'फॅॅड'वाली शाळा    मी नाही का एसेस्सीला शिकलो, मग कशाला पाहिजेत ही ‘मुक्त’शाळेची फ्याडं, ही लेकीला शाळेत घालायच्या वेळेला माझी एकमेव ‘भूमिका’ होती. शालेय नसलो, तरी गेली अनेक वर्षं शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे ‘कोण किती शिकवतात, ते मला माहित्ये’, अशी एक घमेंडही होती. पण सुदैवाने बायको मानसशास्त्रज्ञ आहे, नामांकित शाळेत समुपदेशक म्हणून राहिलेली आहे. (आणि शिवाय बायको आहे, हे वेगळं) त्यामुळे, तिच्या स्पष्टीकरणानंतर ‘रुडॉल्फ स्टायनर’ नांवाच्या शिक्षणतज्ञाने विकसित केलेल्या ‘वाल्डोर्फ’ या शिक्षणपद्धतीतल्या एका शाळेत तिला प्रवेश घ्यावा, असं ठरलं. दोन वर्षांच्या अनुभवानंतर बायकोच्या सल्ल्याने घेतलेला (नेहमीप्रमाणेच) तो एक चांगला निर्णय आहे, असं आता मला मनापासून वाटतं. 
    खरंतर, या शाळेच्या माहितीपर सभेमध्येच तिथल्या मुख्याध्यापकांनी आम्हाला घाबरवून टाकलेलं होतं. काय, तर म्हणे मुलं पहिलीत जाईपर्यंत आम्ही अक्षरं, अंक लिहायला आणि वाचायला शिकवणारच नाही. अर्थात, याचं त्यांच्याकडे शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण होतं. जन्मापासून सहा वर्षाचं होईपर्यंत ते मूल अधिकाधिक गोष्टी अनुकरणातून शिकतं. याकाळात मुलाची अनुभव समजून घेण्याची कुवत अधिकाधिक टोकदार आणि सक्षम होणं आवश्यक असतं. त्यासाठी त्याला प्रत्यक्ष अनुभव घेता येण्यासारख्या कला/हस्तकौशल्य किंवा ताल, या सगळ्यांची ओळख होणं आवश्यक असतं. किंबहुना, या वयात ही ओळख झाली तर त्याची ज्ञानेंद्रीय समृद्ध आणि सजग होतात. अर्थात, ही सगळी झाली मांडणी. प्रत्यक्षात जेव्हां माझी साडेचार वर्षांची मुलगी अत्यंत बारीक अशा मण्यांची जेमतेम करंगळी जाईल एवढी छोटीशी अंगठी विणते (आणि प्रेमाने बापाला भेट म्हणून देते!), तेव्हां ती काहीतरी ‘शिकली’ असं वाटतं. या वयात तिला ठोकळ्यांना घासून गुळगुळीत करायचं ‘काम’ असतं. चित्रकला आठवड्यातून एक दोन दिवस तरी असते. भरपूर सारी गाणी आणि गोष्टी असतात. आजूबाजूच्या वातावरणाशी मुक्त ओळख, हाही तिच्या शिक्षणाचा एक भाग आहे. त्यामुळे, तिच्या शाळेत रोज एक ‘खेळायचा’ तास असतो, जेव्हां त्यांना मैदानात सोडतात. मग ती चिखलाचे केक्स बनवते. फुलं, कोणकोणत्या आकाराचे दगड असा ‘ट्रेजर’ गोळा करते. अळ्या नाहीतर गोगलगाय चक्क बिनधास्त हातावरही घेते (जे मला अजूनही जमत नाही...!). शाळेतल्या या ‘शिक्षणाचा’ फायदा असा, की कोणत्याही प्रवासात तिला झाडं दिसत राहतात, त्यांच्याबद्दल ती बोलत राहते. माझ्या गांवाला पन्नास झाडांतून एखाद्या झाडावर बसलेला वेगळा पक्षी ती बरोब्बर टीपून मला सांगते. हस्तकौशल्य, बोटांमधलं चापल्य, कला आणि खेळांची आवड, निसर्गाबद्दल सजगता आणि संवादातला सहजपणा, ही तिची पहिलीपूर्वीच्या वर्षांतली कमाई आहे. अक्षरं आणि अंक लिहायला आणि वाचायला नंतरही शिकता येतात आणि ते नंतर शिकून काही फारसं नुकसान होत नाही. पण, या गोष्टी मात्र नंतर शिकणं कठीण जातं आणि त्या आत्ताच शिकल्याचे आयुष्यभर फायदे होतात, हा या सगळ्यामागचा तर्क आहे.
