एक लिंबू झेलू बाई...   जेवणाची रंगत वाढवायची असेल, तोंडाला चव आणायची असेल किंवा ताजंतवानं व्हायचं असेल, तर त्यासाठी सहज-सुलभ व हमखास वापरायचा पदार्थ म्हणजे लिंबू. हिरवट पिवळे, रसरशीत लिंबू पाहूनच आपल्या तोंडाला पाणी सुटतं.
    लिंबू हा आहारातील अविभाज्य भाग झाला आहे. लिंबू आपण अनेकविध प्रकारे वापरतो. लिंबूपाणी, लिंबू सरबत, लेमन कॉर्डियल, लिंबाचे तिखट-गोड लोणचे अशा अनेक रूपांत लिंबू आपण वापरतो. काहीजण सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पितात. काहीजण कोरा चहा किंवा कॉफी यात लिंबू पिळून ती पितात. काहीजण दररोजच्या जेवणात लिंबू आवर्जून घेतात.
    आंबट, रसाळ लिंबू कशाही प्रकारे घ्या, त्यातील घटक आपलं शरीर आरोग्यपूर्ण करत असतात. लिंबू हा ‘क’ जीवनसत्त्वाचा अतिशय उत्तम असा स्त्रोत आहे. हे जीवनसत्त्व शरीरात तयार होणार्‍या ‘फ्री रॅडिकल्स’चं प्रमाण कमी करून शरीर सुरक्षित ठेवतात. ‘क’ जीवनसत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. म्हणूनच सर्दी-पडसे व अन्य छोटे-मोठे आजार होऊ नयेत यासाठी रोजच्या आहारात लिंबाचा वापर जरुर करावा. पण, सर्दी-खोकला झाला असेल तर मात्र लिंबाचा आंबटपणा त्रासदायक ठरू शकतो. म्हणून सर्दी-खोकला झाल्यावर लिंबाचं सेवन टाळलेलंच बरं.
    रोज लिंबाचा रस पाण्यात घालून घेतल्यामुळे त्वचा उजळते, चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा तजेलदार दिसण्यास मदत होते. लिंबातील घटक त्वचेमधील कोलॅजेनचे पोषण करतात. त्यामुळे त्वचा निरोगी होते.
    काही व्यक्ती रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पितात. उपाशीपोटी लिंबाचा रस प्यायल्यास चयापचय क्रियेचा वेग वाढतो. लिंबूरसामुळे पचनसंस्थेची ताकद वाढते व त्यामुळे पोट साफ होते. पोट बिघडले असल्यास, गॅस, पोटफुगी झाली असल्यास किंवा पोटात मुरडा पडला असेल तर लिंबाच्या रसात थोडा आल्याचा रस व काळे मीठ घालून तो रस प्यावा. यामुळे पचनविषयक छोटे-छोटे विकार बरे होतात.
    कांदा-लसूण चिरल्यावर किंवा खाल्ल्यावर जर हाता-तोंडाचा वास जात नसेल तर, हाताला लिंबू चोळावे, लिंबूपाण्याने गुळण्या कराव्यात म्हणजे हा वास निघून जाईल. हिरड्यांतून रक्त येत असेल किंवा दात दुखत असतील तरी लिंबू हा त्याला उत्तम पर्याय आहे. रोजच्या जेवणात लिंबाचे सेवन करा व लिंबूपाण्याने रोज गुळण्या करा, जेणेकरून हिरड्यांतून रक्त येणे, दात दुखणे इत्यादी तक्रारी थांबतील.
    शरीरात लोहाचे शोषण करण्यासाठीदेखील लिंबू उपयोगी पडते. पालेभाज्या, चिकन, मटण, खजूर, पोहे, अंडी या लोहाच्या स्त्रोतांचे सेवन करताना सोबत लिंबू किंवा लिंबाचा रस घ्यावा. जसे आपण पूर्वीपासून पोह्यांवर लिंबू हटकून पिळतो किंवा मांसाहाराच्या वेळी पानात कांद्यासोबत लिंबू हटकून घेतोच. यामुळे पोहे, मासांहार यांतील लोह आपल्या शरीरात योग्य प्रकारे शोषले जाते.
