गांव पाणीदार करायचं!    रविवार, २४ जानेवारी. सकाळी पाचलाच जाग आली. वास्तविक पाहता मला सकाळी आठच्या दरम्यान उठायची सवय. त्या दिवशी माझा हुरूप वेगळाच होता. कारणही तसंच होतं. गांवातला मित्र आनंद शिंदे याच्यामुळे मला अण्णा हजारे यांचं राळेगण सिद्धी गांव पाहण्याचा योग आला. पाणी फाऊंडेशन महाराष्ट्रात पाणी टंचाई व पाण्याचे नियोजन या विषयावर काम करते. त्यांच्याच ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ प्रशिक्षणासाठी आम्ही राळेगणला गेलो होतो. 
    ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ तसेच वाटर कप स्पर्धेमागचा उद्देश म्हणजे मन संधारण आणि जल संधारण अशी थोडीफार माहिती मला लोकपंचायतच्या सारंग पांडे यांच्याकडून आधीच मिळाली होती. मी पटापट आंघोळ उरकून बॅग उचलली नि गाडीला किक मारून शिवदास पांडे याचं घर गाठलं. तोही बॅग भरून तयारच होता. त्याचा उत्साह पाहून मलाही बरं वाटलं. त्याला घेऊन तिथं जवळच राहणार्‍या हिराबाईच्या घरी पोहोचलो. तिला मात्र तयार व्हायला वेळ लागला. इकडे आनंदचा फोन येत होता. आम्ही सकाळी साडेदहापर्यंत संगमनेर बस स्थानकावर वेळेत पोहोचणं आवश्यक होतं. साडेनऊ तर पिंपळगांवातच वाजून गेले होते. कशीबशी आवरासावर करून आम्ही संगमनेरकडे रवाना झालोे.
    हिवरगांव टोलनाका ओलांडून थोडं पुढे आलो असेल तोच गाडीच्या मागच्या टायरने धोका दिला. आमची मोटारसायकल पंक्चर झाली होती. तिथून जवळच असलेल्या लोकपंचायत प्रशिक्षण केंद्राच्या आवारात गाडी लावली नि रिक्षाने बसस्टँड गाठलं. वाघमारे सर आमची वाट पहात होतेच. त्यांच्याबरोबर ३२ लोक होते. आमच्यामुळे त्यांचाही वेळ वाया गेला. संगमनेर तालुक्यातील पाच गांवांचा या प्रशिक्षणात समावेश होता. बस स्टँडवर आमची बस उभीच होती. बसला पाणी फाऊंडेशनचे बोर्ड लावलेले होते. वाघमारे सरांच्या टिमने आमचं स्वागत केलं. सर्व मंडळींच्या चेहर्‍यावर संमिश्र भाव उमटत होते. पाचच मिनिटांत बस सुरू झाली. प्रत्येकजण गांवाप्रमाणे सीटवर बसलेले होते. आम्ही तिघे एका सीटवर बसलो होतो. बस साकुरमार्गे पुढे सरकू लागली. आमची गांवे मागे राहिली. मात्र, माझ्या मनात चलबिचल सुरू झाली. आम्ही साडेतीन दिवस प्रशिक्षण घेणार होतो. या काळात घरच्या कामांचे नियोजन बिघडणार होते. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न डोके वर काढत होता. शिवदासने तो प्रश्‍न बोलता बालता बोलून दाखवला. दुष्काळाचा प्रश्‍न तालुक्यात थोड्याफार फरकाने सगळ्याच गांवांना भेडसावत होता. मनात विचाराचं थैमान चालू झालं. पाण्याच्याच प्रश्‍नावर प्रशिक्षण होतं. त्यामुळे मनाला थोडा दिलासा मिळत होता. हिराबाई तर बसमध्येच आजारी पडली. ती वाघमारे सरांना विनंती करू लागली, ‘मला अस्वस्थ वाटतंय, डोकंही खूप दुखतंय. मी साकुरमध्ये उतरते आणि बसने माघारी जाते.’ सरांनी तिला धीर दिला, ‘राळेगणला गेल्यावर दवाखान्याची सोय होईल. तिथे प्रशिक्षण केंद्रात चांगल्या प्रकारची सोय आहे. काळजी करू नका.’ त्यांनी तिला आजारावरल्या गोळ्या दिल्या. मग थोड्या वेळाने तिला बरं वाटलं. 