    संभाषणकौशल्यावरून आठवलं. घरात अस्सल आणि अट्टल मराठी वातावरणात वाढलेली माझी मुलगी, नर्सरीत जेव्हां तिच्या शाळेत गेली, तेव्हां सव्वीसपैकी वर्गातली जेमतेम अडीच तीन मुलं मराठी होती. (म्हणजे एकाचे वडील होते, पण आई नाही!) शाळेत पूर्ण अमराठी वातावरण. पुन्हा आमच्या घरात सगळी गप्पिष्ट मंडळी जमत असल्यामुळे लेकीला बोलायची आवड अगदी लहानपणापासून. आता अचानक अनोळखी भाषेत बोलता येईना. ती थोडी-बहुत चिडचिडी, घुमी झाली. शाळेत गेल्यापासून महिन्या दोन महिन्यात आम्ही शिक्षिकेला भेटायला गेलो. ‘भाषा मुलाने शिकावी म्हणून घरातही त्याच्याशी इंग्रजी/हिंदी बोललं पाहीजे’, हे आम्ही अनेकांकडून ऐकलेलं होतं. ते मला बिलकुल आवडत नाही. उत्तम इंग्रजी बोलता आलं तरी मी कौटुंबिक संवाद मातृभाषेतच राहावा, या कट्टर मताचा आहे. खरंतर, आम्हाला शिक्षणही मराठीत द्यायला आवडलं असतं. पण ते देऊ शकणारी चांगलीशी शाळा सापडली नाही, हेच खरं. पण, आश्चर्य म्हणजे तिच्या शिक्षिकेने आम्हाला असं काहीच सांगितलं नाही. उलट, तुम्ही घरात मराठीतच बोलत राहा असा आग्रह धरला. मीही जमेल तेवढी तिच्याकडूनच मराठी शिकत असते, असं सांगितलं. याचं कारण म्हणजे वाल्डोर्फ पद्धतीचाही मातृभाषेतून शिक्षण देण्यावर विश्वास आहे. पण, आम्हाला अजून मराठीतून ही शाळा चालवू शकेल असं मनुष्यबळ आणि पालक सापडलेले नाहीत, असं तिचं म्हणणं होतं. ‘पण सध्या ती घुमिघुमी आहे, तिचं काय?’, हा माझा प्रश्न होता. ‘काळजी करू नका. मुलांच्या सगळ्या अडचणी लगेच दूर व्हाव्या, नाहीतर त्याला रागवायला तरी हवं किंवा उपचार सुरु करायला हवे, हा समज चुकीचा आहे. तिला संधी द्या, वेळ द्या, घाईवर बिलकुल येऊ नका’, हा तिच्या शिक्षिकेचा सल्ला होता. किंबहुना मुलांच्या कोणत्याही अडचणीसंदर्भात वेळ देण्याची, धीर धरण्याची कमालीची तयारी या पद्धतीत आहे. तिचा सल्ला ऐकल्याचा परिणाम असा, की मुलगी तिचं पहिलं वर्ष संपायच्या आतच शाळेतसुद्धा इंग्रजी, हिंदी किंवा कधीकधी तर गुजरातीतही आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारते. आणि मुख्य म्हणजे घरात मात्र ‘आई, गिव्ह मी थोडा वॉटर बरं’, वगैरे अशी अजिब्बात बोलत नाही...!