लिंबाशी जोडलेले काही समज-गैरसमज पाहू-
    लिंबाबाबत सर्वात मोठा गैरसमज आहे, तो म्हणजे लिंबू सेवनामुळे वजन कमी होते.
      अनेकजण सकाळी पाण्यात लिंबू पिळून ते पाणी वर्षानुवर्षे घेत असतात. वजन कमी करण्यासाठी इतका सोपा उपाय असता तर जगात कुणीच जाड, लठ्ठ झालंच नसतं. याचाच अर्थ, सकाळी लिंबूपाणी पिऊन वजन कमी होते हा गैरसमज आहे. या समजाला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. लिंबातील पेक्टिनमुळे वजन कमी होते असे एक मत आहे. मात्र, हे पेक्टिन लिंबाच्या सालीत असते, ते रसात नसते. तसंच त्याचं प्रमाणही अल्प असतं. त्यामुळे वजन कमी होण्यासाठी रोज लिंबाच्या अनेक साली खाव्या लागतील! हे निव्वळ अशक्य आहे.
    सकाळी लिंबूपाणी घेतल्याने पोट साफ होते, अन्न चांगल्या प्रकारे पचते, शरीराची चयापचय प्रक्रिया नीट काम करू लागते व त्याचा परिणाम म्हणून वजन कमी होऊ शकते, ही एक शक्यता आहे. मात्र, त्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायामही केला पाहिजे. खेळाडूंसाठी तसेच कष्टाची कामे करणार्‍यांसाठी लिंबाचे सेवन हे वरदानच आहे.
लिंबू-मिरची दारात टांगल्यामुळे कुणाची दृष्ट लागत नाही-
    एका तारेत तळाशी कोळशाचा तुकडा, त्यावर लिंबू आणि सर्वात वर सात हिरव्या मिरच्या ओवून तो घड दारात बांधायचा. यामुळे वाईट शक्तींची बाधा आपल्याला होत नाही, असा समज आपल्या देशात सर्वत्र आहे. निदान या समजाच्या बाबतीत तरी राष्ट्रीय एकात्मता आहे!
    असे हे लिंबू. शरीराला जितके उपयुक्त तितकेच अति प्रमाणात सेवन केल्यास घातकही ठरू शकते. लिंबाचा रस नेहमी पाण्यात मिसळूनच प्यावा. नुसते लिंबू चोखून खाल्ल्यास दात आंबतात व हळूहळू कमकुवत होतात. जरी अशा प्रकारे लिंबू खाल्ले तरी साध्या पाण्याने लगेच तोंड धुवावे. अति प्रमाणात लिंबाचे सेवन केल्यास शरीरातील पाणी बाहेर टाकले जाते. यामुळे ‘क’ जीवनसत्त्व अति प्रमाणात लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जाण्याचा धोका निर्माण होतो. याचा परिणाम म्हणून शरीरातील पाणी कमी होत जाऊन शुष्कता वाढते. ज्यांना मूतखड्याचा त्रास असेल त्यांनी लिंबूपाणी प्यायल्यास फायदा होतो. मात्र, अति प्रमाणात लिंबाचे सेवन केले तर हाडातल्या कॅल्शिअमची झीज होऊन हाडे ठिसूळ होऊ शकतात.
    लिंबातील खनिजे व जीवनसत्त्वामुळे शरीरातील आम्लता व अल्कली गुणधर्माचा समतोल साधला जातो. खेळाडू व कष्टकरी लोकांचा घाम वाहून गेल्यामुळे त्यांच्या शरीरातील खनिजे कमी होऊन पाय दुखणे, क्रॅम्प येणे (वात येणे), मुंग्या येणे हे होऊ शकते. लिंबूपाण्यात थोडा मध किंवा गूळ घालून घेतल्यास सर्व खनिजे शरीराला पुन्हा मिळतात. यामुळे शक्ती व तरतरीतपणा वाढतो. 
    अशा लिंबाचा- मग ते पोह्यावर असो, मांसाहारावर असो किंवा भेळेवर असो, योग्य प्रमाणात वापर करा आणि तंदुरुस्त रहा.

~वृषाली वझे

Leave your comment