स्त्री हिंसाचार आणि आरोग्य    स्त्री या अक्षरात अफाट ऊर्जा आहे. महिला या शब्दातील महि याचा अर्थच पृथ्वी असा आहे. त्यामुळे, पृथ्वीवर कुठेही रहायला गेलात तर त्या ठिकाणची जागा किंवा परिसर राहण्यायोग्य बनविण्याची उपजत क्षमता स्त्रीमध्ये असते. मानवी जीवनाला जगवण्याचं म्हणजेच आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्याचं नैसर्गिक कर्तव्य ती स्त्री पार पाडत असते. या कर्तव्यात ती चुकूनही कुचराई करत नाही. उलट कुटुंब कल्याणासाठी नरापेक्षाही म्हणजे पुरुषांपेक्षाही अधिक मेहनत, कष्ट करण्याची ऊर्मी तिच्याठायी पहावयास मिळते. एखाद्या बाळाला तिने जन्म दिला तर ते बाळ मोठं होईपर्यंतच नव्हे तर जिवंत असेपर्यंत त्याच्या जिवाची काळजी ती करत असते. परंतु, खेदजनक बाब अशी की मानवकल्याणाची अभिजात कला सक्षमपणे स्वतःच्या खांद्यावर पेलणार्‍या या स्त्रीचा केवळ वापर करुन घेण्यात भारतीय समाजव्यवस्थेनं धन्यता मानली. उपभोग्य वस्तू याच एकमेव ‘अ‍ॅप्रोच’ने तिच्याकडे पहात तिला दुय्यम स्थान दिलं. इतकंच नव्हे, तर तिला तुच्छ, हीन, शूद्र ठरवून पुरुषप्रधान संस्कृतीने तिचं पिढ्यान्पिढ्या शोषण केलं. त्यामुळे, घरादारापासून ते गांवचावडीपर्यंत आजवर तिच्या अस्तित्वाचा अक्षरशः चुराडा होत आला. मान, सन्मान अन् प्रतिष्ठेचं जगणं तिला कोणी दिलं नाही. तथापि, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या निडर स्त्रीला जन्मून व्यवस्थेला ठणकावून सांगावं लागलं की, स्त्रीलासुध्दा अस्मिता असते. खरंच, एकोणिसाव्या शतकाने सावित्रीबाई ही महानायिका भारताला दिली. त्यामुळे, स्त्री परिवर्तनाच्या प्रवासाला एक जबदरदस्त हिंमत मिळाली. 
    पूर्वीचा कालखंड थोडासा विचारात घेतला तर आपल्याला असं पहायला मिळेल की, चातुर्वर्ण्य व्यवस्था ही माणसामाणसात उच्चनीचता आणि भेदाभेद करत आली. स्त्री ही समाजव्यवस्थेतला एकदम शूद्र घटक असल्याने तिची फरफट आणि चौफेर शोषण झालं. ती कोणत्या जातीची, धर्माची आहे किंवा उच्चवर्णीय आहे की खालच्या स्तरातील आहे, याचा विचारही केला गेला नाही. ती शुद्र आहे, असे मानून पुरुषप्रधान संस्कृती वर्षानुवर्षे फिदीफिदी हसत आली. कधी धर्माच्या, कधी देवाच्या तर कधी परंपरेच्या नांवाखाली तिला सांस्कृतिक, मानसिकदृष्ट्या गुलाम बनवलं गेलं. त्यामुळे, राजरोसपणे तिच्यावर अत्याचार करणं सहज शक्य होत राहिलं. मानवप्राणी टोळ्या करून राहू लागला तेव्हांपासून ते आत्तापर्यंतच्या स्त्री कहाण्यांत हिंसाचार नाही असं अजिबात नाही. थोडक्यात, स्त्रीकडे माणूस म्हणून पाहिलंच गेलं नाही. त्यामुळे, त्याच्या झळा तिला पिढ्यान्पिढ्या बसत राहिल्या आणि त्याचा परिणाम तिच्या मनावर, भावनेवर, शारीरिक आरोग्यावर व एकूणच जडणघडणीवर कायम होत आला. 
