सुटी घरातली आणि मनातली    वर्षभर मुले आणि पालक ‘रुटीन’ नांवाच्या चाकोरीत गरगरत असतात. जो तो आपापल्या व्यापात. दिवसभरात घड्याळाचे दोन काटे जसे एकमेकांना फारच कमी वेळा आणि कमीवेळ भेटतात तसंच मुलांचं आणि पालकांचं दहा महिने सुरू असतं. पण जेव्हां सुटीची चाहूल लागते तेव्हां पालकांची खरी कसोटी लागते. कारण, आता सुटी सुरू होणार म्हणजे एका काट्याची गती मंदावणार आणि दुसर्‍या काट्याची गरगर मात्र तशीच सुरू असणार. म्हणूनच घराचा बॅलन्स सांभाळण्याची ही वेळ खूप महत्त्वाची असते.
    ‘आता इतक्या मोठ्या सुटीत करायचं काय?’ असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. ‘यांना कुठेतरी बिझी ठेवलं पाहिजे’ असंही पालकांना वाटू लागतं. मुलांविषयीच्या अनेक शंका-कुशंका त्यांच्या मनात दाटून येतात. उदा. आता हा उशिरा उठणार, दिवसभर टाइमपास करणार, गादीवर लोळत मोबाईलवर गेम खेळत बसणार आणि संध्याकाळी सायकली फिरवत बसणार इ.
    पण तरीही या सगळ्यापेक्षा पालकांना भीती वाटते ती ‘मोबाईल’ नांवाच्या राक्षसाची. काही ठिकाणी अगदी लहानपणीच मुलांना या ‘राक्षसा’ची ओळख ‘मित्र’ म्हणून पालकांनीच करून दिलेली असते. उदा. जेवत नाही तर ‘लाव मोबाईलवर गाणं. अभ्यास झाला असेल तर आता खेळ मोबाईलवर थोडावेळ गेम. रडू नकोस पण हा घे मोबाईल.’ जेव्हां लहान वयातच मुलगा सफाईदारपणे मोबाइल वापरू लागतो तेव्हां पालक त्याचं तोंडभरून कौतुक करतात. पण हा मित्र मोबाईल जेव्हां राक्षस होऊन डोक्यावरच बसतो, तेव्हां मात्र पालक हादरतात. कारण, मुलगा मोबाईलवर काय काय पाहतो, हे त्यांना समजत नाही. मोबाईलवर कुठले खेळ, कितीवेळ खेळतो याचा अंदाज येत नाही. मुलगा सतत मोबाईलवरच असतो, हे पालकांना आवडत नाही. यासाठी सुटीत मुलांचा मोबाईल परत घेणं हा त्यावरचा उपाय नव्हे. तर मुलांना योग्य तर्‍हेने मोबाईल वापरायला शिकवणं, हे पालकांकडून अपेक्षित आहे. यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, मुलांवर विश्वास ठेवणे. दोन, आपल्या बोलण्यातून नव्हे तर आपल्या कृतीतूनच मुलांना शिकवणे.
    आपण जेव्हां मुलांवर विश्वास ठेवतो तेव्हां मुले बेताल वागण्याचा संभव असतो. पण अशावेळी न भडकता, न चिडता आणि मुख्य म्हणजे न शिक्षा करता मुलाला चूक सुधारण्याची संधी द्यावी लागते. आता तुम्ही म्हणाल किती वेळा? तर याचे सोपे साधे उत्तर आहे अनेक वेळा! होय हे खरं आहे! कारण प्रेमाची अत्त्युच्च पातळी ही शासन करणे नव्हे, तर माफ करणे आहे. मुलांना वारंवार सुधारण्याची संधी द्यावी लागते. लक्षात घ्या, ज्या क्षणी मुलांना तुमच्या निरपेक्ष प्रेमाची खात्री पटते त्याचक्षणी मुले पूर्णत: बदलेली असतात. समजून घ्या की ही सुटी त्यासाठीच आहे!

मोबाईलच्या वापरासंबंधात एक टीप : 
    प्रत्येकाचे मोबाईल पाहण्याचे म्हणजे ‘स्क्रीन टाइम’चे वेळापत्रक सर्व घराने मिळून संमत करुया. जे सर्व घरासाठी असेल आणि सर्वांसाठी बंधनकारक पण असेल. जर याबाबत चूक झाली, तर मोकळेपणाने कबूल करूया आणि स्वशासन आणि स्वयंशिस्त याचा अनुभव घेऊया.
