विश्वास परस्परांवरचा...    दिवसाची सुरूवातच आज एका दु:खद बातमीने झाली. एका २७ वर्षांच्या तरुणाने ट्रेनखाली येऊन आत्महत्या केली. लग्नाला फक्त ६ महिने झाले होते. नंतर शेजारच्यांकडून कळलं की त्याच्या बायकोला विभक्त व्हायचं होतं. ती त्याच्या मागे लागली होती की, आपण दुसर्‍या घरात सासू-सासर्‍यांपासून वेगळं राहू. शेजारच्या काकूंनी त्या सुनेला नांवं ठेवायला सुरवात केली. काय आजकालच्या पोरी, त्यांना फक्त स्वातंत्र्यच हवं, सासू-सासर्‍यांची जबाबदारी नको, कुठलाही दबाव नको. बघा या नादापायी कसा जीव घेतला पोराचा! या काकूंचं म्हणणं वरवर पाहता काही अंशी खरं वाटत असलं तरी तुम्हीच सांगा, एकट्या सुनेला जबाबदार धरणं किती चुकीचं आहे. त्याने केलेली आत्महत्या हे टोकाचं वागणं असू शकतं. पण, इथं प्रत्येक जण असा का वागला, हे ही बघणं जरुरीचं आहे. बायको वेगळं राहण्याचा आग्रह/ हट्ट का करत होती? सासू-सासरे असे नेमके तिच्याशी कसं वागत होते? ही त्यांच्याशी कसं वागत होती? मागचा-पुढचा विचार न करता या मुलाने एवढा भावनावश होऊन चुकीचं पाऊल का उचललं असेल? यांच्यापैकी एकालाही एकमेकांशी मन मोकळं करावं, हा विचार का आला नसेल? 
    सासू-सुनेवरचे अनेक विनोद आपल्या वाचनात येत असतात. सासू-सुनेच्या नात्यावर ‘तू-तू मै-मै’सारखी मालिकासुद्धा निघाली होती. एका पुरुषाला आपलंसं करायला दोघीही जणी कशा नवीन-नवीन क्लृप्त्या शोधत असतात आणि त्यामध्ये त्या बिचार्‍या पुरुषाची कशी त्रेधा-तिरपिट उडते, यावर ती मालिका बेतली होती. विनोदाचा भाग सोडला आणि आजूबाजूला आपण नजर फिरवली तर आपल्यालाही लक्षात येतं की, लग्न झालेल्या मुलाची आई आणि त्याच्या बायकोमध्ये एक प्रकारची स्पर्धाच लागलेली असते की, तो नक्की कोणाचं ऐकतो, कोणाकडे जास्त लक्ष देतो. जसा-जसा काळ पुढे सरकू लागतो तस-तसं सासू-सुनेच्या मतांमधील, व्यक्तिमत्वामधील आणि जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनामधील फरक अधिकाधिक होत जातो. 
    लग्न हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, तो घरातल्या सगळ्यांसाठी; मग ते घर मुलाचं असो किंवा मुलीचं. मुलगी म्हणून पडती बाजू घेणं ही गोष्टच मनाला पटत नाही. जसं मागच्या लेखात आपण संसारातील समानता अधोरेखित केली तीच बाब लग्नासाठी! जेवढं टेन्शन मुलीकडच्यांना असतं तेवढीच खबरदारी मुलाकडच्यांनी घेणं आवश्यक आहे. कारण, एक नवीन व्यक्ती त्यांच्या घरात येणार आहे. आणि ती पाहुणी म्हणून ५-६ दिवसांसाठी नाही तर घरातील एक समान अधिकार असलेला सदस्य म्हणून, कायमची! ती कोणाचीही ‘जागा घ्यायला’ घरी येत नाही तर ती तिच्या नवीन घरी तिचं स्वतःचं एक स्थान बनवायच्या उद्देशाने आलेली असते. या प्रक्रियेमध्ये तिला सर्वात जास्त आधार हवा असतो तो तिच्या जोडीदाराचा!