    खरंतर, स्त्रीला अनेक प्रकारची हिंसा सहन करावी लागते. त्यामध्ये प्रामुख्याने हिंसेचा पहिला प्रकार म्हणजे शारीरिक हिंसा होय. महिलेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिला शारीरिक इजा करणे. म्हणजे तिला वस्तूने अथवा हाताने मारहाण करणे. चिमटा काढणे, ओरबाडणे या सगळ्याचा समावेश यामध्ये होतो. हिंसेचा दुसरा प्रकार हा मानसिक-भावनिक स्वरुपाचा होय. यामध्ये सतत टीका करणे, चुका काढणे, अपमान करणे, अबोला धरणे, वाईट व हीन वागणूक देणे, माहेरच्या लोकांबद्दल वाईट बोलणे, संशय घेणे आणि अविश्वास दाखवणे हे सगळं मानसिक व भावनिक हिंसेमध्ये समाविष्ट होतं. हिंसेचा तिसरा प्रकार हा लैंगिक छळाचा आहे. शारीरिक बळाचा वापर करून स्त्रीच्या इच्छेविरोधात लैंगिक संबंध करावयास भाग पाडणे. छेडछाड करून आई - बहिणीवरून अश्लाघ्य बोलणे, लैंगिक अवयवांना इजा करणे, इच्छेविरुद्ध शारीरिक स्पर्श, लैंगिक भाषेचा वापर आणि छळ यांचा समावेश या प्रकारात होतो. चौथा प्रकार म्हणजे नियंत्रण किंवा बंधन घालणे. स्त्रीला घराबाहेर काम करण्यास अडवणूक करणे, एकाकी पाडणे, सतत देखरेख ठेवणे,  माहिती-पैसा-मालमत्ता-साधन सामुग्रीवर नियंत्रण ठेवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं हुंड्यासाठी सतत छळ करणे, या आणि अशा बाबी चौथ्या प्रकारात मोडतात. खरं म्हणजे या सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा स्त्रियांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो.
    दररोजचा हिंसाचार स्त्रीचं माणूसपण उध्वस्त करत असतो. अशा हिसांचारात एखाद्या गर्भवती स्त्रीला जर पोषक आहार मिळाला नाही तर गर्भात बाळाची नीट वाढ होत नाही. मग गर्भपात अथवा बालमृत्यू यासारख्या प्रसंगाना सामोरं जावं लागतं. त्यातूनही प्रसुती झालीच तर बाळ कुपोषित असतं. म्हणजे काहीतरी व्यंग घेऊन ते जन्मतं. आणि ते व्यंगबाधित मूल आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारीही ओघाने त्या स्त्रीवरच येते. शिवाय, सतत तिला सासरच्या लोकांसह समाजाकडून वाईट ऐकून घ्यावं लागतं. यातून तिचं भावविश्व कोलमडून जातं आणि ती नैराश्याच्या गर्तेत अडकून पडते.
    वयात येणार्‍या मुलींबाबतचं वास्तव हेसुध्दा इथं चर्चिलं पाहिजे. कारण, ते भयानक आहे. मुळात मुलगी आहे म्हणून तिच्याबद्दल तिरस्काराची भावना आधीच संस्कृतीने रुजवलेली असते. त्यामुळे, तिच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवली जाते. वंशाचा दिवा म्हणून घरातल्या मुलाला जास्त जेवण द्यायचं आणि त्याचवेळी मुलीला मात्र जास्त खाऊ घालायचं नाही. जर तिने जास्त खाल्लं तर ती जाड दिसेल आणि मग तिच्याशी कोणी लग्न करणार नाही, अशी काहीशी कुजबूज केली जाते. या कुजबुजीचा आणि भीतीचा त्या मुलीच्या मनावर आणि शरीरावरही ताण येत असतो. मासिक पाळीच्या दरम्यान हाच ताण दुप्पट होत रहातो. मुळात पाळीबाबत शास्त्रशुद्ध पध्दतीने तिला कोणी काही सांगितलेलं नसतं. याउलट पाळी हा प्रकारच एक विटाळ आहे, अशी समजूत तिच्या कोवळ्या मनावर अवतीभोवतीच्या वातावरणाने बिंबवलेले असते. त्यामुळे ती कावरीबावरी आणि हतबल होऊन जाते. कुठं काही बोलायची सोय रहात नाही. परिणामी स्वतः अपवित्र असल्याच्या भावनेनं स्वतःचंच हनन होत राहतं. शिवाय, या चारपाच दिवसांमध्ये तिच्याशी कुटुंबाकडून जो वर्तनव्यवहार होतो, तोही तिच्यासाठी भयंकरच असतो. किंबहुना एकप्रकारची ती हिंसाच असते. ग्रामीण भागात तर आजही पाळीग्रस्त मुलीला जेवायला वेगळं बसवतात, देवघरात येऊ दिलं जात नाही, अडगळीच्या खोलीत एकटं झोपायला सांगतात. इतकंच काय, तर पाळीसाठी वापरलेला कपडा सुकवण्यासाठीची जागासुध्दा अडगळीतली असते. तिथं स्वच्छता आहे की नाही किंवा पुरेसा प्रकाश आहे की नाही, हेही पाहिलं जात नाही. आपण जर बारकाईने या प्रकाराकडे पाहिलं, तर एका अर्थाने शारीरिकदृष्ट्या कमजोर होण्याबरोबरच गुप्त आजारांना हे आमंत्रणच दिलेलं असतं, असं आपल्या लक्षात येईल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा, बहुतांशी घरांमध्ये पुरुषांना ताजं अन्न दिलं जातं आणि राहिलेलं अथवा शिळं अन्न स्त्रियांच्या वाट्याला येतं. खरंतर हाही हिंसाचारच आहे. पोषक, सकस आहार न मिळाल्यामुळे मग स्त्रियांमध्ये अ‍ॅनेमिया बळावतो. केवळ योग्य आणि भरपूर आहार नसल्यामुळे मुली व स्त्रियांचं हिमोग्लोबीनचं प्रमाण अत्यल्प असल्याचं अनेकदा आपल्या कानावर पडतं. परंतु, आपण याकडे गांभीर्याने न पहाता कानाडोळा करण्यात धन्यता मानतो. तिच्या व्यथा, वेदना नीटपणे समजून घेत नाही.
