सुट्टी मिळेल का सुट्टी?    मी औरंगाबाद आणि मुंबई या दोन ठिकाणी राहते. दोन्ही ठिकाणच्या हाऊसिंग सोसायट्या मोठ्या आहेत. त्यामुळे लहान मुलांची वर्दळ बर्‍यापैकी आहे. बहुतांश मुलांची परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संपली. साहजिकच सोसायटीमधील गार्डनमध्ये दिवसभर मुलांची दंगामस्ती, क्रिकेट मॅचचा गोंधळ, आऊट-नॉटआऊटमुळे होणारे छोटेछोटे वाद कानावर पडतात. दुसरीकडे घरातून आई, आजीचा जेवायला बोलवायचा, उन्हात खेळू नका यासाठीचा आवाज ऐकू येतो. हे चित्र साधारण मुलांची परीक्षा झाल्यावर दहा पंधरा दिवस दिसून येतं. त्यानंतर मुलांचा आवाज कानी पडत नाही. सोसायटीमधील पालक भेटल्यावर त्यांना मूल कुठे आहे असं विचारलं तर मुलांना समर कॅम्पला पाठवलं म्हणून एक कॉमन उत्तर सगळ्यांकडून येतं. यातील काहीजण एकाने आपल्या मुलांना समर कॅम्पला पाठवलं म्हणून आम्ही पाठवलं, असे सांगतात. मुलांना समर कॅम्पला पाठवण्याचा उद्देश काय, हे विचारलं तर दोन-तीन प्रकारची उत्तरं पालकांकडून येतात. एकतर मुलं बिझी राहतात. दुसरं, मुलं उन्हात फिरत नाहीत. तिसरं, घरी असले की नुसते टीव्ही पाहतात किंवा झोपतात. चौथं, कॅम्पमुळे त्यांच्यात सुधारणा होते. पाचवं, बाहेर राहिल्यामुळे त्याला / तिला कसं वागायचं हे समजतं. सहावं, बाहेर गेल्यावर मूल शांत राहतं. सातवं, समर कॅम्पमुळे त्याच्या / तिच्या पर्सनॅलिटीत फरक पडतो. आठवं, आमचे शेजारी त्यांच्या मुलाला पाठवतात म्हणून आम्हीही पाठवतो. नववं, समर कॅम्पमध्ये मुलांना खूप नवीन नवीन गोष्टी शिकवतात. दहावं, समर कॅम्पमध्ये मुलांकडून सगळं काही करवून घेतात. समर कॅम्पचं समर्थन करणारी अशी अनेक उत्तरं पालकांकडून ऐकायला मिळतात.
    आता नुकतेच समर कॅम्पचे वारे वाहू लागले आहेत. यात डान्स, गेम्स, ऑलिंपियाड गणित, योग वर्ग, चित्रकला, व्यक्तिमत्व विकास, कराटे वर्ग आणि यात आणखी भर पडली आहे ती संस्कार वर्गांची!
    उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि बालके म्हणून या सगळ्याचा विचार केला किंवा स्थिती पाहिली तर समर कॅम्पचं खूळ काय आहे? समर कॅम्प नक्की कोणाला हवे आहेत? पालकांना, की मुलांना? व्यक्तिमत्व विकास (शिीीेपरश्रळींू वर्शींशश्रेिाशपीं) व्हायला वर्षानुवर्षे लागतात; समर कॅम्पमुळे ते अवघ्या १५ दिवसातच होणार का? सुरुवातीपासूनच कच्चे असलेले गणित १५ दिवसांतच पक्के होणार का? वेदपठण, डान्स हे वर्षभरच चालतात. मग १५ दिवसांतच बालकांना यात प्राविण्य प्राप्त होईल का? दफ्तर, शाळेचा अभ्यास, कोचिंग क्लासेसचा ताण यामुळे आधीच पाठ आणि पोट एक झालेल्या बालकांना समर कॅम्पमध्ये पाठवून नक्की काय साध्य होणार? अशा अनेक मुद्यांवर विचार करणे गरजेचे आहे.
    या समर कॅम्पच्या निमित्ताने बालक, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधून त्यांना काय वाटतं, समर कॅम्पच्या बाबतीत त्यांची भूमिका काय आहे? यावर संवाद साधला त्यातून त्यांनी व्यक्त केलेले विचार त्यांची भूमिका याठिकाणी देत आहे. 