    नवर्‍याने बायकोला आधार देणं आणि तिची बाजू घेणं यामध्ये खूप फरक आहे. भरपूर वेळा, सासू-सुनेच्या या संघर्षामध्ये नवर्‍याची भूमिका महत्त्वाची असते, असं म्हणतात. पण मला असं वाटतं, ज्या दोघींमध्ये वाद आहेत त्या दोघींनीच ते सामोपचाराने मिटवणं गरजेचं आहे. यामध्ये बायकोने नवर्‍याला आणि आईने मुलाला मध्ये खेचू नये. कारण, अशाने तो नक्की कोणाची बाजू घेतो यावरून नवीन वाद सुरु होऊन मूळ भांडणाचा मुद्दाच बाजूला राहतो. बायकोने आणि आईने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, नवर्‍याचं/ मुलाचं तुमच्या दोघींवरही प्रेम आहे आणि त्याला तुमच्या दोघींमधून एकाची निवड करायला आवडत नाही. कारण, त्याला दोन्ही नात्यांचा आदर करायचा आहे. पण, तुम्हीच तुमच्या दोघींपैकी कोणाची तरी निवड करायला त्याला भाग पाडलंत, तर त्याने अजूनच वाद वाढतील आणि चिघळतील. पर्यायाने, मुलगा आईपासून आणि नवरा बायकोपासून भावनिकदृष्ट्या दूर जाईल; तुमच्या दोघींच्या संघर्षाला कंटाळून! मग ज्या माणसाच्या प्रेमासाठी तुम्ही जीवाचा आटापिटा करताय त्याच नात्यामध्ये दुरावा आलेला कसा चालेल? पटतंय ना! 
    इथे एका पिढीने दुसर्‍या पिढीला समजून घ्यायची गरज आहे. नवरा-बायको मिळून त्यांना स्वतःची मते असू शकतात, त्यांची आयुष्यात काही स्वप्न असू शकतात जी आधीच्या पिढीला न पटणारी असतील किंवा त्यांच्यासाठी या स्वप्नांना काहीच किंमत नसेल. पण म्हणून ती स्वप्नं किंवा आकांक्षा चुकीच्या होत नाहीत. त्या तुमच्यापेक्षा फक्त वेगळ्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं, या आशा-आकांक्षा त्या दोघांनी मिळून ठरवलेल्या असतात. त्यामुळे, त्यांचा आदर हा करायलाच हवा. त्यामध्ये कोणाचीही लुडबुड नको किंवा अडवणूक! जेव्हां या दोन्ही पिढ्या एकत्र नांदत असतात तेव्हां एकमेकांबद्दलचा आदर खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. लग्न झालेलं जोडपं आई-बाबांबरोबर/ सासू-सासर्‍यांबरोबर राहत असलं तरी त्यांचं- त्यांचं एक स्वतंत्र कुटुंब एका समांतर पातळीवर चालू असतं, याचं भान घरातील प्रत्येकाने राखणं गरजेचं आहे. 
    ‘आई, उद्या रात्री आम्ही जेवायला बाहेर जाणार आहोत गं.’ आलोकने आईला एक दिवस आधीच पूर्वकल्पना देऊन ठेवली होती. पण आईने लक्षात न राहून पुढच्या दिवशी जेवायला त्याच्या आवडीची भरली वांगी आणि भाकरीचा स्वयंपाक केला. ऑफिसमधून आल्यावर त्यांची परत बाहेर पडण्याची लगबग बघून आईला आठवलं की मुलाने आज जेवायला बाहेर जातोय असं सांगितलं होतं. तरी ती त्यांना म्हणाली, ‘अरे, मी आता एवढा स्वयंपाक केलाय तर उद्या जा ना जेवायला बाहेर, त्यात काय एवढं.’ आईने हे म्हटल्याक्षणीच आलोकच्या बायकोचा चेहरा पडला. तिला वाटलं आता आलोक त्याच्या आईचं ऐकणार आणि आपला बाहेर जेवायचा बेत रद्द होणार. पण आलोकने आईला समजावून सांगितलं, ‘आई, आजच्या आमच्या जेवणासाठी मीनलने एक छान हॉटेल बघून बुकिंग करून ठेवलंय, माझ्यासाठी ते सरप्राईज आहे. त्यामुळे आज मी हा बेत रद्द करू शकणार नाही, तिला वाईट वाटेल, उद्या मला ही भाजी डब्यात दे, मी आनंदाने खाईन.’ आई थोडी हिरमुसली. पण बायकोला खूप आधार मिळाला की नवर्‍याने आपल्या भावनेची, आपण घेतलेल्या प्रयत्नांची किंमत ठेवली. इथेच त्यांच्यामधील आपण दोघे-एकत्र (ुश-पशीी) ही भावना अजून खोलवर रुजली. इथे त्याचं बायकोवर आईपेक्षा जास्त प्रेम आहे किंवा बायको जिंकली असे निरर्थक अनुमान न काढता, त्याकडे प्रासंगिक अनुभव म्हणून पाहूया. आज त्याने बायकोच्या भावनांना प्राधान्य दिलं, तर उद्या आईच्या प्रेमाची जाण ठेवेल, बायकोला थोडी तडजोड करायला सांगेल. 
