गरज भावनिक आधाराची!    सर्वसाधारपणे, नवविवाहिता गोड बातमी कधी देते, याकडे तमाम नातेवाईक डोळे लावून असतात. गोड बातमी, डोहाळे, औषधं, तपासण्या, डोहाळजेवणाचा उत्सव, हे सगळं पार करून एक दिवस ती ‘आई’ होते.
    सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. हल्ली छोट्या कुटुंबांमुळे हौसे मौजेला काटकसर करायची गरज नसते. फुलांचे गुच्छ, पेढे, मिठाई, फोटो, नवे कपडे यामुळे ते बाळ आणि त्याची आई गुदमरून जातील एवढं उत्साहाला उधाण आलेलं असतं.
    सगळं छान असतं तर एखादी पोरगी बाळ पाळण्यात ठेवून उदास पडून असते. कधी कधी ती उगाचच क्षुल्लक गोष्टीसाठी रडते. जेवत नाही नीट अन् व्यवस्थित झोपतदेखील नाही. याला वैद्यक भाषेत Puerperial depression म्हणतात.
    माझ्याकडे सरिता नांवाच्या मुलीचं सिझेरीयन झालं. गोड गुटगुटीत तीन किलोचा मुलगा झाला. टाके व्यवस्थित असल्याने सातव्या दिवशी घरी जायचं ठरलं. दोघांची प्रकृती एकदम उत्तम. मंडळी घरी गेली. तिसर्‍या दिवशी अनुराधा नांवाच्या बाईचा फोन आला. ती सरिताची वहिनी होती. ती फोनवर सांगत होत की, सरिता छताकडे टक लावून बसते तास न् तास. उगीचच चिडते आणि रडते.
    दुसर्‍या दिवशी सरिताला घेऊन तिची वहिनी आली. सविस्तर बोलणं झाल्यावर सरिता म्हणाली की, तिच्या वडिलांना खूप दूरच्या गांवी बदली करून पाठवणार आहेत. त्याची काळजी तिला वाटतेय. खरं तर घरी कमावता मोठा भाऊ आहे, आई, वहिनी सगळे आहेत आणि त्यांच्यापैकी कुणीच या बदलीचा ताण घेतला नाही. नोकरी म्हटल्यावर कधीतरी दूरगांवी बदली होणं अपेक्षित असतंच ना. आता सरिताची प्रसूतीची वेळ सर्वांनाच माहीत असल्याने सगळं नीट नियोजन घरच्या लोकांनी केलेलं होतंच. सरितानं तणावग्रस्त राहण्यासाठी हे कारण अजिबातच संयुक्तिक वाटत नव्हतं.
    प्रसुतीनंतर काही मुलींना असंच होत असतं. उगीचच उदासी येते. बाळाचं ओझं वाटतं. बाळ रडलं तर त्याच्यापेक्षा जास्त ती नवी आईच रडते! हेPost partum Blues असतात. विनाकारण अंधारून येतं मन. अशावेळी थोडंसं समुपदेशन गरजेचं असतं. 
    एक होती मनिषा. तिची प्रसुती नैसर्गिक होईल असं वाटलं. भरपूर वेळ वाट पाहिली. परंतु, अपेक्षापेक्षा जास्तच वेळ लागला. बाळाचे हृदयाचे ठोके फारच जलद झाले आणि शेवटी सिझेरीयन केलं. सोबत असलेल्या ज्येष्ठ बायका चर्चा करू लागल्या. थोडं अजून सहन केलं असतं पोरीनं तर, होत होती की नॉर्मल डिलीव्हरी! रोज भेटायला येणार्‍या सगळ्या बायकांची अशीच चर्चा चालू असायची.
    परिणामी मनिषाला अपराधी वाटू लागलं. ती गप्प गप्प झाली. मी तिला रोज तपासत होते. सगळं ठीक होतं. पण मनिषाचं अंग थंडगार असायचं. किंचित थरथर जाणवायची. हळूहळू ती आणखीच कोषात जाऊ लागली. बाळाचा राग राग करायची. घरी जाण्याच्या दिवशी डोळे मिटून जे पडली ती उठेनाच. सगळे घाबरले. मी तपासल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, मनिषाला नैराश्याने घेरलं होतं. मी सगळ्या नातेवाईकांना समजावलं. ‘सिझेरीयन होण्याचा आणि मनिषाच्या सहन करण्याचा संबंध जोडू नका. बाळाचे ठोके प्रमाणाबाहेर जलद झाले त्यामुळे सिझेरीयन केलं मी. तुम्ही मनिषाला मुळीच दोषी धरू नका. बाळालाच प्रसुतीच्या कळा सहन झाल्या नाहीत. त्यामुळे बाळासाठीच सिझेरीयन केलंय हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही, तोपर्यंत मनिषा स्वत:लाच अपराधी मानत राहिल. त्यात पुन्हा तिचा स्वभाव फारसा बोलका, मोकळा नाहीये.’