    बस राळेगण सिद्धी शिवारात पोहोचली असावी. कारण पाठीमागे गेलेल्या गांवांच्या तुलनेत हा शिवार हिरवागार दिसत होता. दूरपर्यंत घरे टुमदार दिसत होती. सपाट परीसरापेक्षा डोंगर-उताराची जमीन जास्त वाटत होती. भौगोलिक परीसराच्या मानाने गांव सधन वाटत होतं. बस एका भव्य कमानीसमोर उभी राहिली. आम्ही एक एक बसमधून उतरलो. गेटवर नांव होतं ‘हिंद स्वराज्य ट्रस्ट’. इथल्या इमारतींची मांडणी, बाग, गार्डन, स्वच्छ परिसर या गोष्टींचा अंदाज आला. संस्थेच्या मॅनेजमेंटचा प्रत्यय आला. पुढे पाहतो तर काय, सर्व शिक्षक स्टाफ आणि इतर कर्मचारी आमच्या स्वागताला सज्ज होते. स्मितहास्य करून हस्तांदोलन केले गेले. आम्ही रांगेत पुढे जात होतो. पुढे पाट मांडलेला होता. बादलीमध्ये गरम पाणी होते. एकाएकाला पाटावर उभे करून त्याचे पाय धुतले जात होते. मी तर भाराऊनच गेलो. असं आदरातिथ्य मी कधीही पाहिलं नव्हतं. माणूस आणि माणूसकीचा हा पहिला प्रत्यय जगावेगळा वाटला. मन संधारणाची ही जडण-घडण पुढे अशीच चालू राहिली. कपाळाला गंध आणि अक्षता लावल्या जात होत्या. एक एक जण पुढे सरकत होता. त्यानंतर ‘पाणी फाऊंडेशन’ नांवाच्या कॅप (टोपी) घालून आमचा सत्कार सुरू झाला. हा सत्कार आपलेपणाची जाणीव करून देत होता. 
    चहा-पाणी झाला. प्रशिक्षण केंद्र व्यवस्थापक अक्षय सावंत यांनी आम्हाला राहण्याच्या रूम दाखवल्या. एका रूममध्ये चारजण अशी व्यवस्था करण्यात आली. महिलांसाठीच्या रूम थोड्या अंतरावर होत्या. त्यांची सोय स्मिता मॅडमने करून दिली. दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर पहिलं सत्र सुरू झालं ते दुपारी साडेतीन वाजता. प्रशिक्षण हॉलमध्ये आम्ही सर्व गोलाकार रिंगण करून बसलो. एकमेकाची ओळख एका अनोख्या पद्धतीने केली गेली. एका गांवचे एक, दुसर्‍या गांवचे एक अशा मित्र जोड्या तयार झाल्या. मला मित्र लाभला तो आमच्याच तालुक्यातल्या चिंचोली गुरव गांवचा भाऊसाहेब सोनवणे. नांव, गांव, व्यवसाय, आवड आणि विशेष गुण. अशी आम्ही एकमेकांची ओळख सांगितली. अशा प्रकारे सर्वांनी एकमेकांचा परिचय करून दिला. परिचय करण्याची पद्धत अशी का? मी शिवदासला विचारलं. त्याचं आणि माझं एकमत झालं की, एकमेकांत मिसळण्याची ही योग्य कला असावी. शिवाय, दुसर्‍या व्यक्तीबद्दल आत्मीयता वाढावी व मित्रांचे चांगले गुण समोर यावेत. स्वत:चे वर्णन स्वत: करण्यापेक्षा मित्राकडून ऐकण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आता आम्ही प्रशिक्षणार्थी एकमेकांत मिसळून गेलो. दहा मिनिटांसाठी चहापाण्याची सुट्टी झाली. पुन्हा सत्र सुरू झाले तेव्हां साडेदहा वाजले. या सत्रात नियमांचे पालन कसे करावे, हा विषय होता. तोही अनोख्या पद्धतीने. एका गांवातल्या एका व्यक्तीने एक नियम सांगायचा तो सरांनी फलकावर मांडायचा. अशा पद्धतीने नियम तयार झाले. सरांनी आम्हांला शेवटी असं सांगितलं की, आपण स्वत:वर लादलेले नियम आपणच कसे काय मोडणार? त्यामुळे नियमातही आपलेपणा आला आणि पालन करण्यातही आपलेपणा आला.
    ठीक आठ वाजता आम्ही फे्रश होऊन भोजन कक्षात गेलो. भोजनाची व्यवस्था खूपच छान होती. त्याहून तिथली प्रथाही खूपच छान. स्वत: जेवणाचं ताट धुवून स्वत: जेवण वाढवून घ्यायचं. जेवण झाल्यावर आपलं ताट आपणच स्वच्छ धुवायचं. आम्ही सर्वांनी मिळून मिसळून जेवणाचा आनंद लुटला. सर्वच पदार्थ खूप रुचकर होते. जेवण झाल्यानंतर गप्पागोष्टी मारत आपापल्या रूमकडे निघून गेलो. 
