‘स्टॅन्डअप कॉमेडी’ शो    ‘स्टॅन्डअप कॉमेडी’ हा तसा ग्रामीण लोकांसाठीचा नवीन प्रकार आहे. त्याबद्दल लोकांना फारसं काही माहीत नाही. त्यामुळे, त्यात भाग घेणं तर दूरच. या प्रकारात शहरी लोक, त्यांचे प्रश्‍न जास्त मांडले जात असतात. म्हणून हा ‘कॉमेडी शो’ शहरात भलताच प्रसिद्ध आहे. हा कार्यक्रम ‘भाडिपा’ (भारतीय डिजिटल पाटी) यांनी यूट्युबच्या माध्यमातून महाराष्ट्रात फेमस केला आहे.
    ग्रामीण आदिवासी भागातील लोकांना ‘स्टॅन्डअप कॉमेडी’ काय असते, हे समजण्यासाठी आणि यामध्ये कुणालाही भाग घेता येण्यासाठीच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने अकोले तालुक्यातल्या उडदावणे गांवात ‘काय बोलताय’ या स्टॅन्डअप कॉमेडी शोचं आयोजन करण्यात आलं होतं. स्टॅन्डअप कॉमेडीयन मंदार, दर्पण, रोहित, मयुर यांनी कार्यक्रम सादर केला. लोकांच्या दैनंदिन जीवनातील अनुभव, प्रश्‍न, छोट्या छोट्या घटना-किस्से विनोदी आणि खुमासदार शैलीत या कलाकारांनी मांडले. त्याला प्रेक्षकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. 
    कार्यक्रमाच्या सुरूवातीला संगमनेरच्या ‘जाणीव जागृती कलामंच’ आणि मुंबईच्या ‘एल्गार सांस्कृतिक मंच’ यांनी कार्यक्रम सादर केला. उडदावण्याच्या प्रसिद्ध कोंबड नृत्याने पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं. याप्रसंगी दिशा शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तर ग्रामस्थ भाऊराव उघडे, सखाराम गांगड, कुशाबा, शांताराम गिर्‍हे व पांडुरंग सोंगाळ यांनी अशा स्वरूपाचा कार्यक्रम आम्हाला प्रथमच बघायला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी शाहीर तुळशीराम जाधव, हनुमंत उबाळे, कृष्णामाई जाधव, विनायक पवार, ‘मरा’ (MARA) संस्थेचे निहाल व मुक्ती, एल्गार कलापथकाचे धम्म आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
    हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उडदावणेचे ग्रामस्थ व तरूण मंडळ तसेच पांजरेच्या कळसुबाई युवक मंडळाने सक्रीय सहभाग घेतला.

~संस्था वृत्त

Leave your comment