तर आलं, पण आमच्याकडे गिर्‍हाईक येतात आणि असंच मागतात, मुलीला भातुकली, बाहुली आणि मुलाला बंदुकी, गाड्या! सामाजिक मानसिकतेचं केवढं हे प्रातिनिधिक उदाहरण! 
    का आपण लिंगावरून (मुलगा-मुलगी) खेळण्यांची निवड करतो. मुलाला गुलाबी रंगाचे कपडे घालायचे नाही, मुलीने हातात बंदूक (खेळातली) घ्यायची नाही, मुलाच्या हातातली बाहुली घेऊन मुलीच्या हातात द्यायची; किंवा मुली या ‘नाजूक’च हव्यात, त्यांनी नीट बसलंच पाहिजे, जोरात हसलं नाही पाहिजे. याने आपण मुलांच्या मनात भरवतो की, मुलगा आणि मुलगी वेगळे आहेत, त्यांनी करायची कामं वेगळी आहेत, वागायची पद्धत वेगळी आहे. किंवा मुलाने मुलीसारखं रडलं नाही पाहिजे, कसं मुलेच मुलींचं रक्षण करतात यासारख्या पूर्वग्रहदुषित संकल्पना आपण कोवळ्या मनांवर लादत असतो. यातूनच पुढे एक संदेश त्यांच्यापर्यंत पोचतो की, मुले मुलींच्या मानाने अधिक सामर्थ्यवान असतात आणि याच संदेशाचं रूपांतर पुढे मानसिकतेत/ पुरुषी अहंकारात होतं. 
    मध्यंतरी टी.व्ही.वर एक जाहिरात पाहण्यात आली. मुलाची आई सुनेबद्दलच्या अपेक्षा सांगत होती, नोकरी करणारी नकोच! तिने आमच्याकडे (सासू-सासर्‍यांकडे) बघावं, मुलं झाल्यावर मुलांना चांगलं जेवू-खावू घालणारी, त्यांना अंगाई-गीत गाऊन झोपवणारी, त्यांचे सगळे लाड पुरवणारी, त्यांना काय हवं-नको ते नीट बघणारी सून हवी! आणि या सगळ्यामध्ये या बाईचा मुलगा काय करणार? तर तो दिवसभर बाहेर राहून पैसे कमावणार, त्याच्या आवडीचं काम करणार, त्याच्या मित्रपरिवाराबरोबर बाहेर जाणार! मात्र, होणार्‍या सुनेकडून अपेक्षा की, तिने तिच्या आवडीचं काम न करता, फक्त आणि फक्त घरासाठी झोकून द्यावं, सासू-सासर्‍यांची सेवा करावी आणि मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी फक्त तिने घ्यावी. तिच्या मनाविरुद्ध जगून तिची किती घुसमट होत असेल याचा विचार तिच्या नवर्‍याने तरी कधी केला असेल का? किंवा, नोकरी करणार्‍या स्त्रियांकडूनसुध्दा अपेक्षा केली जाते की तिने ‘घर सांभाळून नोकरी’ करावी. पण किती पुरुषांकडून अशी अपेक्षा केली जाते की, त्यांनी नोकरी सांभाळून घराकडे नीट लक्ष द्यायला हवं?
    सामाजिक बदल वेगवेगळ्या स्तरावर घडणे जरुरीचे आहे. बदलत्या काळानुसार स्त्रीची भूमिका चूल आणि मूलपर्यंत मर्यादित न राहता जशी ती चौकटीच्या बाहेर पडली, तशीच नवरा म्हणून पुरुषाची भूमिकाही आधीच्या पुरुषार्थी मानसिकतेमधून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. बहुतेक वेळा, नवरे त्यांच्या बायकांना आदर आणि सन्मान देताना दिसत नाहीत. कारण ते स्वतःचा मान-सन्मान घेण्यात/ शोधण्यात गुंतलेले असतात. त्यांची अशी ठाम समजूत असते की, बायकोने त्यांना आदराने आणि सन्मानाने वागवलं पाहिजे. पण, ते स्वतः मात्र त्यांच्या बायकोचा सगळ्यांसमोर अपमान करायला मागे-पुढे पहात नाहीत. 
    मला आठवतं, मला एकदा ज्येष्ठ नागरिक महिला मंडळामध्ये व्याख्यान द्यायला आमंत्रित केलं होतं. विषय होता- जेष्ठ नागरिक- एक वेगळं वळण! या वळणावर नवरा-बायकोला एकमेकांच्या आधाराची सर्वात जास्त गरज असते. पण या महिलांची तीच तर खरी तक्रारवजा व्यथा होती, की आम्ही ‘ह्यांच्या’ विरोधात आतापर्यंत कधी बोललो नाही, त्यांनी पदोपदी केलेल्या अपमानाविरुद्ध कधी आवाज उठवला नाही आणि ज्यावेळी आम्हाला एकमेकांची सोबत हवी आहे, त्याचवेळेला आता हा अपमान सहन होत नाही आणि मग बंड पुकारावंसं वाटतं. माझ्या पिढीच्या, वडिलांच्या आणि आजोबांच्या वयातील सगळ्या नवर्‍यांनी आपल्या बायकोचे हे असे अपमान करणं त्वरित थांबवायला हवंय. तरंच एकमेकांना आदर आणि सन्मानाने वागवून नात्यातील प्रेम खुलायला मदत होईल. लक्षात घ्या, ज्याक्षणी तुम्ही तुमच्या जोडीदाराचा इतरांसमोर अपमान करता, त्याक्षणी तुमच्या नात्यामध्ये कटुता यायला सुरुवात होते. जेव्हां त्या नात्यामधील आदर संपुष्टात येतो तेव्हां त्या नात्याची प्रगती खुंटते. माझ्या पिढीवर तर दुहेरी जबाबदारी आहे, असं मी म्हणेन. कारण, तुमच्या स्वतःच्या वागण्यात बदल तर करायचेच आहेत, पण त्याचबरोबर तुमच्या पुढच्या पिढीच्या मुलांना संवेदनशीलपणे घडवणं, हेही तुमच्या हातात आहे.
