महिला शेतकरी संमेलन  लोकपंचायतने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही ‘स्त्री उत्सव’ आयोजित केला होता. ज्यात ‘महिला शेतकरी संमेलन’ आणि ‘आंतरराष्ट्रीय बोलीभाषा वर्षा’निमित्त ‘लोककला सोहळा’ या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या आहार तज्ञ डॉ अर्चना ठोंबरे, परभणी जिल्ह्यातील कृषी जैवविविधता विषयातील कार्यकर्त्या नंदा गायकवाड, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, लोकपंचायतच्या खजिनदार अ‍ॅड. ज्योती मालपाणी, बळीराजा कृषक प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र सांबरे व निर्मिती महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्ष तारा वामन आदि मान्यवर उपस्थित होते.
    आरोग्याच्यादृष्टीने आहार कसा असावा याविषयी मार्गदर्शन करताना डॉ. ठोंबरे म्हणाल्या की, आपण जे खातो त्यामुळे रक्त तयार होते. आपण जो व्यायाम करतो त्याने रक्त सगळीकडे पसरते आणि आपण जो श्‍वास घेतो त्यामुळे रक्त शुद्ध होते. ही सगळी प्रक्रिया सुरळीत ठेवायची असेल व शरीर निरोगी ठेवायचे असेल तर गावरान धान्य, भाजी, फळे यांचे सातत्याने सेवन केले पाहिजे. बाजरी, ज्वारी, नाचणी अशी तृणधान्य, हातसडीचे तांदूळ, विविध कडधान्ये यांच्या सेवनाने शरीर तंदुरूस्त राहाते. आहारात तंतूमय पदार्थांचा समावेश असेल तर रक्तात गुठळ्या तयार होत नाहीत, त्यामुळे हृदयविकाराचा त्रास होत नाही. विविध जीवनसत्वांमुळे आपले मज्जातंतू सशक्त राहतात. दुधी भोपळा, टोमॅटो, लिंबू आदिंचा आहारात नियमित समावेश करणे सर्व वयोगटातील स्त्री-पुरूषांसाठी अत्यावश्यक आहे. एकूणच आहारात कर्बोदके, प्रथिने व तंतूमय पदार्थ असतील तर तो आहार संतुलित आहार समजावा. संतुलित आहार, संयमित व्यायाम व मन:शांती ही सुखी जीवनाची त्रिसुत्री आहे, हा संदेश कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी उपस्थित महिलांना दिला. 
    आपले अनुभव कथन करताना श्रीमती नंदा गायकवाड म्हणाल्या की, आपणास अन्नसुरक्षा टिकवायची असेल तर गावरान बीज, मिश्र पीक पद्धती, सेंद्रिय शेती, पशुपालन व त्यांवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना बाजारपेठ अशी शाश्‍वत शेती पद्धत विकसित केली पाहिजे. केवळ नगदी पिकांच्या मागे न जाता स्थानिक वातावरणात येणारी पिके व टिकणारे पशुधन यांचे जतन-संवर्धन ही काळाची गरज आहे. शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबवण्यासाठी शाश्‍वत शेती हे एकमेव प्रभावी साधन आहे. महिलांनी न डगमगता आपणही शेतकरी आहोत ही ओळख सिद्ध केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी महिलांना दिला.
    लोकसाहित्याचे अभ्यासक प्रा. मा. रा. लामखडे यांनी स्थानिक भाषा व लोकसाहित्य या विषयावर सविस्तर मांडणी केली. ते म्हणाले की, स्थानिक भाषेतील पारंपरिक असे मौखिक साहित्य हे जैवसांस्कृतिक वारशातील महत्त्वाचे अंग आहे. गावरान वाणांप्रमाणे बोलीभाषाही अस्तंगत पावत आहेत. या लोकधनाचे पुढील पिढीला महत्त्व पटावं, यासाठी लोकपंचायतने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 
    या कार्यक्रमाला अहमदनगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्पातील महिला व पुरूष संवर्धक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी पारंपरिक गीते, कथा, उखाणे, हुमान आदि लोकसाहित्याचे सादरीकरण केले व हा समृद्ध वारसा संवर्धनासाठी नव्या पिढीकडे सोपवण्याचा निर्धार केला. स्त्री उत्सवाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनपंचायत, जागृत महिला मंच व लोकपंचायत कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. 

~संस्था वृत्त

Leave your comment