बालकांची मते, विचार आणि भूमिका :
    नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या मित्रांच्या गटासोबत भेट झाली. यामध्ये एकूण २४ जण होते. दहावीचं वर्ष म्हणून आईवडिलांनी बालकांशी सतत संपर्क ठेवण्यासाठी मोबाईल फोन घेऊन दिला होता. यातील विपुल बास्केट बॉल खेळात हुशार. त्याने सांगितलं, जशी शाळा सुरू झाली तसं कुणीही भेटलं, की तुझं दहावीचं वर्ष आहे, अभ्यास नीट कर, हेच सांगत होते. मम्मी-पप्पांचा फोन आला की, शाळेचा अभ्यास काय? क्लासमध्ये काय शिकवलं, हीच विचारणा करतात. शाळेतून घरी येईपर्यंत चार फोन करतात. त्यामुळे, आमच्या सगळ्या फ्रेंड्सनी व्हॉटस्अपवर ऊळीींीरलींळेप षीेा डडउ असा ग्रुप तयार केला. यावर आम्ही आमचे आईवडील आम्हाला कसे अभ्यास करण्यासाठी मागे लागतात यावर जोक करतो. आता आमच्यासाठी समर कॅम्प का महत्त्वाचा आहे, हे पालक कसं सांगतात, यावर आम्ही जोक करतो. त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने मजा करतो. आम्ही अभ्यास करतो, हे पालकांना लक्षात येत नाही. अभ्यासासोबत खेळ महत्त्वाचा आहे, हेही समजून घेतलं पाहिजे. आम्ही मित्रांना भेटतो, बोलतो तेव्हां फक्त मस्ती करत नसतो तर चर्चासुद्धा करत असतो. आमचे विषय मोठ्या लोकांसारखे नसतील. पण, आमच्या शाळेत जर आमच्या मित्राला शिक्षक रागावले, इतर मुलांनी भांडण केलं, त्याच्या घरी आईवडिलांचं भांडण झालं तर आम्ही त्यावर बोलत असतो. मम्मी-पप्पांचं भांडण झालं की, आम्हाला भीती वाटते. हे भांडण वाढलं आणि ते आम्हाला सोडून गेले तर याचं टेंशन येतं यावर आम्ही बोलत असतो. हे आम्ही मम्मी-पप्पाला नाही सांगू शकत. हे आमच्या फ्रेंडशीपमधलं सिक्रेट असतं. समर कॅम्पमध्ये जाऊन आम्ही मस्तीच करतो. डान्स कधी कधी रीलॅक्स होण्यासाठी करायचा असतो तर पालक त्याला आमची हॉबी म्हणून जबरदस्ती करतात. या ग्रुपमधील रोहन सांगत होता, मी चौथीला होतो तेव्हां मला समर कॅम्पला पाठवलं होतं. त्यावेळी पहिल्यांदा मी घराबाहेर मम्मी-पप्पाला सोडून राहिलो होतो. चार दिवस राहून मी कॅम्प अर्धवट सोडून घरी आलो होतो. कॅम्पच्या सरांनी माझ्या मम्मी-पप्पाला हा मुलगा काहीच करू शकत नाही, हे सांगितलं. तेव्हांपासून अभ्यासात मला कमी मार्क मिळाले किंवा माझ्याकडून काही काम नीट झालं नाही तर मम्मी-पप्पा नेहमी मला तू काहीच करू शकत नाही, असे बोलतात. मम्मी-पप्पा रागावतात त्याचं मला काही वाटत नाही. पण मी काहीच करू शकत नाही, असं बोलले की खूप राग येतो. 
पालकांची मते, विचार आणि भूमिका : 
    सायली खूप चांगल्या प्रकारे विविध प्रकारची हस्तकला करते. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू करण्यात तिला आवड आहे. तिची आवड पूर्ण व्हावी म्हणून तिला तिच्या पालकांनी हस्तकलेचे क्लासेस लावले. पालकांच्या मते तिची आवड त्यांनी जोपासली होती. तिने अजून चांगल्या प्रकारे हस्तकला शिकावी ही भूमिका होती, तर सायलीला हस्तकला तिला जशी सुचते त्याप्रकारे शिकायची होती. बालकांची आवड आणि त्याप्रमाणे पालकांनी क्लासेस निवडणे, हे आम्ही मुलांच्या आवडीनुसार करतो, असं पालकांचं मत आहे. समर कॅम्प पालक म्हणून यासाठीच महत्त्वाचे वाटतात की, त्याठिकाणी पंधरा दिवसांत मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकता येतात. यातून त्यांचा कल काय आहे, हे समजून घेण्यासाठी मदत होते, अशी पालकांची भूमिका होती. तर काही पालकांनी आपले मूल घरी रिकामे बसून राहू नये म्हणून समर कॅम्पला पाठवतो, असं मत व्यक्त केलं. काही पालकांच्या मित्रमैत्रिणींनी त्यांच्या मुलांना समर कॅम्पला घातलं म्हणून यांनीही यांच्या मुलांना समर कॅम्पला घातलं, असं सांगितलं.
