गर्भनिरोधकंं आणि बाई          निकिताची दोन सीझेरियन्स झाली होती. ती तांबी बसवून घेण्यासाठी माझ्याकडे आली होती. तिच्या मुलींची वयं सात आणि नऊ वर्षे होती. मी तिला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला, तो देखील तिच्या नवर्‍याने शस्त्रक्रिया करावी असा! ती आश्‍चर्यचकित झाली. त्यांना खूपच काम असतं अशा सबबीवर तिने शस्त्रक्रियेबाबत नवर्‍याशी बोलणंसुद्धा टाळलं आणि स्वत: माझ्याकडून तांबी बसवून घेतली.
    दर ६ महिन्याला न चुकता तपासणीसाठी यायचं हे मी तिला बजावून सांगितलं आणि तिच्या केसपेपरवर देखील तसं लिहून दिलं होतं. दोन वर्षे ती आली नियमितपणे. एकदा तिचा नवरा तिच्यासोबत आला होता तेव्हां, त्याने नसबंदी करून घ्यावी हे मी त्याला समजावलं होतं. त्याने नाईलाजाने होकार भरला होता, विचार करू करू म्हणत म्हणत ती दोघं घरी गेली. नंतर मात्र निकिता तपासणीसाठी आलीच नाही. पुढे चक्क दहा वर्षांनंतर आली. तांबी तपासली. ती जराशी बाजूला सरकली होती. सोनोग्राफी केली. नंतर निकिताला भूल देऊन गर्भाशयातली ती बाजूला सरकलेली तांबी काढावी लागली.
    निकिताने हलगर्जीपणा केला होता, याची तिला यथोचित जाणीव झाली. मी पुन्हा तिच्या नवर्‍याला नसबंदीचा आग्रह केला. निकिता म्हणाली, ‘मॅडम माझंच ऑपरेशन करा. सुट्ट्या लागल्या मुलींना, की येते.’ स्वत:ची दोन सीझेरियन्स झालेली असतांना, निकिता पुन्हा स्वत:च्याच शस्त्रक्रियेचा आग्रह धरत होती. नवरा हा सोयीस्करपणे, तिचीच इच्छा आहे, असं मानभावीपणे म्हणत होता. शेवटी तिची शस्त्रक्रिया मी करून टाकली. या उदाहरणावरून किती गोष्टी लक्षात येतात.
    एक तर संतती नियमनाची साधनं पती/पत्नी दोघांसाठी उपलब्ध असली तरी स्त्रीचीच जबाबदारी जास्त असते. नवरा बेफिकीर असतो. यात स्त्रीचं अज्ञान, गरीबी, वेळेवर हॉस्पिटलमध्ये न येऊ शकणं या अडचणी भर घालतात.
    पुरूषांसाठी केवळ निरोध हे एकच साधन उपलब्ध आहे. ते वापरणं संपूर्णपणे निर्धोक आहे. फक्त यामध्ये पूर्ण सुख न मिळण्याचा कधी कधी संभव असतो. पण निरोधचे फायदे भरपूर असतात. ते स्वस्त, सहज उपलब्ध असते आणि संसर्गजन्य रोगांचा, एड्सचा धोका कमी होऊन जातो.
    कधी क्वचितप्रसंगी निरोध, स्त्रीच्या योनीत अडकून राहतं, पण ते काढणं डॉक्टरांसाठी खूप सोपं असतं आणि स्त्रीसाठी वेदनारहित असतं. 
    पुरूषांची नसबंदी शस्त्रक्रिया फारच सोपी आणि वेदनारहित असते. भूल द्यावी लागत नाही. हॉस्पिटलमध्ये फक्त एक तासच थांबावं लागतं. शिवाय, शासनाकडून रू. १४०० मिळतात.
    इतकं असूनदेखील या शस्त्रक्रियेसाठी तयार होणार्‍या पुरूषांचं प्रमाण नगण्य आहे. याचं कारण- गैरसमज.
    पुरूषांची संभोगाची शक्ती, इच्छा, यामुळे कमी होईल ही भीती असते. वस्तुत: असं अजिबात होत नाही. या शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नी दोघांनाही अतिशय उत्तम समागम सुख मिळू शकतं. परंतु, ही गोष्ट ना पुरूष समजून घेतात, ना स्त्रिया. पुरूषांच्या शस्त्रक्रियेचा विषयदेखील स्त्रिया काढत नाहीत. त्यांना काम असतं. ही सबब स्त्रिया सांगतात. पण खरी भीती त्यांना हीच वाटते की, शस्त्रक्रियेनंतर नवर्‍याचं पुरूषत्व कमी होईल की काय?