    भरपूर सविस्तर चर्चा, समुपदेशन, थोडी औषधं या सगळ्याच्या मदतीने मग मनिषा पूर्ववत झाली. त्याला जवळजवळ पंधरा दिवस लागले. आता मनिषाच्या आई होण्याला दोन महिने झाले आहेत. खर्‍या अर्थाने आता ती आईपणाचा आनंद घेतेय. बाळाला जवळ घेतेय. बाळाचा लाड करते. निराशा घेरून येण्यासाठी असं छोटसं कारण पुरतं, प्रसूत झालेल्या मुलींसाठी! हे झालं ‘पोस्टपार्टम क्लूज’चं उदाहरण. पण काही वेळेस हे इतकं सौम्य नसतं. 
    एक मुग्धा नांवाची मुलगी होती. तिला दोन मुली होत्या. त्यापैकी एक मुलगी मतीमंद होती. तिसर्‍या वेळी प्रसूती झाली अन् मुलगा झाला. परंतु, त्या मुलाला अतिदक्षता विभागात ठेवून त्याची खूप काळजी घ्यावी लागली. दीड महिन्यानंतर त्या बाळाची एक शस्त्रक्रिया करावी लागणार होती. मुग्धा प्रचंड अस्वस्थ झाली. चिडणं, रडणं, वाढलं. वस्तू फेकून देणं, व्यवस्थित न राहणं असं सुरू झालं. एक दिवस तिने त्या मतिमंद मुलीला मारलं. दुसर्‍या दिवशी पुन्हा तिला रागावलं, मारलं! हे प्रकार वाढू लागले. तिचा नवरा तिला माझ्याकडे घेऊन आला. तिचा एकंदर अवतार पाहून मी तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवलं. तिला गोळ्या घेऊन फारसा फरक पडला नाही. त्यामुळे तिला शॉक ट्रीटमेंटदेखील घ्यावी लागली. ती पूर्ण बरी व्हायला दोन वर्ष लागली. दरम्यान दोन्ही मुलांना ती खूपदा विनाकारण मारायची. फार व्यवस्थित हाताळावं अशा केसेसना. अन्यथा उपचार अर्धवट सोडले की काही वर्षांनंतर पुन्हा ही लक्षणं दिसू लागतात. मुग्धाला पूर्ण नॉर्मल बाळ व्हावं ही आशा होती, ती पूर्ण न झाल्यामुळे ती सैरभर झाली. 
    गर्भावस्थेमध्ये स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही दोन हार्मोन्स, गर्भावस्थेत जास्त प्रमाणात रक्तात असतात. नऊ महिने या हार्मोन्सच्या रक्तातल्या पातळ्या उंचावलेल्या राहतात आणि प्रसूती झाली, की याच पातळ्या एकदम खालावतात. स्तनपानासाठीदेखील काही हार्मोन्सच्या पातळ्या बदलतात. यामुळे स्त्रीची मनोवस्था प्रसूतीनंतरचे सहा आठवडे जराशी नाजूक असते. ‘बाळंतपण’ करणे हा जो आपल्या भारतीय जगण्यातला भाग आहे, जो फारच महत्त्वाचा आहे यादृष्टीने. जुन्या जाणत्या नातेवाईक स्त्रिया आसपास असतात आधारासाठी. बाळंतपणासाठी माहेरी जाणे या प्रथेतील इष्ट भाग एवढा की, आई, बहीण भाऊ, वडील यांच्यामुळे मुलीला मजबूत असा मानसिक आधार मिळू शकतो. मनातल्या गोेष्टी मोकळेपणाने बोलण्यासाठी वाव मिळतो. प्रसूती झाली की, भेटायला येणार्‍या आप्तस्वकीय, मैत्रिणी यांच्याशी गप्पा करण्यात मन उदासीनतेपासून थोडे दूर जाऊ शकते. जिथं प्रसूती झाल्यावर स्त्री बहुतांश वेळ एकटी असते अशा स्त्रीला नैराश्य येण्याची शक्यता जास्त असते. ज्या घरात अनुवंशिक मानसिक विकार आहेत, अशा घरातल्या स्त्रीला प्रसूतीपश्‍चात उदासिनता, निराशा, चिडचिडेपणा येण्याची शक्यता जास्त असते. सासरघरी काही तणावपूर्ण परिस्थिती असेल किंवा जन्मलेले किंवा आधीचे मूल सव्यंग असेल तर प्रसूतीपश्‍चात मनोविकार होण्याची शक्यता वाढते.
    भारतीय जीवनपद्धतीत, मुलगी नवव्या महिन्यात माहेरी येते आणि प्रसूतीनंतर किमान दीड-दोन महिने माहेरी असते. त्यामुळे बाळ एकटीने सांभाळण्यासाठी तिला या काळात छान तयार केलं जातं. हळूहळू तिची प्रकृतीही सुधारते. कारण घरातल्या सगळ्यांनी तिला व बाळाला खूप जपलेले असते, याचा तिच्या मन:स्थितीला छान आधार मिळतो. उदासी येतच नाही किंवा किंचित्काळ मळभ आले तरी ते पटकन निघून जाते. 
