जगावेगळे पालकत्व    सामाजिक कार्यकर्ते राणी बंग व अभय बंग यांना आपण त्यांच्या सामाजिक कामाबद्दल ओळखतो. पण, त्यांनी आपल्या मुलांना कसं घडवलं, याची एक रोमांचकारी कहाणी आहे. 
    बंग दाम्पत्याला दोन मुले. मोठा आनंद हा डॉक्टर तर छोटा अमृत याने  अभियांत्रिकीत पदवी घेतली आहे.
    युवकांना नवी दिशा देण्याचं जे काम ‘निर्माण’ या संस्थेतर्फे चालतं त्याचा तो प्रमुख आहे, असं म्हटलं तरी चालेल. या उंचपुर्‍या व प्रचंड आत्मविश्वासाने भरलेल्या अमृतची एक चकित करण्याजोगी गोष्ट आहे; ती म्हणजे तो दहावीपर्यंत शाळेतच गेलेला नाही. 
    लहान असताना एके दिवशी घरी येऊन छोट्या अमृतने जाहीर केलं की, मी शाळेत जाणार नाही. त्याच्या पालकांनी या गोष्टीचं कारण विचारल्यावर त्याने सांगितलं की, शाळेत जे शिकवलं जातं ते मला सर्व काही येत आहे. मला तो अभ्यास परत परत करायचा कंटाळा आला आहे.
    प्रथम घरच्यांना विश्वास बसला नाही. पण, वेगवेगळ्या प्रकारे त्याची परीक्षा घेऊन बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की तो शाळेच्या अभ्यासात किमान सहा महिने पुढे आहे. 
    काय करायचं हे ठरवत असतांना त्यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्याशी बंग दाम्पत्याने संपर्क साधला आणि अमृतला शाळा न करता फक्त परीक्षेपुरती शाळेत येण्याची परवानगी मिळेल का? ही विनंती केली. अमृतची हुशारी पाहून त्यांनी तशी परवानगी दिली.
    आता यापुढची खरी कसोटी होती. त्यांनी अमृतला सांगितलं की, शाळेतून जरी सुटका झाली असली तरी त्याला घरी रिकामं बसता येणार नाही. दिवसभर काय करायचं, याची यादी त्याला बनवायला सांगितली. त्यांनी सगळ्यांनी मिळून त्याची दिनचर्या आखली. त्यात अभ्यासाबरोबर, खेळ, मूल्य शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांची दिवसभरात आखणी करून त्याप्रमाणे तो चालतोय की नाही याची तपासणी केली.
    दहावीपर्यंत त्याने घरी अभ्यास करून बाहेरून परीक्षा दिली. बंग दाम्पत्य हे सामाजिक कामात असल्यामुळे वेगवेगळ्या लोकांची ‘सर्च’ या त्यांच्या संस्थेत वर्दळ असते. त्या लोकांकडून , त्यांच्या गप्पा, चर्चा यातून जे खरंखुरं शिक्षण असतं, ते अमृतला मिळालं. तिथल्या निसर्गात त्याची जडणघडण झाली. पुढचं शिक्षण मात्र महाविद्यालयात करून तो ‘इंजिनिअर’ झाला. 
    आपल्याला अशी शंका येऊ शकते की, त्याने शालेय शिक्षण बाहेरून घेतल्यावर त्याच्यात काही गोष्टींची कमतरता राहिली असेल. तर तसं काही नाही. त्याला भेटल्यावर लगेच कळतं की त्याचे विचार पक्के आहेत. त्याला काय करायचं आहे याच्या त्याच्या कल्पना स्पष्ट आहेत. त्याने पुण्यातली चांगली नोकरी सोडून आई-वडिलांबरोबर गडचिरोलीसारख्या दुर्गम ठिकाणी तरुण पिढीसाठी ‘निर्माण’ सारखे काम का सुरु केले, याबद्दलही त्याचे मत पक्के आहे.
    पालकांनी जर डोळसपणे ठरवलं तर उगाचच महागड्या शिक्षणामागे न लागताही आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देता येऊ शकतं. 
    असंच एक दुसरं उदाहरण आहे ते प्रसिद्ध समाजसेवक आणि लेखक डॉ. अनिल व त्यांच्या पत्नी सुनंदा अवचट यांचं. त्यांच्या दोन्ही मुलींचं मुक्ता आणि यशोदा यांचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेलं आहे. इतकंच नव्हे, तर मुक्तांगण संस्था सांभाळणारी मुक्ता पुणतांबेकर (अवचट) ही बारावीच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेली आहे. पुढच्या शिक्षणातही तिने सुवर्ण पदक मिळवलं आहे. 
    आज शिक्षण क्षेत्राचा बाजार झाला आहे. त्यात शिकलेले पालक विशेषत: शिकलेल्या आया या मुलांना घरी काय देता येईल यावर विचार करण्याऐवजी त्याला दिवसभर वेगवेगळ्या ‘क्लास’ला कसं अडकून ठेवता येईल, याचा विचार करत असतात. त्याला वेगळ्या ‘भारी’ बोर्डच्या शाळेत कसं घालता येईल, हे बघितलं जातं. याचा फायदा ‘शिक्षण सम्राट’ यांनी घेतला तर त्यात नवल नाही. भरमसाठ फी भरून मुलाला दिवसभर शाळेत अडकवायचं आणि घरी आल्यावर परत कोणत्या तरी ‘क्लास’ला पाठवायचं. अशी मुलं बघितली की आजकाल त्यांची कीव येते.
    गमतीत असं म्हटलं जातं की, वर्गात पुढच्या बाकावर बसणारे विद्यार्थी हे अतिशय हुशार असतात आणि मागचे त्यांच्यापेक्षा कमी हुशार किंवा ‘ढ’ असतात. पण, शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर मागच्या बाकावरचे विद्यार्थी काही ना काही उद्योग करतात आणि पुढच्या बाकावरचे विद्यार्थी त्यांच्याकडे नोकरी करतात. 
    आपलं सर्व शिक्षण होईपर्यंत वर्गातला विद्यार्थी हा आपला प्रतिस्पर्धी आहे, हे शिकवलं जातं. अशी आपली आजची शिक्षणव्यवस्था आहे. जेव्हां आपण शिक्षण घेऊन बाहेरच्या जगात नोकरी किंवा व्यवसाय सुरु करतो, तेव्हां लक्षात येतं की, आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं. तिथं आपल्याबरोबर काम करणार्‍याला प्रतिस्पर्धी मानून चालत नाही.

~महेश झंवर

Leave your comment