    एका गोष्टीत मात्र शाळा अगदी ‘कडक’ शिस्तीची आहे. आपल्याकडच्या मुलामुलींना कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक पडद्याकडे जराही पाहू नये, कार्टूनसुद्धा पाहू नये, अशी शाळेची मागणी आहे. टीव्हीचे हे पडदे मुलांच्या कल्पनाशक्तीचे दुश्मन आहेत, ते मुलांना विचार करायला प्रवृत्त करण्याऐवजी निर्बुद्ध पाहात राहायचं ‘ट्रेनिंग’ देतात, असं शाळा आग्रहाने सांगते. त्यामुळे, इतर मुलं जेव्हां ‘जेवताना मोबाईल’ किंवा ‘तासभर तरी टीव्ही’ असे हट्ट धरतात (आणि पालकही, ‘घे तुझा स्क्रीन आणि बस गप’, अशी स्वतःची सोय पाहतात), तेव्हां आम्हाला मात्र लेकीला सतत काहीतरी करमणूक शोधावी लागते. ‘नो टीव्ही’चा हा मंत्र इतका जालीम आहे, की या शाळेतल्या मुलांना कोणतंही कार्टून कॅरॅक्टर पाहायला तर सोडाच, पण त्याची चित्र असलेला रेनकोट, पाण्याची बाटली नाहीतर बॅग आणायलासुद्धा मनाई आहे.
    अशा अनेक बाजूने समृद्ध असलेल्या या शाळेचा एकच प्रॉब्लेम आहे. ही शाळा चालवणारी मंडळी शाळेचे शिक्षक किंवा पालक आहेत. कोणीही राजकारणी किंवा उद्योजक शाळा चालवत नसल्याने तिला जमीन किंवा इमारत अशा गोष्टी मिळवायला प्रचंड त्रास होतो. पुन्हा हे शिक्षक किंवा पालक कौतुकास्पदपणे वाहून घेतलेले आणि कुशल असले, तरी व्यावहारिक बाबतीत थोडे कमी पडतात, हे खरंच.
    गेल्या महिन्यात शाळेच्या ओपन हाऊसला गेलो होतो. तळ मजल्यापासून चौथ्या मजल्यापर्यंत वेगवेगळ्या दालनात प्रत्येक इयत्तेच्या मुलांनी केलेला ‘अभ्यास’ मांडलेला होता, तो पाहिला. लेक भविष्यात कोणत्या वाटेवरून जाणार आहे, ते कळलं. ओबडधोबड वाटणार्‍या आकारांची हळूहळू रेखीव चित्रं होतात, मग अक्षरं बनतात, अन् चित्रही अर्थपूर्ण आणि सुंदर होतच जातात. रेघा न मारलेल्या वह्यांत वरखाली सांडलेल्या ओळी हळूहळू सरळ व्हायला लागतात. मग त्यांची वाक्यं उगवायला लागतात. सुरुवाती सुरुवातीला हस्तकलेची ‘गम्मत’ असलेल्या गोष्टी मग विज्ञानाचे ‘प्रयोग’ व्हायला लागतात. लहान मुलांच्या बोबडगीतांपासून सुरु झालेल्या संगीताच्या वह्यांत चक्क म्युझिकल नोटेशन्स दिसायला लागतात. आठवीच्या दालनात जाईपर्यंत चक्क विज्ञान प्रयोगाची मॉडेल आणि ती सहजपणे समजावू शकणारे विद्यार्थी असतात. वर्गात प्रत्येकाचं नांव टाकलेली स्वतंत्र बासरीही असते. बहुतेक सगळी शिडशिडीत आणि हसरी/उत्साही मुलं आणि त्यांची ही टप्प्याटप्प्याने समृद्ध होत गेलेली अभिव्यक्ती पाहिली आणि आपण ‘फ्याड’वाली शाळा केली, तेच चांगलं, असं मनापासून वाटून गेलं...!

~अजित जोशी

Leave your comment