कांदापुराण   कांदा भजी, मिसळ, पावभाजी या पदार्थांची नावं घेतली तरी तोंडाला पाणी सुटतं. कांद्याशिवाय या पदार्थांचा विचार होऊच शकत नाही. उसळी, चिकन व इतर पदार्थांच्या ग्रेव्हीमध्ये कांदा हवाच. असा हा हवाहवासा कांदा चिरायला मात्र नको वाटतो. चिरताना डोळ्यांत पाणी आणतो. का येतं असं पाणी डोळ्यांत?
    कांदा चिरल्यावर त्यातून प्रोपेन्थिऑल एस ऑक्साइड नांवाचा वायू बाहेर पडतो. जसा हा वायू डोळ्यांच्या संपर्कात येतो तशी डोळ्यांतील अश्रुग्रंथींना चालना मिळते. या वायूमुळे डोळे चुरचुरतात व अश्रुग्रंथी उत्तेजित होऊन डोळ्यांतून पाणी येतं. हे टाळण्यासाठी काही युक्त्या पाहू- कांदा सोलून अर्धा केल्यावर तो गार पाण्यात काहीवेळ बुडवून ठेवा किंवा थोडावेळ फ्रीजमध्ये गार करत ठेवा किंवा चिरण्यापूर्वी डोळ्यांना चष्मा, गॉगल लावा. 
    कांद्याचे दोन प्रकार आपण खाण्यासाठी वापरतो, पांढरा कांदा आणि लाल कांदा. कांदा हा मुळात थंड प्रकृतीचा असतो, तरी उन्हाळ्यात पांढरा कांदा खाणं जास्त चांगलं. उष्णतेचा त्रास होणं, नाकातून रक्त येणं, ऊन बाधल्यामुळे ताप चढणं या व्याधींवर उपाय म्हणून कांद्याची थंड प्रकृती खूप फायदेशीर ठरते.
    कांद्यामध्ये उष्मांकाचं प्रमाण खूप कमी असतं. म्हणजेच १०० ग्रॅम कांद्यामध्ये फक्त ४० उष्मांक असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सॅलड किंवा कोशिंबिरीत कांदा खाणं, मधुमेही रुग्णांनी नियमित कांदा खाणं चांगलं असतं. मात्र, अशावेळी कच्चा कांदा खाणं अधिक उपयुक्त ठरतं. पदार्थांची कांदा घालून तयार केलेली ग्रेव्हीसुद्धा वजन कमी करण्याच्या आहारात वापरता येऊ शकते. ही ग्रेव्ही बनवण्यासाठी खोबरं, शेंगदाणे सर्रास भरपूर तेलात परतून वापरले जातात. पण, अशा ग्रेव्हीयुक्त भाज्या सतत खाणं वजन, मधुमेह, हृदयविकारास आमंत्रण देणारं ठरू शकतं. हे टाळण्यासाठी ग्रेव्ही बनवताना बारीक चिरलेला कांदा व थोड्या प्रमाणात खोबरं, डाळ थोड्या तेलावर परतून घ्या. ग्रेव्ही छान खरपूस होण्यासाठी त्यात चिमूटभर मीठ व साखर घालून परतावं. यामुळे ग्रेव्हीला छान खमंग लालसर रंग येईल आणि या ग्रेव्हीतून शरीरात कॅलरीही कमी जातील.
    कांद्यातली इतर द्रव्यं जंतुसंसर्ग दूर करण्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. सर्दी- पडशावर तसेच खोकल्यावर पहिला उपाय म्हणून कांदा सेवन करणं चांगलं. कांद्यातले अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस् व क्वार्सिटिन हे द्रव्य हृदयरोग, कॅन्सर अशा आजारांना रोखण्यासाठीही उपयुक्त असतात.