    मोठ्या शहरातून, विभक्त कुटुंबात राहणार्‍या घरातील मुली बर्‍याचवेळा एकटेपणाची शिकार होत आहेत. आजकाल पूर्वीसारखी शेजार्‍यांची मदत मिळत नाही. 
    आई घरी-दवाखान्यात हेलपाटे करते, त्या आईलाही ताण पडतोच, कारण तिला मदतीला कुणी नसतं आणि काम तर भरपूर असतं. कधी आई-मुलीत ताण येतो विनाकारण.
    बाळाला दूध कसं पाजायचं हे पहिल्या वेळी नीट कळत नाही. प्रसूतीमुळे पोट दुखत असतं, टाके असतील तर ते दुखतात.
    बाळ रडू लागलं की, जीव घाबरा होतो. कधी दूधच कमी येतं. मग बाळाचा टाहो सुरू असतो. आलेली प्रत्येक बाई, बाळ कसं आहे, कुणासारखं दिसतंय याचीच खूप चर्चा करते. कधीकधी सगळे मिळून बाळाकडेच लक्ष देतात आणि मग त्या प्रसूती झालेल्या, नव्यानेच आई झालेल्या मुलीला उगीचच दुर्लक्षित वाटतं. तिची स्वत:ची आईसुद्धा बाळाची शी-शू, कपडे, दुपटे यातच गर्क आहे, असं तिला उगीचच वाटून जातं.
    एकूणात काय तर ‘गोड बातमी’ दिल्यापासून तिला सल्ले देण्यासाठी समस्त नातेवाईक बायका सज्ज होतात. हे खा, ते खा, ते खाऊ नकोस, पडू नकोस, भरभर चालू नकोस, आराम कर. केशर घालून दूध घे, गर्भसंस्कार केंद्रात जा, एक ना दोन.
प्रसूती नॉर्मल व्हावी, यासाठी अजून वेगळे सल्ले.
    आता प्रसूती झाली, तर दूध भरपूर यावं यासाठी हे खा, ते पी, पुन्हा मग पोट सुटू नये, वजन वाढू नये यासाठी वेगळ्या सूचना. ती पुरती वैतागून जाऊ शकते. आणि सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बनते ते नवजात अर्भक. मग तिच्या वेदना, तिची भूक, तहान याकडे दुर्लक्ष होतं किंवा तिच्या मनासारखं तिला खाऊ दिलं जात नाही. अळणी, बेचव आहार दिला जातो, कां तर बाळाला त्रास होईल. 
खरं तर डॉक्टरी सल्ला असतो की व्यवस्थित नीट आहार द्यावा. परंतु, अनुभवी ज्येष्ठ स्त्रिया या क्षेत्रात अतिक्रमण करतात.
    माझ्याकडे प्रसूती झालेल्या एका मुलीला, तिच्या आजीने इतकं कमी पाणी पिऊ दिलं की, तिला मलावरोध झाला. तरी आजीने घरगुतीच उपाय केले. दोन महिन्यानंतर तिचे फिशरचे ऑपरेशन करावे लागले. ‘प्रसूती’ ही गोष्ट तशी नैसर्गिक. पण डॉक्टरांची देखरेख लागतेच. तरीही या क्षेत्रात, जुनी माणसं विशेषत: स्त्रिया फार हस्तक्षेप करतात. अशा नातेवाईकांच्या आसपास असण्याचा प्रसूती झालेल्या मुलीला कधी फार त्रास होतो. हे प्रमाण तसं कमीच असतं ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट. पण, आपल्याकडे गर्भवती आणि स्तनदा मातेला कौटुंबिक आधार असतो यामुळेच ‘पोस्टपार्टम ब्लूज’ हा प्रकार आपल्याकडे खेड्यात, मध्यमवर्गीयात फारसा दिसत नाही. आता मोठ्या शहरातील उच्चभ्रू, शिक्षित, कमावत्या स्त्रियांमध्ये भावनिक ताण, एकटेपणा असतो. त्यामुळे हा ‘ब्लूज’चा प्रकार दिसून येत आहे. 
    परदेशात प्रसूतीपश्‍चात नैराश्यातून स्वत:ला किंवा बाळाला इजा करण्याचे प्रकार आढळून येतात. ‘एकटेपणा’ हा नव्या आईला जड जात असतो. त्यामुळेच आई होणार्‍या मुलीला, भावनिक आधार देण्यासाठी, कुटुंबाने सज्ज असलं पाहिजे.
    आजच्या जगण्यात तंत्रज्ञानाच्या प्रगतीने संवादच नष्ट होत आला आहे. एकमेकांशी मोकळे बोलण्याची, एकमेकांना समजून घेण्याची गरज तर वादातीत आहे.

~डॉ. वृषाली किन्हाळकर

Leave your comment