शिक्षकांची मते, विचार आणि भूमिका : 
    यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘शिक्षण विकास मंच’ हा व्हॉटस्अप ग्रुप चालवला जातो. या ग्रुपवर राज्यातील अनेक भागातील प्रयोगशील शिक्षकांचा सहभाग आहे. या ग्रुपवर शिक्षकांच्या व्हॉटस्अप ग्रुपवरील चर्चेचे एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. समर कॅम्पच्या वाढत्या क्रेझबद्दल शिक्षकांची मतं काय आहेत, यासाठी काही शिक्षकांशी बोललो तेव्हां त्यांनी मुलांसोबत शाळेत केलेल्या प्रयोगाचा अनुभव सांगितला. मीरा तेंडुलकर प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद शाळा झरी केंद्रातील झरी धांगडपाडा, झरी वळवीपाडा आणि झरी पाटीलपाडा येथील शाळेत मुलांसोबत त्यांचे वेगवेगळे गट करून त्यांना कपड्यांचे दुकान, भाजीपाला दुकान, किराणा दुकान, मच्छी बाजार आणि इतर दुकानांतील व्यवहार कसे होतात, याविषयी प्रश्नावली तयार करून त्यानुसार माहिती मिळवण्यास सांगितली. मुलांनीही दुकानदाराशी चर्चा करून सगळी माहिती मिळवली. यानंतर ही माहिती मुलांनी त्यांच्या गटागटात एकमेकांना दिली. याचा उद्देश काय, तर मुलांनी खरेदी करताना ज्ञानरचनावादी व्यवहार समजून घेतला. मुलांसाठी समर कॅम्पऐवजी उन्हाळी सुट्टीत नावीन्यपूर्ण प्रयोग करू शकतो. ज्योती जाधव या शिक्षिका सांगत होत्या, मी माझ्या विद्यार्थांना सुट्टीत नेहमी वेगवेगळे प्रकल्प करायला देते. ते प्रकल्प त्यांनी शाळा सुरू झाल्यावर आठ दिवसांत वर्गात आणून दाखवायचे आणि तो प्रकल्प करत असताना त्यांना काय वाटलं, माहिती कशी जमा केली, कोणाकोणाची मदत घेतली, काय गमतीजमती झाल्या आणि आपण त्यातून काय शिकलो. यामुळे मुलांमध्ये सगळ्यांसमोर बोलायचं धाडस ज्याला आपण स्टेज डेअरिंग म्हणतो, ते तयार होतं. आपल्याला माहिती मिळवायची आहे त्यासाठी मुलं इतरांशी संवाद साधतात आणि मुलांच्या सुट्टीचा प्रकल्प हा घरच्यांसाठीही गेटटुगेदर होऊन जातो. कोणती माहिती जास्त छान आहे यावर चर्चा होते. त्यामुळे, अधिक चांगली माहिती मिळवण्यासाठी मुलं धडपड करत असतात.
    मुलं, पालक आणि शिक्षक म्हणून समर कॅम्पच्या फॅडचा विचार करायचा झाला तर आपल्याला पालक म्हणून मुलांकडून नेमकं काय अपेक्षित आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आपलं मूल चांगलं असावं, त्याने/ तिने यशाची शिखरं गाठावी ही भावना योग्य आहे. पण, हे सगळं करत असताना आपलं मूल भावनिकदृष्ट्या कमकुवत होणार नाही, त्याचा विकास हा मानवी मूल्यांवर आधारित असेल हे पाहणं, ही खरी गरज आहे. आपण बालकांचे हक्क जोपासणं गरजेचं आहे. त्यासाठी काही गोष्टी आपण केल्या पाहिजेत.
१) शाळेत वेळेवर पोहोचायचे, बस निघून जाईल या धाकामुळे झोप न होणार्‍या मुलांना सुट्टीत निवांत झोपू द्या.