    आपल्या जठरात असणार्‍या चांगल्या व उपयुक्त जीवाणूंची वाढ होण्यासाठी कांद्यातील तंतूमय पदार्थ उपयोगी पडतात. या तंतूमय पदार्थांवर हे जीवाणू वाढतात आणि त्यांच्यामुळे गॅस, अपचन यांसारखे पोटाचे विकार होण्याचा धोका खूप कमी होतो. 
    असा हा बहुगुणी कांदा. वापरायलाही खूप सोपा असतो. अनेक प्रकारांनी त्याचा वापर करता येतो. सॅलडमध्ये कच्चा, भाजीत तेलावर परतून, बिर्याणीसारख्या पदार्थांमध्ये तेलात खरपूस तळून, ग्रेव्हीमध्ये वाटून किंवा चिकन, पावभाजी याबरोबर पातळ चकत्या करून खाता येतो. लसूण आणि कांदा यांची मैत्री तर लज्जत वाढवण्यासाठी फारच प्रसिद्ध आहे. असा हा विविधांगी कांदा काही जणांना मात्र पचत नाही. त्याची अ‍ॅलर्जीही होऊ शकते. अशा व्यक्तींनी कांदा सेवन करण्यापूर्वी आपली प्रकृती तपासावी. आला उन्हाळा तब्येत सांभाळा, असं म्हणताना जवळ कांदा बाळगा आणि वातावरण बदलापासून स्वतःला, कुटुंबाला वाचवा, असं म्हणता येईल.
कांद्याविषयी काही गमतीशीर समजुती ः
    ज्यांची लग्नं अजून झालेली नाहीत अशा तरुण-तरुणींनी रात्री झोपताना उशीखाली कांदा ठेवून झोपलं तर तुम्हाला अनुरूप अशा जोडीदाराचं स्वप्न पडतं.
    तुम्ही एकाचवेळी दोघांच्या प्रेमात पडला असाल आणि या दोघांपैकी एकाची जोडीदार म्हणून तुम्हाला निवड करायची आहे, तर तुमचा गोंधळ उडतो. अशावेळी असं म्हणतात की, एका कांद्याला खाच पाडून त्यात एका जोडीदाराचं नांव घाला आणि दुसर्‍या कांद्याला चीर पाडून त्यात दुसर्‍या जोडीदाराचं नांव घाला. दोन्ही कांदे जमिनीत पुरा. ज्या कांद्याला प्रथम कोंब फुटेल त्यातलं नांव म्हणजे तुमचा जोडीदार.
    कांदा नियमित खाल्ला की आपल्याजवळ साप, भूतपिशाच्च, चेटक्या येत नाहीत. हे जीव कांद्याच्या उग्र वासानेच पळून जातात आणि आपल्याला त्यांची बाधा होत नाही.
    सर्दी-खोकला-ताप या त्रयींपासून स्वतःला वाचवण्यासाठी जवळ कांदा ठेवावा. तसेच खोलीत कांदा टांगून ठेवला की हे तीन आजार मागे लागत नाहीत. प्लेगच्या साथीमध्ये कांदा स्वतःजवळ ठेवणे हा उपाय सर्वमान्य होता.
    कीटकांना लांब ठेवायचं असेल तर कांदा मधोमध कापून तो अर्धा कांदा घराच्या कोपर्‍याकोपर्‍यांत ठेवा. कीटक त्याकडे ओढले जातात आणि आपल्याला त्रास देत नाहीत. 
    कुत्रा चावला तर त्या वेदनेपासून वाचण्यासाठी कच्चा कांदा खावा.
    डोक्याला अकाली टक्कल पडत असेल तर त्या भागावर कांदा चोळावा. टक्कल पडणं थांबतं. 
    नेहमीपेक्षा जाड साल असलेला कांदा तुमच्या शेतात उगवला किंवा बाजारात तुम्हाला मिळाला तर त्यावर्षी हवामान अत्यंत खराब असेल.

~वृषाली वझे

Leave your comment