    काहीवेळा पालकांना असं वाटतं की, आत्ताच मी काही केलं नाहीतर हा मुलगा सुटीची वाट लावणार. अशावेळी पालकांना आपले लहानपणचे सुटीचे अहाहा!! दिवस आठवतात. विटी-दांडू, लगोरी, गोट्या खेळणं, नदीत पोहणं, झाडावर चढणं, जांभळं खाणं, डोंगरावर जाणं वगैरे. अनेक पालक मुलांना खिंडीत गाठून त्यांच्या लहानपणीच्या या गोष्टी मुलांना वारंवार सांगत राहतात. पण त्याचा मुलांवर काहीच परिणाम न झाल्याने मग ते बेचैन होतात.
    कृपया, तुमचा भूतकाळ एखादवेळेस गोष्ट म्हणून किंवा गंमत म्हणून मुलांना सांगणं ठीक आहे. पण तो सतत उगाळत बसू नका. त्यामुळे मुलं अजिबात प्रेरित तर होत नाहीतच, पण पार कंटाळून जातात. लक्षात ठेवा, मुलांना भूतकाळ नसतो. मुले वर्तमानात जगतात आणि भविष्याचा वेध घेत असतात. मुलांशी बोलताना भविष्यातील नियोजनाविषयी बोला, मग ती तुमचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतील.
    काही पालक मुलांना बिझी करण्यासाठी ते मुलाचा कल लक्षात न घेता किंवा त्याची आवड समजून न घेता त्याला एखाद्या शिबिरात, छंदवर्गात किंवा संस्कार वर्गात अडकवतात आणि सुटकेचा श्वास सोडतात. जे पालक मुलांवर विश्वास ठेवायला कचरतात तेच पालक असा आततायी निर्णय घेऊ शकतात. 
    आपलं मूल एक स्वतंत्र व्यक्ती आहे. आपल्या मुलाच्या आशा आकांक्षा किंवा त्याच्या आवडी निवडी या आपल्यापेक्षा वेगळ्या असू शकतात, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच आपण कुठलीही कृती करू तेव्हां त्यातून आपल्या मुलाचा आत्मगौरव आपणच राखला पाहिजे आणि त्याचा आत्मसन्मानही जपला पाहिजे.
    मुलांबाबतचा कुठलाही निर्णय घेताना तो घराने घेतलेला निर्णय असला पाहिजे. तो व्यक्तीकेंद्री नाही तर मूलकेंद्री असला पाहिजे. पालकांच्या अपुर्‍या इच्छा पूर्ण करण्याची जवाबदारी मुलांवर नाही किंबहुना ते त्यांचे कामच नाही. 
    मला जे जे लहानपणी मिळालं नाही ते ते मी माझ्या मुलाला देण्याचा सतत प्रयत्न करत असतो; पण त्याचीच घेण्याची तयारी नाही. म्हणजेच, आम्ही मुलांसाठी इतकं करतो पण त्याची त्यांना किंमतच नाही, असं जेव्हां पालकांना वाटू लागतं तेव्हां त्यांच्या अहंकाराचा फुगा फुगलेला असतो.
    आपल्याला जे जे वाटतं ते ते मुलाने करावं, असं पालकांना वाटणं साहजिकच आहे. यात गैर काहीच नाही. पण या आग्रहाचे दुराग्रहात किंवा हट्टात रुपांतर होता कामा नये. कारण, अजूनही अनेक पालक ‘विंडो ९५’ मधेच अडकलेले आहेत. पण, त्यांची मुले मात्र ‘विंडो १०’ मधे कधीच पोहोचली आहेत. ही ‘डिजिटल जनरेशन गॅप’ खूप मोठी आहे. आपल्याच मुलांशी समन्वय साधण्यासाठी पालकांनी स्वत:ला अपडेट आणि अपग्रेड करण्याची गरज आहे. इथे पालकांनी दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. जेव्हां पालकांनी सांगितलेली गोष्ट मुलांना पटत नाही अशावेळी पालकांनी मुलांचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तरीही मार्ग निघत नसेल तर घरातील सर्वांनी मिळून त्यातला सुवर्णमध्य शोधला पाहिजे. यासाठी मुलांना आपलं म्हणणं निर्भयपणे मांडता येईल, असं मैत्रीपूर्ण वातावरणही घरात असलं पाहिजे.
    सुटी ही एक संधी आहे मुलांना वेगवेगळ्या माध्यमांची ओळख करुन देण्याची. त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करण्याची; पण सक्तीने शिकवण्याची नव्हे! 
    पालकांनी सुटीसाठी एक मंत्र लक्षात ठेवायलाच हवा, या सुटीत मुलांना सतत काय कर ते सांगू नका. तू काय करायचं ठरवलं आहेस, त्यासाठी मी काय मदत करू शकतो असं विचारा. मग काय-काय केलंस आणि काय नवीन शिकलास हे ही विचारा.