    पुरूषांनादेखील मनोमन हीच भीती वाटत असते. डॉक्टरांच्या समजावण्यानंतर यात फारसा फरक होतच नाही. खरंतर सरसकट सगळ्या पुरूष डॉक्टरांनी या शस्त्रक्रिया स्वत:वर करवून घ्याव्यात. तरच समाजमन हळूहळू तयार करता येईल. परंतु, दुर्दैवाने नसबंदी करून घेणारे डॉक्टर्स नगण्य संख्येने सापडतात. 
    किमान ज्या स्त्रियांची सीझेरियन्स झालेली असतात किंवा इतर कोणती शस्त्रक्रिया झालेली असते, त्यांच्या पतीने तरी स्वत:ची नसबंदी करण्यात पुढाकार घ्यावा. परंतु असंही घडताना दिसत नाही.
    एका बाईला हृदयाचा एक आजार होता. तरी तिची चार वेळा प्रसूती झाली. नवर्‍याने किंवा तिने स्वत: कोणतीच काळजी घेतली नाही. सुदैवाने सगळी बाळंतपणं डॉक्टरांच्या देखरेखीखाली व्यवस्थित पार पडली होती. या बाईनेसुद्धा स्वत:चीच नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचा मला आग्रह केला. पतीची शस्त्रक्रिया हा विचारच तिला पटत नव्हता. 
    या बाबतीत समाजात प्रचंड गैरसमज व भीती आहे. पुरूष नसबंदी शस्त्रक्रियेकरता समाजमन अनुकूल करण्यासाठी डॉक्टरांचीही मानसिकता दिसत नाही. या गोष्टीवर प्रबोधन करण्यासाठी डॉक्टर्स अनुत्सुक असतात. याचं कारण समजत नाही.
    ‘गर्भनिरोधक गोळ्या’ हा उपाय अनेक स्त्रिया वापरतात. मात्र, या गोळ्या फार जास्त काळ घेणे योग्य नसते. डोकेदुखी, उच्चरक्तदाब, वजनाची वाढ, चिडचिडेपणा, पोट फुगणे या तक्रारी खूप जणींना जाणवतात.
  खूप स्त्रिया दूरचित्रवाणीवरच्या जाहिराती पाहून गोळ्या खातात, हे चूक आहे. प्रत्येकीची प्रकृती निराळी असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या सुरू कराव्यात. नियमित तपासणी आवश्यक आहे. वजनाची वाढ, रक्तदाब मोजणी करणे आपल्याच हिताचे आहे, हे स्त्रियांनी समजून घ्यावे. डेपो प्रोव्हेरा नांवाचं इंजेक्शन असतं, गर्भनिरोधक म्हणून ते वापरता येतं. परंतु, या इंजेक्शमुळे बर्‍याच जणींना मासिक पाळी नियमित येत नाही. म्हणूनच डॉक्टरचा सल्ला महत्त्वाचा असतो.
    ‘इमरजन्सी पिल्स’ नांवाचा नवा प्रकार आहे. केवळ दोनच गोळ्या शारीरिक संबंध आल्यानंतर लवकरात लवकर घ्यायच्या असतात.
    णपुरपींशव ७२ अशा नांवाने बाजारात उपलब्ध असतात. या गोळ्या एका महिन्यात एकदाच वापरणे इष्ट असते. परंतु, या गोळ्या एकाच महिन्यात दहा वेळा घेणार्‍या स्त्रिया आहेत. अशा वापरामुळे खूप दुष्परिणाम भोगावे लागतात.
    ज्या गोष्टीचं नांवच एाशीसशपलू ळिश्रश्री असं आहे, म्हणजेच त्या गोळ्या दैनंदिन, नियमित वापरासाठी नाहीतच. परंतु, अनेकजणी महिन्यातून जितक्या वेळा पती-पत्नी संबंध येतो, तितक्या वेळा या गोळ्या (मनानेच) खातात. त्यामुळे स्थूलता येते, मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होतो, चिडचिडेपणा वाढतो, असं आढळून येतं.