    असं म्हटलं जातं, की माणसाच्या आयुष्याचं ४ टप्प्यांत वर्गीकरण झालेलं असतं. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम! आताच्या काळानुसार या आश्रम व्यवस्थेचे आपण संदर्भ लावायचा प्रयत्न करू. शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलं, घरातील जबाबदारीची जाणीव झाली की माणूस ब्रह्मचर्यातून गृहस्थाश्रमात प्रवेश करतो. वेगवेगळ्या अनुभवांतून, स्वतःच्या मतांमध्ये, व्यक्तिमत्वामध्ये बदल करून तो जस-जसा घडत जातो तस-तशी त्याची ही वर्षं अधिकाधिक समृद्ध होत जातात आणि वयाच्या साधारण ६० व्या वर्षी त्याचा वानप्रस्थाकडे प्रवास सुरु होतो. तोपर्यंत त्याच्या मुलांचा ‘गृहस्थाश्रमा’त प्रवेश झालेला असतो. म्हणजेच, मुलांनी आता घरची जबाबदारी स्वीकारणं अपेक्षित असतं आणि वानप्रस्थात प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी घरातील जबाबदारीतून थोडंसं अंग काढून घेणं अपेक्षित असतं. पण नेमकं इथेच काहीतरी बिनसतं. 
    आधीच्या पिढीची अपेक्षा नव्हे तर त्यांची मागणी असते की, आमच्यासारखंच आमच्या पुढच्या पिढीने वागलं पाहिजे. मी जास्त पावसाळे बघितले आहेत, मी जग अधिक बघितलंय. मलाच माहितीये, कांदा कुठे चांगला मिळतो आणि लिंबू कुठे स्वस्त मिळतात. हे असे संवाद आपल्याला घरोघरी ऐकायला मिळतात. आमच्या घरी आमचे हेच फळं आणतात, नीट बघून. आमचा फळवाला ठरलेला आहे, मग कशाला मुलाने किंवा सुनेने दुसर्‍या दुकानातून आणायचे? ही आणि अशी बरीच वाक्यं ट्रेनमध्ये, भजनी मंडळांमध्ये ऐकायला मिळतात. मला या मोठ्या माणसांना विचारावंसं वाटतं की, तुम्ही नीट बघून कसं आणायचं हे पहिल्याच दिवशी शिकलात का हो? याच फळवाल्याकडे चांगली फळे मिळतात हे बाकीच्या ठिकाणाहून आणल्यानंतरच तुम्हाला कळलं असेल ना? मग तसंच तुमच्या मुलाला आणि सुनेलाही कळेल की! कालांतराने, त्यांचाही एखादा फळवाला निश्चित होईल. कदाचित तुमच्या फळवाल्यापेक्षाही स्वस्त आणि मस्त फळं देईल. इथे प्रश्न असतो तो विश्वासाचा! आपल्या मुलावर आणि सुनेवर विश्वास ठेवून त्यांच्याशी वागून बघा! तुम्ही ४ पावसाळे जास्त बघितले असतील पण याचा अर्थ असा नाही की तुमच्या मुलांनी पाऊसच बघितला नाही. तुमच्याएवढा नाही बघितला, पण पावसाळ्याचा अनुभव तर नक्कीच आहे आणि तुम्ही त्यांना त्यांच्या परीने तो घेऊ दिलात तरच त्या पावसाळ्याची, म्हणजेच अनुभवाची त्यांना मजा घेता येईल आणि योग्य त्यावेळी तो पावसाळा नवीन काहीतरी शिकवूनही जाईल. 

~श्वेता खंडकर

Leave your comment