    लक्षात घ्या, मुलांना जर तुम्ही सतत हे कर, ते कर, असं कर नि तसं कर, असं सांगत राहिलात तर थोड्याच दिवसांत मुलं आपलं डोकं वापरणं विसरुन जातील. शिकतील फक्त आज्ञा पाळणं. कुठलाही प्रश्न समोर आला तर त्यावेळी ते फक्त तुमच्या आज्ञेची वाट पाहात थांबतील. आजपासून आपण मुलांवर विश्वास टाकायला शिकूया. त्यांना त्यांच्या गतीने आणि त्यांच्या मतीने काम करण्याची वारंवार संधी देऊया. आपण जर मुलांना चुका करण्याची संधी दिली तरच त्यांना चुकांतून शिकण्याची हिंमत मिळते.
    ही मोठी सुटी घराला ‘शिकण्या’साठी मोठी संधी आहे, असा विचार करूया. या सुटीत मुलांसोबत शिकण्याच्या पध्दती कशा विकसित करता येतील असा विचार करूया. इतरवेळी जो तो आपापल्या पध्दतीने आणि आपापल्या वेळेनुसार स्वतंत्रपणे शिकत असतोच. पण सुटीत घराने मिळून ‘शिकण्या’चा प्लॅन तयार करुया. एकमेकांना शिकवणे बंद करून, एकमेकांसोबत शिकण्याचा आनंद घेऊया. घराने मिळून शिकण्याच्या प्लॅनमधील मी जरी चार गोष्टी तुम्हाला सुचवल्या तरी त्यापुढील १०० गोष्टी तुम्हाला नक्कीच सुचतील.
    दर रविवारी घरातील सर्वांचे मोबाईल सलग चार तास बंदच राहतील. ही वेळ ‘घराने’ ठरवायची आहे. रविवारी पेपरातील पुरवण्या हा अनमोल खजिनाच असतो. प्रत्येकाच्या आवडीचे त्यात काही ना काही असतेच. या चार तासात पेपर आणि पुरवण्या वाचणे, पुस्तक वाचणे आणि जे जे वाचले आहे त्याविषयी घरातल्या प्रत्येकाने एकमेकांशी बोलणे. 
    आठवड्यातून किमान दोन वेळा सगळ्यांनी सोबत जेवणे आणि जेवत असताना टिव्ही न पाहणे. टिव्ही बंद याचा अर्थ असाही आहे की टिव्हीवरील कुठल्याही कार्यक्रमाची चर्चाही न करणे.
    आपण सगळेच रोज काही ना काही शिकत असतोच. काहीवेळा ती शिकलेली गोष्ट इतकी छोटी असते की ती आपल्या लक्षातही राहात नाही. घरासोबत जेवताना आपण या आठवड्यात कुठल्या नवीन तीन गोष्टी शिकलो? कुठल्या दोन नवीन गोष्टी समजल्या? कुणाकडून शिकलो? कसं शिकलो? याविषयी मोकळेपणाने गप्पा मारता येतील. लक्षात घ्या, जेव्हां पालक आपलं शिकणं मुलांसमोर उलगडू लागतात तेव्हां साहजिकच मुलांची शिकण्याची आस वाढते.
    अनेक घरांत कामाच्या काटेकोर वाटण्या केलेल्या असतात. घरातील कुणीच एकमेकांना त्यांच्या-त्यांच्या कामात मदत करायची नाही, पण टीका मात्र करायची; अशावेळी घराचं घरपण संपू लागतं. या सुटीत आठवड्यातून किमान दोन तास सर्व घराने हातात हात घालून सर्वांनी सर्वांची कामं करायची आहेत. उदा. सर्वांनी मिळून भाजी निवडायची आहे. स्वयंपाकघरात किमान अर्धा तास काम करायचेच आहे. कपडे आणि पुस्तके यांची कपाटे आवरण्याचं काम ‘घराने’ मिळून करायचं आहे. हे घर आपलं आहे आणि या घरातील कामंही आपलीच आहेत हा अनुभव सर्वांनी मिळून घेताना, कामाचे श्रम जाणवत नाहीत तर नात्यातील गोडवा जाणवतो. सुटी यासाठीच तर आहे ना..?
    ‘घराने’ घराकडून आनंदाने शिकण्यासाठी ही सुटी आहे. घरातील नातेसंबंधांचा अधिक उत्कटपणे अनुभव घेण्यासाठी ही सुटी आहे. स्वत:मध्येच डागडुजी करण्यासाठी ही सुटी आहे. आपलं मन मोठं करत त्यात ‘घराला’ सामावून घेण्यासाठी ही सुटी आहे. ‘सुटी लहान-थोरांना एकाच पातळीवर आणते. सोबत जगण्याचा आणि नवीन शोधण्याचा एक मंत्र त्यांना देते’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल.

~राजीव तांबे

Leave your comment