ढोलकीच्या तालावर...   डॉ. संतोष खेडलेकर यांचं तमाशावर असलेलं प्रेम सर्वज्ञात आहे. केवळ तमाशा या कलाप्रकारावर प्रेम करून ते थांबले नाहीत; तर तमाशा कलावंतांना आपलं गणगोत समजून त्यांच्या हक्कांसाठी लढायला कायम सोबत उभे राहिले आहेत. तमाशा कलावंतांसाठी दिला जाणारा अत्यंत मानाचा जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात डॉ. खेडलेकर यांचा मोठा वाटा आहे. त्यासाठी त्यांनी सरकारदरबारी सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. आपली कला अत्यंत मौल्यवान आहे आणि तिचा वारसा जपत आपण अत्यंत सन्मानाचं जीवन जगलं पाहिजे. कोणत्याही सबबीवर लाचारीचं जीवन जगायचं नाही, असं या कलावंतांना ते आग्रहाने सांगत असतात. तमाशाप्रति असलेल्या या तळमळीतूनच डॉ. खेडलेकर यांनी वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं चरित्र लिहून काढलं. कांताबाई यांच्या माध्यमातून तमाशा कलावंतांचं पडद्यामागील जीवनवास्तव काय असतं, हे त्यांनी प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 
    एक छानसं नाजूक घुंगरू लावलेल्या रेशमी बुकमार्कसह हे पुस्तक आपल्या हाती पडतं. आपण ते उत्सुकतेपोटी वाचायला घेतो आणि चक्क वाचून पूर्ण होईपर्यंत खाली ठेवतच नाही. हे एक छोटेखानी चरित्र आहे तमाशाचा लौकिक आसेतुहिमाचल पसरवणार्‍या कांताबाई सातारकर यांचं. महाराष्ट्राची लोककला असं ज्या कलाप्रकाराचं सार्थ वर्णन केलं जातं तो तमाशा फार बारकाव्यांसह लेखकाने या पुस्तकात टिपला आहे. समाजात जागृती करण्याचं काम संत पंत व तंत ही तीन मंडळी करतात. संत मंडळींनी अध्यात्माच्या माध्यमातून समाजजागृती केली. पंत मंडळीदेखील आपापल्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. तर तंत म्हणजे तुणतुणे वाजविणारे किंवा तमासगीर. ज्यांनी समाजातल्या तळागाळातल्या माणसांना आपल्या तमाशाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देऊन जागृती केली आहे. हीच जागृती कांताबाई व त्यांची पुढची पिढी गेली सहा दशके अखंडपणे करीत आहेत. 
    गुजरातमधल्या बडोद्याजवळच्या टिंबा नांवाच्या एका छोट्याशा गांवापासून या चरित्रातील कथानक पुढे सरकते. खाणकामगार असलेल्या साहेबराव आणि चंद्रा कांबळे या मुळच्या महाराष्ट्रीय जोडप्याच्या पोटी जन्माला आलेल्या मुलीचं नांव ठेवलं गेलं मदिना. परिस्थितीच्या रेट्याने तिला पायांत घुंगरं बांधायला भाग पाडली. हीच घुंगरं पुढे या मुलीचे जीवाभावाचे मैतर बनले. मदिना या मुस्लीम नांवामुळे तमाशात काम करणं कठीण झालं तेव्हां मदिनाची ‘कांताबाई’ झाली.
    ‘कलाकारानं आपलं कायीतरी निर्माण केलं पायजे. दुसर्‍याची नक्कल म्हंजी उष्टं खाणं. जो सोता कायीतरी निर्माण करतो, तोच खरा कलाकार... बेटा, आयुष्यात आसं कायतरी कर... लोकांनी नांव काढलं पायजे..!’ ही शांताराम मास्तरांची शिकवण कांताने आयुष्यभर उराशी जपली आणि खरोखरच तमाशाच्या क्षेत्रात फार मोठं नांव कमावलं.