    भल्या पहाटे जाग आली. मला वाटलं मीच सगळ्यात लवकर उठलो असेल. पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. सगळ्या मित्रपरिवाराची सकाळी आवरायची कामे जोरात चालू झालेली होती. मी घरी लवकर उठत नाही. झटपट आंघोळ वगैरे आटोपून त्या सर्वांमध्ये सामील झालो. सर्वजण मोठ्या प्रांगणात जमा झाले. कालच्या सुचनेप्रमाणे आम्हाला आज शिवारफेरीला जायचं होतं. चार टॅक्सी गाड्या सज्ज होत्या. सर्व शिक्षक व आम्ही जमेल त्या टॅक्सीत बसलो आणि गाड्या गेटबाहेर पडल्या. अंधुक प्रकाशात राळेगण सिद्धीचं दर्शन घडलं. गांव आखीव-रेखीव चित्राप्रमाणे वाटत होतं. अंधुकशा उजेडात आम्ही जमखाऊन बघत होतो. वळणे-पिळणे घेत एका गोलाकार टेकडीवर आलो. खरंच एका अद्भूत दुनियेत आल्यासारखं वाटत होतं. सूर्याचं दर्शन अजून झालं नव्हतं. पूर्वेच्या डोंगराआडून सूर्य आकाशात किरणे फेकत होता. निसर्गाची न्यारी किमया अंधुक प्रकाशात मी आजमाऊ लागलो. गोलाकार उभे राहण्याचा आम्हाला आदेश आला. लगेचच आम्ही गोलाकार रिंगण करून उभे राहिलो. त्याच जागेवर बसण्याची सूचना मिळाली. पुढची सूचना होती डोळे बंद करा, हात जोडा. एक दीर्घ श्‍वास घ्या, पुन्हा हळूवार सोडा. आजूबाजूचा येणारा आवाज एकाग्राने ऐका आणि सोडून द्या. स्वाती मॅडमनी प्रार्थना सुरू केली, ‘चराचराच्या विश्‍वशक्तींनो...!’ पाच मिनिटात प्रार्थना संपली असावी. तळहात एकमेकांवर घासण्यास सांगितलं. पृथ्वीला वंदन करून डोळे उघडण्यास सांगितलं. आमच्या अंगात आता वेगळीच चेतना निर्माण झाली. मानवाशी, निसर्गाशी एकनिष्ठ राहण्याची ही प्रार्थना खूप प्रेरणादायी होती. गांव, राज्य, देश, नव्हे विश्‍व कल्याणाची ऊर्जा म्हणावी लागेल. आम्ही उठून उभे राहिलो. सूचना आली, समोर दिसणार्‍या दृश्याची प्रतिमा मनात साठवून ठेवायची. मी समोरचं दृश्य मनात साठवू लागलो. जे जे पाहत गेलो ते शब्दांत सांगणं अशक्य वाटतं. दोन हरणे दृष्टीस आली. एक ससाही पळताना दिसला, काही क्षणात अदृश्य झाला. पक्ष्यांची किलबिल कानावर येत होती. आता मात्र सूर्य चांगला कासभर वरती आला होता. आम्ही डोंगराच्या माथ्यावर होतो. झाडे, वेली सी.सी.टी.च्या चरांवर डोलताना दिसत होती. ही किमया जलसंधारणाच्या उपचाराने साधली असावी. श्रमदानातून जलसंधारण झालेलं दिसलं. माथा ते पायथा कामाचं नियोजन योग्य रितीने दिसत होतं. जलद उतारावर सी.सी.टी.चे आडवे तर मध्यम उतारावर उभे मोठे चर दिसत होते. कुर्‍हाडबंदी आणि चराईबंदीही नक्कीच केलेली असावी. कारण चाराही बर्‍यापैकी होता. पुन्हा गाडीत बसलो. शिवाराच्या खालच्या भागात आलो. गाड्या तिथे थांबल्या. पुन्हा निरीक्षणाला सुरूवात झाली. या टप्प्यावर सिमेंट नाला बांध, मोठा पाझर तलाव, मातीनाला, बांधबंदिस्ती केलेली दिसत होती. प्रत्येकाला काय काय दिसलं, हे विचारलं गेलं. जमिनीच्या उताराप्रमाणे पिकपद्धती पहायला मिळाली. जमिनीच्या वरच्या भागावर काटेरी झुडुपे, कमी पाण्यात येणारी पिके होती. सखोल भागात पाहिले असता जोमाने वाढणारी पिके व झाडे दिसत होती. पुन्हा गाडीमधून आम्ही गांवालगत येऊन खाली उतरलो. तिथं गॅबियन बंधारा