    एका निरीक्षणातून असं आढळून आलं आहे की, ८५% लग्नांमध्ये, नवरे भावना व्यक्त करत नाहीत किंवा बायकोबरोबर संवाद साधण्यास कमी पडतात. मी काही बोललो तर भांडणच होतं, असं सोयीस्कररित्या बोलून, हात झटकून बाहेर पडतात. नवरा त्याच्या बायकोला भावनिक सहकार्य करत नाही. बायकोने एखाद्या संवेदनशील विषयाला हात घातला तर बहुतेक वेळा, नवरा- ज्याला नेमका संवाद कसा साधायचा हे कळत नाही- तो या विषयातून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करतो किंवा बचावात्मक पवित्रा घेऊन विषय दुसरीकडे वळवतो. पण मुख्य विषयाला हात घालत नाही किंवा ही भावनिक अढी न सोडवता, शांत राहून, अलिप्त रहायचा प्रयत्न करतो. या वागण्याचं रुपांतर बहुतांशी वेळा रागात होतं. स्वतःची चूक असूनही ती मान्य न करता आपल्या जोडीदारावर (प्रामुख्याने बायकोवर) वर्चस्व गाजवण्याचा हा एक प्रयत्न असतो. इथं एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते ती म्हणजे, शांत बसून, वादातीत विषयावर न बोलून, एकमेकांशी संभाषण बंद करून त्यावेळी कोणालाही फायदा होत नाही. तुम्हाला राग आला असेल तर जरूर १० मिनिटे शांत बसा. (मी मागच्या लेखात लिहिल्याप्रमाणे) पण, राग शांत करून आपल्या जोडीदाराशी नीट मुद्देसूद बोलणं, जमेल तसं, योग्य त्या शब्दात भावना मांडून व्यक्त होणं, हीच खरं तर त्या नात्याच्या परिपक्वतेची खूण आहे. 
    भावनिकदृष्ट्या संवेदनशील असलेले नवरे आणि त्यांचा भावनिक बुद्ध्यांक ही एक सामाजिक उत्क्रांतीकडे जाणारी वाटचाल आहे. संसारातील छोटे-मोठे निर्णय एकत्र घेणे, एकमेकांशी त्याबद्दल चर्चा करणे, ‘मी’च्या ऐवजी आपल्याला महत्त्व देणे, आपल्या जोडीदाराच्या आवडी-निवडी लक्षात ठेवणे, आपल्या कुटुंबाला प्राधान्य देणे, आपल्या मुलांच्या जडणघडणीमध्ये सक्रीय सहभागी होणे, आपल्या जोडीदाराला कधीही एकटं न पाडणे; ही या भावनिक बुद्ध्यांक असलेल्या पुरुषांची ठोस लक्षणे होत. 
    संदेश आणि सीमाचं नुकतंच लग्न झालं होतं. नोकरीनिमित्त बाहेरगावी राहणार्‍या आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी आई-बाबांनी जायचं ठरवलं. घरी जाऊन बघतात तर काय- संदेश पोळ्या लाटत होता आणि सीमाने एकीकडे भाजी टाकली होती. भाजी झाल्यावर ती आरामात सासू-सासर्‍यांबरोबर बाहेर गप्पा मारायला बसली. वास्तविक संदेशची आई थोडी नाराज झाली होती की, मुलगा एकटा किचनमध्ये पोळ्या करतोय आणि आपण इथे गप्पा मारत बसलोय. पण तिने स्वतःच्या मनाची समजून घातली. हे घर त्या दोघांचं आहे, घरातील कामं ते विभागून करतात. आणि लग्नाआधीही संदेश आपल्याला मदत करत होताच की! आता बायकोबरोबर काम करतोय तर त्यात काय वाईट वाटण्यासारखं? अशा अनेक संदेशची गरज समाजाला आहे. फक्त घरातील कामं बरोबरीने करायला नाही तर बाईला- आपल्या जोडीदाराला- तिचा मान- सन्मान आणि आदर देण्यासाठी! 
    
    चला तर मग- लग्नासारख्या पवित्र नात्यातून नवरा-बायकोमधील सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी लेखात म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न करुया. जेणेकरून, पूर्वापार चालत आलेल्या ‘लिंग-पक्षपाती (gender biased) रुढींना’ मोडीत काढून नवीन मानसिक विचार आणि सामाजिक उत्क्रांतीकडे एक पाउल टाकूया! एप्रिल महिन्यात येणार्‍या गुढीपाडव्याच्या निमित्ताने अशी विवेकी विचारांची गुढी उभारूया! 

~श्वेता खंडकर

Leave your comment