    वगनाट्य सादरीकरण हा परंपरेने तसा पुरुषांकडून सादर केला जाण्याचा प्रकार. स्त्रियांनी वग सादर करण्याची पद्धत त्यावेळी नव्हती. परंतु, कांताबाईने हे शिवधनुष्य जाणीवपूर्वक उचललं आणि लीलया पेललं. तमाशात सरदार असणार्‍या कांताबाई या बहुतेक पहिल्या आणि शेवटच्या महिला कलाकार असाव्यात. तमाशातला सरदार हा पोवाडा सादर करतो, लेक्चर देतो आणि संपूर्ण तमाशावर एकप्रकारे नियंत्रण ठेवून असतो. आजवर हा प्रकार फक्त पुरुषांनी हाताळला आहे. कांताबाई त्याला सशक्त अपवाद ठरल्या. त्यांनी सदर केलेले वग तुफान लोकप्रिय झाले. पाच तोफांची सलामी, हरिश्चंद्र तारामती, गवळ्याची रंभा आणि रायगडची राणी अर्थात पन्हाळगडचा नजरकैदी, असे अनेक उत्तमोत्तम वग त्यांनी आपल्या मुख्य भूमिकेसह साकारले. तमाशासाठी नाट्यगृह देण्याची प्रथा नसलेल्या कर्मठ काळात पुण्यातील भरत नाट्यमंदिरात कांताबाईनी तमाशाचे हाऊसफुल प्रयोग घडवून आणले. इतकेच नव्हे तर त्यांच्या कार्यक्रमाला महिलादेखील फार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
    कांताबाई सातारकर यांचा हा सगळा प्रवास लेखकाने फार रसाळ शैलीत मांडला आहे. तमाशाच्या पडद्याआड असलेलं कांताबाई यांचं वैयक्तिक आयुष्य, तुकाराम खेडकर यांच्यासारख्या प्रतिभावान माणसाशी केलेला प्रपंच, पुढे कपाळी आलेलं क्रूर वैधव्य, अनंत आर्थिक अडचणी आणि या सगळ्या संकटांवर खमकेपणाने मात करून पुन्हा जोमाने आयुष्य उभी करणारी कांताबाई, ही सगळी जीवनकथा विलक्षण ऊर्जादायी आहे. 
    १९९१ साली झालेल्या माळेगांवच्या यात्रेतील खेडकरांच्या तमाशात राजीव गांधींच्या हत्येच्या प्रसंगावर एक वग बसवलेला होता. त्यावेळी वगासाठी आणलेल्या दारूगोळ्याचा स्फोट होऊन मोठी हानी झाली. जवळच्या माणसाच्या जीवाला मुकावं लागलं. अशाही दु:खाच्या क्षणी प्रेत पडद्यामागे झाकून ठेवून समोर तमाशा सादर करणार्‍या कांताबाई आणि त्यांच्या साथीदारांची आपल्या कामावर केवढी निष्ठा असेल याची कल्पना आपण करू शकत नाही. अतीव दु:खाच्या प्रसंगीसुद्धा स्टेजवर एन्ट्री घेणार्‍या आपल्या रघुवीर या मुलाला ‘लोक आपलं दु:ख ऐकायला येत नाहीत, त्यांचं दु:ख विसरायला येतात’ हे शब्द सांगणार्‍या कांताबाई केवळ कलावंत म्हणूनच नाही, तर माणूस म्हणूनदेखील आपल्याला अधिक उंच वाटू लागतात. 
    वग सादर करण्यासाठी यापूर्वी तमाशात कधी महिला उभ्या राहिल्या नव्हत्या. परंतु, कांताबाईनी हेच अवघड काम निवडून त्यात उत्तम कामगिरी करून दाखवली. कांताबाई यांचं काम जगापुढे आणण्यात डॉ. खेडलेकर यांचा मोठा वाटा आहे. 