बघितला. त्याची दगड, माती वाळू अशा पद्धतीने रचना केलेली होती. त्या बंधार्‍याला तारेची जाळी फिट्ट बसवलेली होती. असला बंधारा मी प्रथमच पाहत होतो. पुन्हा थोड्याच अंतरावर पायाने चालत गेलो. हा गांवचा पाणवठा होता. यापुढे पाणी दुसर्‍या गांवात वाहून जाते. त्या भागाला आउटलेट म्हणतात, हेही सरांनी सांगितलं. पुढे गायांचा मुक्त गोठा बघितला. सांडपाण्याचं योग्य नियोजन बघितलं. सरांबरोबर गांवच्या माहितीची चर्चा करत करत आम्ही मीडिया सेंटरवर पोहोचलो. इथं मात्र आण्णांची जीवनगाथा पहायला मिळाली. गल्ली ते दिल्ली हा आण्णांचा प्रवास कसा झाला. त्याची मांडणी खूपच अनोख्या पद्धतीने मिळत गेली. आण्णांचे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांबरोबरचे फोटो पहायला मिळाले. त्यांना मिळालेली सन्मानचिन्हे पाहताना तर थक्कच झालो. आण्णांच्या जिल्ह्यात जन्म घेतल्याचा मला अभिमान वाटू लागला.
    दुपारच्या जेवणानंतर आम्ही पुन्हा प्रशिक्षण हॉलमध्ये जमा झालो. इथलं शिक्षण पुन्हा कधीच मिळणार नाही याची जाणीव मला झाली. आता टेक्निकल अभ्यास सुरू झाला. काय पाहिलं, कसं वाटलं, यासाठी काय काय करावं लागेल. याची चित्रफीत बघता बघता आम्ही टेक्निकल कामे पण शिकत गेलो. सामाजिक, राजकीय व तांत्रिक अडथळे यावर करावयाची मात, हे खरे महत्त्वाचे मुद्दे योग्य पद्धतीने शिकवले गेले.
    आजचा दिवस हा शेवटच्या टप्प्यातला होता. दोन सत्रांत तो होणार होता. पहिल्या टप्प्यात तो आम्ही श्रमदान करून शिकलो. एकजुटीने आणि तेही खेळीमेळीच्या वातावरणात श्रमदान कसं करावं, हे मात्र प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळणार नाही. यानंतर आम्ही शिकलो पाण्याचा वर्तमान जमा खर्च! या सत्राने तर आमच्या डोळ्यात झणझणित अंजन घातलं. पाण्याचं नियोजन कसं करायचं, हे मात्र वाचकांना प्रत्यक्ष समजून घ्यावं लागेल. हे कौशल्य मला अवगत नाही. इथून पुढे एक एक क्षण विचार करायला लावणारा ठरला. दुष्काळी गांव आणि जलसंधारण केलेलं गांव या दोन्हीतला फरक कळला तो एका डेमोमुळे. दगडालाही पाझर फुटेल, असं हे शिक्षण होतं.
    दुपारनंतरचं सत्र होतं निरोप समारंभ आणि अभिप्राय. अभिप्राय या विषयावर मला फारसं बोलता आलं नाही. स्टेज डेअरींगपासून मी तसा खूपच दूरवर राहिलेलो. शिवाय भावनिक पातळीने खूप उंची गाठली होती. मी खूपच भावनिक झालो होतो. इतर मित्रांची पण हीच परिस्थिती असावी, हे त्यांच्याही चेहर्‍यावरून दिसत होतं. सगळ्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. अगदी शिक्षक, व्यवस्थापक, अध्यक्ष, प्रोडक्शन कंट्रोलर यांच्याही. आता वातावरणात एक स्तब्धता आली. निरोप घेण्याच्या वेळेत संगमनेर डेपोची बस येऊन ठेपली होती. जड अंत:करणाने आम्ही निरोप घेत होतो. आता आम्ही एका तालुक्याचे नव्हतो, तर एका गांवचे, एका कुटुंबातले एक निष्ठावंत समाजसेवक. सत्यमेव जयते वॉटर कप फौंडेशन ग्रुपचे सच्चे विद्यार्थी. गाडी सुरू झाली होती. हात हवेत हलत राहिले. गांव मागे पडत गेलं. मन संधारणातून जल संधारणाचं स्वप्न घेऊन आम्ही परतलो. 

~भाऊसाहेब पांडे

Leave your comment