२) सुट्टीत मुलांना वेळ द्या. स्वतः जवळून दूर करु नका. प्रत्येक गोष्टीत सहभागी करुन घ्या.
३) जुन्या पुरान्या पुस्तकांतून चित्र रंगवणे, वृत्तपत्रातील संस्काराचे मोती, बोध कथा वाचायला शिकवा.
४) व्हिडिओ गेम खरेदी करण्यापेक्षा जुने पारंपरिक खेळ खेळायला शिकवा. 
५) ओतीव कागद, रंगकांड्या, गोष्टींची पुस्तके, क्ले (माती) इत्यादी आणून, त्यांच्याकडून वेगवेगळ्या वस्तू करून घ्या. 
६) घरी बिनधास्त उड्या मारू द्या, खोड्या करु द्या, मनसोक्त बागडू द्या.
७) मामाचे, मावशीचे गांव एकाच गांवात असले तरी चार दिवस अवश्य जाऊ द्या.
८) रात्री घराच्या गच्चीवरच का असेना, अंथरूण टाकून रात्रीचं चांदणं न्याहाळू द्या. 
९) निसर्गाच्या सानिध्यात माती, चिखल, पाणी, गड, किल्ले, नद्या, डोंगर, शेतीवाडी यांच्याशी एकरूप होऊ द्या.
१०) पुस्तकातील जग प्रत्यक्षात अनुभवण्यासाठीच तर मानसशास्त्र आणि विज्ञानाच्या निकषांवर सरकारने एवढी मोठी सुट्टी निश्चित केलेली आहे; त्याचा उपभोग घेऊ द्या. 
११) उन्हाळी शिबिरांच्या गोंडस नांवाखाली मुक्तपणे उमलणार्‍या फुलांना चुरगळून टाकू नका.
१२) आपल्या मुलांना निसर्गाच्या वेगाने वाढू द्या. निसर्गात माणूस सोडून आजपर्यंत इतर कोणत्याही झाडांना, प्राण्यांना अशी शिबिरे घ्यावी लागत नाहीत.
१३) सुट्टीचा उपयोग आपल्या मुलांची आपल्या सर्व नातलगांशी असलेली नाती घट्ट करण्यासाठी झाला तर सर्वच सुखदुःखात मुलांना अनेक आधारस्तंभ हक्काचे उभे राहतील.
१४) घरातील व्यक्तींनी मुलांशी मित्राप्रमाणे वेळ घालवला तर बाहेरच्या मित्रांची शोधाशोध मुलं करणार नाहीत. 
१५) तुमच्या लहानपणी तुम्ही खेळलेले खेळ जे आज आपण विसरत चाललो आहोत ते आपल्या मुलांशी खेळा.
१६) आपल्या मुलांनी आपलं ऐकावं, असं वाटतं; तसेच मुलांचे म्हणणेही ऐकून घ्या.
१७) सुट्टीचा जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत राहा.
१८) घरातील छोटीछोटी कामे मुलांना शिकवा. 
१९) मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे म्हणून त्यांना तुमच्यासोबत बँक, पोस्ट अशा ठिकाणी घेऊन जा. 
२०) ट्रेन आणि बसचे आरक्षण कसे करावे, यासाठी मुलांना प्रत्यक्ष स्टेशन आणि इंटरनेटद्वारे आरक्षण करणे शिकवा. 
२१) ट्रेनचा नंबर, नांव, स्टेशन कोड कसे असतात, हे पहायला शिकवा.
    अशी अनेक कामे, छोट्या छोट्या गोष्टी आपण मुलांना सुट्टीत शिकवू शकतो. यातून घरी राहण्याचा, आपल्या माणसांत राहण्याचा, आजी-आजोबांच्या प्रेमाचा आधार मुलांना सकारात्मक विचार आणि चांगला व्यक्ती होण्यासाठी उपयोगी ठरू शकेल, असं वाटतं. विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात मानवी गर्भाच्या जनुकांवर सारखं संशोधन करून निसर्गात: जन्माला येणार्‍या बाळांना नाकारण्याचे ‘डिझायनर्स बेबी’सारखे भयानक शास्त्र तयार होऊ पाहत आहे. या सगळ्यात आपल्या पाल्यांना आपण एक माणूस म्हणून आपलं चांगलं अस्तित्व काय आहे, ही मूल्यं रुजवण्याची गरज आहे. 

~रेणुका कड

Leave your comment