    कीर्तनाने सुधारत नाही आणि तमाशाने बिघडत नाही अशी ख्याती असलेल्या महाराष्ट्रात तमाशा आणि लावणी म्हणजे लोकरंजनाचा अविभाज्य घटक समजले जातात. ज्याकाळी मनोरंजनाची इतर कोणतीही साधने उपलब्ध नव्हती, त्याकाळात थकल्या भागल्या खेडूतांसाठी तमाशा हे एक महत्त्वाचं मनोरंजन साधन होतं. तंत्रज्ञानाची क्रांती झाली तसे समाजजीवनात अनेक बदल झाले. सरकारी कायदेकानून कडक झाले. पर्यायाने तमाशाला आता पूर्वीचे दिवस राहिले नाहीत. अनेक नामवंत तमाशा फड बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तमाशा कलाकारांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होत चाललेली आहे. नव्या तंत्राच्या सोबतीने चालणं गरजेचं असताना त्याचा खर्च मात्र फडमालकांना झेपेनासा झालाय. अशा परीस्थितीत तमाशा आणि तमाशा कलावंत जगले पाहिजेत, त्यासाठी मजबूत प्रयत्न झाले पाहिजेत. म्हणून आपण सर्वांनी आपापल्या पातळीवर शक्य तेवढे प्रयत्न करायला हवेत, ही जाणीव आपल्याला हे पुस्तक वाचताना नकळतपणे होत राहते.
    या पुस्तकात काही प्रसंगांच्या दरम्यान काळाचा बराच मोठा गॅप दिसतो; तो अधिक प्रयत्नांनी भरून काढता आला असता, हा एक लहानसा दोष सोडता हे पुस्तक अत्यंत दर्जेदार झाले आहे. साधी ओघवती आणि प्रभावी भाषा हा खेडलेकर यांच्या लेखनाचा गुणविशेष आहे. या चरित्रातील काही प्रसंग त्यांनी इतक्या ताकदीने उभे केले आहेत की, भाषेत अजिबातही बटबटीतपणा येऊ न देता वाचकाच्या डोळ्यांत पाणी आणण्याचं सामर्थ्य त्यात आहे. 
    अलीकडच्या तमाशाचं वैभव लयास जाताना बघून त्याबद्दल कोरडे उमाळे दाटून येणार्‍यांपैकी डॉ. संतोष खेडलेकर नाहीत. तमाशावर त्यांचं नितांत प्रेम आहे. तमाशा आणि तमासगीर जगले पाहिजेत यासाठी त्यांनी कृतीच्या पातळीवर बरेच प्रयत्न केले आहेत. हयात असलेल्या तमाशा कलावंताच्या आयुष्यावर निघालेले हे कदाचित पहिलेच पुस्तक. याआधी लावणीसम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगांवकर यांच्यावर एक पुस्तक लिहिलं गेलं आहे. पण, त्यांच्या मृत्युनंतर त्यांचं काम पुस्तकरुपात उजेडात आलं. त्यामुळे विठाबाई यांना स्वतः त्या कामाचं कोडकौतुक बघता आलं नाही. हे लक्षात घेत डॉ. संतोष खेडलेकर यांनी कांताबाई सातारकर यांच्या हयातीतच त्यांचं जीवनचरित्र लिहिलं. आपल्या कामाचं कोडकौतुक कांताबाईंना याची देही याची डोळा अनुभवता आलं. 
    तमाशावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने आणि तमाशा अजिबातच अनुभवला नसेल त्यांनीसुद्धा डॉ. संतोष खेडलेकर यांचं ‘वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर’ हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं. तमाशा या कलेकडे अधिक आत्मियतेने आणि आदराने बघण्याची दृष्टी हे पुस्तक नक्कीच देईल.

पुस्तकाचे नांव- वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर 
लेखक- डॉ. संतोष खेडलेकर
प्रकाशक- शब्दालय प्रकाशन
पृष्ठे-१४४ 
किंमत- २०० रुपये.

~मनीषा उगले

Leave your comment