महामानवाचे द्रष्टेपण  डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘२६ जानेवारी, १९५० रोजी आपण विसंगतीने भरलेल्या जीवनाचा स्वीकार करीत आहोत. देशाच्या राजकीय जीवनामध्ये आपण समतेचा स्वीकार केला आहे. परंतु, सामाजिक व आर्थिक जीवनातील विषमता मात्र दूर झालेली नाही. देशाच्या राजकारणामध्ये ‘एक माणूस, एक मत’ व ‘एक मत, एक मूल्य’ हे तत्त्व आपण मान्य केले असले तरी आपल्या सामाजिक व आर्थिक व्यवस्थेमुळे ‘एक माणूस, एक मूल्य’ हे तत्त्व मात्र आपण अव्हेरले आहे. किती काळ आपण हे परस्परविरोधाने भरलेले जीवन जगणार आहोत? किती काळपर्यंत सामाजिक व आर्थिक समतेला आपण नाकारणार आहोत? सामाजिक व आर्थिक समता आपण दीर्घकाळ नाकारणार असू तर केवळ राजकीय लोकशाही धोक्यामध्ये लोटूनच आपण ते करणार आहोत. शक्य तेवढ्या लवकर आपल्याला ही विसंगती संपुष्टात आणावी लागेल. अन्यथा, या विषमतेचे चटके ज्यांना सोसावे लागत आहेत ते लोक, परिश्रमपूर्वक निर्माण केलेली राजकीय लोकशाही व्यवस्था उध्वस्त करतील.’ 
    भारताला राज्यघटनेची अमूल्य भेट देत असताना घटनेच्या शिल्पकाराचे हे उद्गार होते. देशाला प्रकाशाची वाट दाखविणार्‍या द्रष्ट्या प्रज्ञासूर्याच्या मुखातून बाहेर पडलेले हे शब्द म्हणजे राज्यकर्त्यांना दिलेला जागरूकतेचा इशारा होता. 
    आज या इशार्‍याकडे राज्यकर्त्यांनी डोळेझाक केल्याने, आर्थिक विषमता वाढवणारे वाढती बेरोजगारी, कामगार व शेतकर्‍यांचे शोषण, सामाजिक विषमता वाढवणारे दलित व स्त्रियांवरील अत्याचार यांना खतपाणी घातले जात आहे. त्यातूनच नक्षलवाद, कामगार शेतकर्‍यांची आंदोलने, दलितांमधील असंतोषाचा उद्रेक होत आहे. जगातील महान लोकशाही म्हणून ओळख असलेल्या आपल्या देशाला हे भूषणावह नाही. बाबासाहेबांची स्मारके उभारतांना त्यांच्या विचारांच्याबाबत जर राज्यकर्ते गंभीर नसले तर ते बाबासाहेबांचा वापर राजकीय दृष्टिकोनातूनच करू पहात आहेत, असा त्याचा अर्थ होतो.

~संपादक

Leave your comment