लग्न व स्त्रीमुक्ती   भारतीय संस्कृतीत लग्न हा एक पवित्र संस्कार मानला जातो, ज्यातून प्रजा उत्पत्ती होऊन आदर्श समाजाची निर्मिती होते. परंतु, अलिकडे तारूण्याच्या उंबरठ्यावर आलेल्या मुलामुलींना आपली नैसर्गिक भूक भागवण्याकरिता एकत्रित येण्याचा परवाना लग्नरूपाने दिला जातो. त्यात आपल्या मोठेपणाची शेखी मिरवली जाते. अशा लग्नाची प्राथमिक सुरूवात ज्या पद्धतीने केली जाते, तो सोहळा पाहिल्यावर आधुनिक युगात वावरणार्‍या समाजाची कीव करावीशी वाटते. मुलगी लग्नाला आली, की लग्नाच्या बाजारात तिला गिर्‍हाईक शोधलं जातं. हौशा, गवशा, नवशा सापडला, की पुढील कार्यक्रमाला सुरूवात होते.
    थोरामोठ्यांच्या घोळक्यात नटून थटून आणलेल्या बाहुलीला काही क्षण बसवून तिच्यावर पारंपरिक प्रश्‍नांची सरबत्ती केली जाते. मनात असो वा नसो लग्न सोहळा उरकला जातो नि मुलीला घराच्याबाहेर काढलं जातं. म्हणूनच आमचे मित्र मोकळ साहेब आपल्या ‘तत्व चिंतन’ या पुस्तकात लिहितात की, भरजरी मांडवाच्या छताखाली वाजंत्रीच्या तालासुरात हजारो माणसांदेखत आम्ही आमच्या मुलींना विकतो, त्याला आम्ही लग्न म्हणतो.
    पन्नास टक्के सुसंस्कृत कुटुंबांतील समंजस मुले-मुली एकमेकांशी जुळवून घेवून आपलं वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध करतात. परंतु, जगात चांगल्या प्रवृत्तीबरोबरच कूप्रवृत्तीही जन्माला आलेल्या असतात. अशा प्रवृत्तीकडून मुलींना गुलाम म्हणून वागवलं जातं. नवतीचे नऊ दिवस संपले की, संसाररूपी वेलीवर बहर येण्याअगोदरच तो कोमेजून जातो. भावनेच्या भरात झालेल्या संगतीमुळे एखादे गोंडस फळ जन्माला येते. हळूहळू खटके उडू लागतात. मन जुळत नाही, जीवनात अंध:कार येतो. तरी पण २०-२५% मुलं-मुली अशाच पद्धतीने जीवन जगत असतात. यातूनच सबलाची दुर्बलावर मात होते. मग काहींना जलसमाधी दिली जाते, काहींना अग्नीदेवतेच्या हवाली केले जाते तर काहींना मंगळसुत्र काढून फासाचा दोर गळ्यात टाकला जातो. यालाच आम्ही हुंडाबळी म्हणतो. २०-३०% मुलंमुली विद्रोह करून उठतात व एकमेकापासून दूर होतात. मुली आईबापाच्या घरचा रस्ता धरतात. वडिलांनी तिचा हक्क कधीच दडपलेला असतो. म्हणून तिला कोर्टाचा रस्ता दाखवला जातो. ५ ते १० वर्ष कोर्टाच्या पायर्‍या झिजवून तरूण मुले-मुली आपलं तारूण्य जाळतात. इतकंच काय, ज्यांनी आयुष्यात पोलिस स्टेशनची पायरी चढली नाही. अशा खानदानी सुशिक्षितांचा गुन्हा नसतांना जेलची हवा खावी लागते. पोटगी बसली की, देता येत नाही म्हणून शेकडो तरूण फरार होतात, तर काही आत्महत्या करतात. एवढा अनर्थ चालू असतांनाही समाज झोपलेला आहे. समाजसेवी संघटना काही घडल्यावर जाग्या होतात. हे जर असंच घडत राहिलं तर त्या मुला-मुलींचे गुन्हेगार आपण आहोत. रूढी परंपरेत गुंतलेला समाज, आईवडील, राज्यकर्ते, कायदे, समाजसेवी संघटनांबरोबरच स्त्री संघटनांसह आपण सर्व या अन्यायाला जबाबदार आहोत. यात बदल घडवला पाहिजे.
    इंग्लंड, अमेरिकासारख्या पाश्‍चात्य देशांत हे प्रकार घडत नाहीत, तर तिथे स्त्री-पुरूषांना कोणत्याही वेळेत, कोणत्याही कारणास्तव विभक्त होण्याची परवानगी कायदा देतो. स्त्रिया स्वावलंबी असतात. स्त्री-पुरूषांनासुद्धा दुसरा घरोबा करण्यात संकोच वाटत नाही. आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाश्‍चात्यांचं अनुकरण करीत आहोत. आता तर आम्ही आधुनिक जगात वावरत आहोत. रूढी परंपरांच्या हद्दी आम्ही पार केल्या आहेत. मग स्त्रियांच्याच बाबतीत आम्हाला संस्कृती का आठवते? प्रतिगामी विचारसरणी म्हणते की, व्यभिचार वाढेल. त्यांना असं विचारावंसं वाटतं की, व्यभिचार कोण करतो? स्त्री की पुरूष? ९५% व्यभिचार पुरूषाकडून घडतो. सर्व प्रकारची व्यसनं पुरूषांमध्ये असतात. म्हणूनच, अशा अपप्रवृत्तीपासून स्त्रीला मुक्ती मिळून तिला तिचा हक्क मिळाला, तर भारतीय स्त्री इतकी कमजोर नाही, की ती व्यभिचाराकडे वळेल.
    कायद्याने व परंपरेने स्त्री-पुरूषांना खरी मुक्ती दिली तर अनेक फायदे संभवतात. लाखो केसेस कोर्टातून बाहेर निघतील. पोलिसांची फारमोठी डोकेदुखी कमी होऊन त्यांनाही इतर गुन्हेगार शोधण्यास वेळ मिळेल. विशेष बाब म्हणजे या विषयात चाललेली सौदेबाजी व भ्रष्टाचाराला संपूर्ण आळा बसेल. हुंडा मागणीला पूर्णविराम मिळेल. लग्नात अवाढव्य खर्च होणार नाही. स्त्रीवाचून पुरूष राहू शकत नाही. त्यामुळे, इच्छेप्रमाणे पुनर्विवाह जुळण्यास अडचणी येणार नाहीत. मुलींचे जीव वाचतील व मुलेही आत्महत्या करणार नाहीत. वरील सर्व बाबींचा अभ्यास करून स्त्री संघटनांनी आपली दिशा ठरवावी असे वाटते. स्त्री-पुरूषांना खरी मुक्ती देऊनच स्वांतत्र्य मिळेल. 

~बिलाल हैदर पटेल

Leave your comment