    सोशल वर्कर म्हणून स्त्रियांचे विविध प्रश्न हाताळायला मिळतात. त्यातून हिंसाचाराची तीव्रता, त्याचे स्वरुप याचा चांगला अंदाज येऊन जातो. अशीच एक हुंड्याच्या नांवाखाली घडलेली घटना माझ्या वाचनात आली. हुंड्यासाठी सासरचे लोक संबंधित स्त्रीचा सतत जाच करत होते. नवरा रोज दारू पिऊन मारहाण करत असे. शिवाय, तिला पोटभर जेवणही दिलं जात नसे. चार महिने असंच तिला अर्धपोटी तर अधीमधी उपाशी रहावं लागलं. एके दिवशी नवर्‍याने कहरच केला. अक्षरशः अंगावर व्रण उठेपर्यंत तिला मारहाण केली आणि रात्री १२.३० वाजता तिला घरातून बाहेर हाकलून दिलं. सासरच्या लोकांनीही शिव्याशाप देत तिलाच दुषणं देणं सुरू ठेवलं. ती प्रचंड भेदरून गेली. अंगात ताप भरला होता. नवर्‍याने केलेल्या मारहाणीमुळे शरीरभर वेदना होत होत्या. काय करावं काहीच सुचत नव्हतं. अशा तुटलेल्या अवस्थेत ती कशीबशी रेल्वे स्टेशनला आली आणि आईचं घर गाठलं. आईला सर्व प्रकार सांगितला. आईनं मात्र धीर देत थोडी हिंमत दाखवली आणि नातेवाईकांच्या मदतीने थेट पोलिसठाणं गाठलं. पोलिस दाद देतील की नाही याचा अंदाज नव्हता. त्यामुळे आता खरी लढाई होती. परंतु, पोलिसांनी हुंडा मागणार्‍या त्या नवर्‍यासह सासरच्या सर्व लोकांना ताब्यात घेतलं. आपण एक लढाई जिंकलो याचं एक मनस्वी समाधान त्या स्त्रीला मिळालं. 
    ही घटना वाचल्यानंतर मात्र हिंसा करणार्‍यांना ताब्यात घेतलं याबाबत मला फारसं काही वाटलं नाही. उलट, त्या अन्यायग्रस्त स्त्रीच्या भावविश्वाच्या, मनाच्या तुटलेल्या, कोलमडून गेलेल्या अवस्थेचं काय? आयुष्याची झालेली पडझड त्याचं काय? तिचं पुढचं आयुष्य कसं? अशा प्रश्नांसह सारंच कसं अंधारलेलं, काळवंडलेले ढग तिच्या डोईवर दबा धरून बसले असतील याची फार चिंता वाटली. सारांश, या घटनेतील संबधित स्त्रीच्या मानसिक-भावनिक अन् शारीरिक आरोग्याच्या वाताहतीने मला हतबल केलं. खरंतर, सोशल वर्कर म्हणून ही घटना माझ्यासाठी एक अभ्यास होता. पण ती वाचताना हिंसा एखाद्या स्त्रीचं जगणं कसं उध्वस्त करुन टाकते ही माझ्यासाठी दाहक वेदना होती, हे मात्र नक्की!
    जर आपल्या समाजातील पुरुषप्रधान व्यवस्थेने पुरुषी अहंकार बाजूला सारून स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारलं तर निश्चितच तिला चांगले दिवस येतील. संविधानाला समोर ठेवून स्त्री-पुरुष समतेचा लढाही लढणं महत्त्वाचं आहे. यासाठी शिक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सृजनशील स्त्रियांनी पुढं यायला हवं. सावित्रीबाई फुलेंच्या नांवाचा जयघोष केवळ जयंतीपुरता करण्यात अर्थ नाही!

~पूनम गायकवाड

Leave your comment