    पाळी लांबवण्यासाठी देखील खूप स्त्रिया मेडिकल स्टोअरच्या कांऊटरवरून या गोळ्या घेऊन (डॉक्टरी सल्ला न घेता) खातात. त्यामुळेही मासिक पाळीची नियमितता नष्ट होते. अनेकवेळा गोळ्या खाऊनदेखील पाळी लांबत नाही. त्याचे कारण, पाळी लांबवण्यासाठी, नेमका किती डोस घ्यायचा, केव्हांपासून गोळ्या घ्यायच्या, हे डॉक्टरच अचूक सांगू शकतात. केमिस्ट नाही.
    अनेक स्त्रिया महिनाभर नियमितपणे रोज एक खाण्याची गर्भनिरोधक गोळी माहेरी गेल्यावर खातच नाहीत किंवा नवरा परगांवी गेला असेल तर खात नाहीत. यामुळे, त्यांना अधेमध्ये पाळी येते आणि अशावेळी त्या गोळ्यांनाच दोष देतात.
    या सगळ्या प्रकारांना कारणीभूत आहे स्त्रियांची स्वत:च्याच आरोग्याबाबतची अनास्था. एखाद्या आवडत्या साडीसाठी परफेक्ट मॅचिंग ब्लाऊज आणण्यासाठी बायका दहा दुकाने पालथी घालतात. शिंप्याकडे दहा चकरा मारतात. पण, स्वत:च्या प्रकृतीला कोणते गर्भनिरोधक योग्य राहिल याचा सल्ला घेताना, त्या तितक्याशा जागरूक नसतात. स्वत:ची मासिक पाळी मागच्या महिन्यात कधी आली होती, याची अचूक तारीख सांगणार्‍या स्त्रिया केवळ ५०% असतात.
    स्वत: स्त्रीच इतकी उदासीन असते तर पुरूषांची गोष्टच कशाला करायची? गर्भनिरोधक न वापरले किंवा अयोग्य पद्धतीने, चुकीचा डोस घेतला तर कुणाला भोगावे लागते? स्त्रीलाच ना!
    तरीही  स्त्रिया आरोग्याबाबत उदासीन राहतात. या पुरूषप्रधान समाजव्यवस्थेत, कुटुंबातील पुरूषांना स्त्रियांच्या आरोग्याबाबत यत्किंचितही आस्था नसते. त्यांचे स्वत:चे नसबंदीचे ऑपरेशन तर चुकूनही त्यांच्या मनाला स्पर्शत नसते.
    आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात, सगळी माहिती एका क्लिकवर मिळते, तरीही स्त्रिया पुरूषांच्या नसबंदीची माहिती मिळवण्याचा प्रयत्नही करतांना दिसत नाहीत.
    मासिक पाळी सुरू झाल्यापासूनच स्त्रीच्या आरोग्याचं दुष्टचक्र सुरु होतं. गरीबी, अंधश्रद्धा, निरक्षरता, रूढीपरंपरा यांचा विळखा असतोच. गर्भधारणा, प्रसूती, स्तनपान, गर्भपात, सीझेरियन या सगळ्या अटळ साखळीतून तिला कुणी सोडवू शकत नाही.
    निदान गर्भनिरोधक उपाययोजना स्वत:कडे घेऊन, पुरूषांनी तिला थोडीशी मदत करायला काय हरकत आहे?
    निरोधसारखे निर्धोक साधन वापरून आणि अपेक्षित संख्येत संतती प्राप्त झाल्यावर, प्रत्येकच पुरूषाने स्वत:ची नसबंदी करून घ्यावी म्हणजे स्त्रीच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी, पुरूषाने योग्य पाऊल उचललं, असं म्हणता येईल.
    परंतु, मी हा जो विचार मांडला आहे, हा पुरूष डॉक्टरांना तरी कितपत पटेल, याचीच शंका आहे मला.
    मग ज्यांना शरीरशास्त्राचं ज्ञानच नाही, त्या पुरूषांकडून अशा सहकार्याची अपेक्षा करणे, सध्या तरी दिवास्वप्नच आहे. 
    पण, सातत्याने मी माझा विचार मांडतच राहिन. कधीतरी सगळ्या पुरूषांना तो पटेलच, या आशेवर.

~डॉ. वृषाली किन्हाळकर

Leave your comment