आरोग्यविषयक ग्रामसभा    राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्‍न सोडवण्याचं काम केलं जातं. संगमनेर तालुक्यातल्या ३६ गांवांमध्ये ‘लोकपंचायत’मार्फत ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही गावांमध्ये नुकतंच आरोग्य ग्रामसभांचं आयोजन करण्यात आलं होतं. 
    ग्रामसभा ही ग्रामीण लोकशाही यंत्रणा आहे. लोकसहभागातून ग्रामीण भागाचा मूलभूत विकास साध्य होण्यासाठी ग्रामसभांसारखं परिणामकारक साधन दुसरं नाही. ग्रामसभांच्या माध्यमातून गांवचे विविध प्रश्‍न सोडवले जातात. त्यामध्ये विकासाचे प्रश्‍न, सामाजिक प्रश्‍न, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, धार्मिक इत्यादी अनेक प्रकारचे प्रश्‍न असतात. त्या अनुषंगानेच आरोग्याच्या प्रश्‍नांवर व्यापक चर्चा होऊन गांवपातळीवरच ते सोडवले जावेत, लोकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती व्हावी आणि आरोग्यासंबंधीच्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने कुरकुंडी, कुरकुटवाडी, भोजदरी, आंबीदुमाला, खांबा, पिंपळगांव देपा, हिवरगांव पावसा, झोळे, निमज, संगमनेर खुर्द आणि चिंचोली गुरव या गांवांमध्ये आरोग्य ग्रामसभा घेण्यात आल्या होत्या. 
     आरोग्याविषयीच्या योजनांची माहिती नीटपणे लोकांपर्यंत जात नाही, असे या ग्रामसभांमधून लक्षात आले. जसे मातृवंदना योजनेचा लाभ न मिळण्यामागच्या अडचणी, गरोदर माता, कुष्ठरोग, क्षयरोग याबाबत रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती न मिळणे, गांवातल्या आशा, नर्स, आरोग्य सेवक काय काम करतात याची ग्रामपंचायत पातळीवर स्पष्टता नसणे, याबरोबरच गांवातली अस्वच्छता, बंदिस्त गटारे, पडीक जमिनी हेही प्रश्‍न समोर आले. तसेच विविध योजनांची माहिती होण्यासाठी महिलांनी ग्रामसभेला उपस्थित राहिलं पाहिजे, हे प्रकर्षाने जाणवलं. तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी आरोग्यविषयक कार्यक्रमांना गांवात आलं पाहिजे, गांव भेटी दिल्या पाहिजेत, जेणेकरून आरोग्याविषयीचे प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होईल, अशा अपेक्षा लोकांनी व्यक्त केल्या. 
    सर्व ग्रामसभांमध्ये आरोग्याच्या प्रश्‍नांवर सकारात्मक चर्चा होऊन ग्रामसभा यशस्वीरित्या पार पडल्या. प्रत्येक गांवचे सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनीही कृतीशील सहभाग दिला. 

~संस्था वृत्त

Leave your comment