मैत्रीण मी; विद्यार्थ्यांची!    मी शुभदा कावळे. १९८५ पासून कनिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्र विषय शिकवत आहे. मला शिक्षकी पेशातच करिअर करायचं होतं. अकरावी-बारावीच्या मुलांना शिकवणं हे खरंच एक चॅलेंज आहे, असं मला वाटतं. ही मुलं फक्त दोनच वर्षं आमच्याकडे असतात. दहावीपर्यंत बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांचं शाळा, शाळेतले शिक्षक यांच्यावर अपार प्रेम असतं. अनेकजण (माजी विद्यार्थी) ग्रुप करून शाळेतील शिक्षकांना, शाळेला भेटायला येत असतात. 
    तसंच उच्च शिक्षण हा आयुष्यातील एक वेगळा टप्पा. या टप्प्यात जो शिक्षक खरंच हुशार, ज्ञानी, चांगलं शिकवणारा, विद्यार्थ्यांना चांगलं समजून घेणारा असेल तो मुलांच्या मनामध्ये कायम घर करून असतो. 
    पण, कनिष्ठ महाविद्यालयाचं तसं नसतं. फक्त दोनच वर्षं ही मुलं आमच्याकडे असतात. नुकतीच कॉलेजची हवा लागलेली असते. प्रेम आणि आकर्षण यातला फरक न समजणारी, मला सगळं कळतं, समजतं, मी मोठा झालोय, मी स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकतो, असं वाटणारी (कळतंय पण वळत नाही), भावनांचा कल्लोळ मनामध्ये असणारी, उत्साही, आनंदी, खूप काहीतरी करायचंय अशी त्यांच्या डोळ्यात ओळख असणारी अशी ही मुलं. अशा मुलांना शिकवणं म्हणजे एक दिव्यच. पण, ते करत असताना त्यांना शिकवणं हे खूप आनंद देऊन जातं. 
    नोकरीला लागले त्यावेळी खरंतर मी एक सामान्य शिक्षिका होते. लेक्चरची तयारी करायची, ते वर्गात जाऊन शिकवायचं, तास संपला की परत आपण आपल्या विश्‍वात. आपला आणि विद्यार्थ्यांचा संबंध संपला. 
    एक दिवस अचानक संध्याकाळी एक विद्यार्थी माझ्याकडे आला. मला म्हणाला, ‘‘मला तुमच्याशी बोलायचंय.’’ मला वाटलं रसायनशास्त्राच्या काही शंका असतील. माझ्याकडे खूप पाहुणे आलेले होते. मी त्याला म्हटलं, ‘‘उद्या येशील का? मी जरा कामात आहे.’’ तो काहीच न बोलता निघून गेला. दुसर्‍या दिवशी मला निरोप मिळाला, त्या मुलाने आत्महत्या केली. मला खूप वाईट वाटलं. आपण जर काल त्याच्याशी बोललो असतो तर कदाचित आपण त्याला आत्महत्येपासून परावृत्त करू शकलो असतो. मग माझ्यातली एक वेगळीच शिक्षिका तयार झाली. जसं डॉक्टरांची दारं पेशंटसाठी सतत उघडी असतात तशीच शिक्षकांची दारंही विद्यार्थ्यांसाठी उघडी असायला हवीत, याची जाणीव मला झाली. आलेल्या विद्यार्थ्याला हातातलं काम बाजूला ठेवून प्रेमानं विचारायचं की, तुझं काय काम आहे? 
    शिकवत असताना हळूहळू विद्यार्थी आणि त्यांचे प्रश्‍न यामध्ये मला रस निर्माण व्हायला लागला. लक्षात आलं की, विद्यार्थी आपल्याला घाबरतो, आपल्याशी संवाद करू शकत नाही. त्याला आपली भीती वाटते हे काही योग्य नाही. आपल्याला बदलायला पाहिजे. विद्यार्थी आपल्याशी संवाद करू शकला पाहिजे. मोकळेपणाने त्याचे प्रश्‍न तो आपल्याला सांगू शकला पाहिजे. तसे बदल मी स्वत:मध्ये करत गेले. 
    वयपरत्वे परिपक्वता येते. तापटपणा कमी होतो. मायाळूपणा वाढतो. हे सगळं खरं असलं तरी जनरेशन गॅप पण वाढते. विद्यार्थी तरूण शिक्षकांशी मोकळेपणाने बोलतात. परत विद्यार्थ्यांशी संवाद कमी व्हायला लागतो. मग परत स्वत:मध्ये बदल करायचे. स्वत:ला खूप उत्साही, आनंदी, तरूण करायचं. त्यांच्यासाठी त्यांना आवडणारे काही सिनेमे पहायचे. (आपल्याला आवडत नसले तरी) तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता. जनरेशन गॅप कमी व्हायला मदत होते. आता तर मी आजी झालेय. पुढच्या वर्षी निवृत्त होणार आहे. पण, तरीसुद्धा विद्यार्थ्यांना माझ्यामध्ये कधी त्यांची मैत्रीण, कधी आईचं रूप तर कधी अभ्यास करायलाच पाहिजे म्हणून कडक शिक्षिका दिसत असले तरी सगळं मिळून त्यांना सांभाळून घेणारी, समजून देणारी, वेळप्रसंगी त्यांच्या पालकांना समजावून सांगणारी अशी शिक्षिका मी घडत गेले. 
    काळा बदलतोय. मोबाईल, इंटरनेट यामुळे सभोवतालची परिस्थिती झपाट्याने बदलतेय. आजकालची मुलंच अशी... आमच्यावेळी असं नव्हतं, असं म्हणून चालणार नाही. 
    अजिंठा लेणीमध्ये एक चित्र कोरलेलं आहे. हे चित्र कमीतकमी तेराशे ते चौदाशे वर्षांपूर्वीचं असेल. त्यामध्ये एक शिक्षक शिकवतोय, पहिल्या रांगेतला मुलगा लक्ष देऊन ऐकतोय, मधल्या रांगेतली मुलं गप्पा मारताहेत आणि शेवटच्या रांगेतली मुलं मारामारी करताहेत. आता काही मुलं मोबाईल चॅट करत आहेत, असं काहीसं थोडं बदललेलं चित्र असेल. पण, तेव्हांची परिस्थिती आणि आत्ताची ह्यात फार काही बदललेलं चित्र नाहीये. म्हणजे आजकालचे विद्यार्थी हे असेच, त्यांना काही देणंघेणं नाही कुणाशीच. स्वार्थी मित्र-मैत्रिणी, चॅटींग, पार्टीज् यामध्ये दंग, असं काहीही नसतं. त्या त्या काळात तरूण रक्त हे वेगळंच असणार. त्यांचा जोश वेगळाच असणार. काळ बदलेल, परिस्थिती बदलेल त्याचबरोबर आपण पण स्वत:ला बदलायला शिकलं पाहिजे. तरच आपल्याला शिकवण्यात आनंद मिळतो. तो आनंद दुसरा कशातच नाही, असं मला वाटतं. 
    अनेक वेगवेगळ्या स्वभावाचे, वृत्तीचे विद्यार्थी भेटत गेले आणि मला स्वत:मध्ये बदल करत शिकवायला मजा येत गेली. 
माझे काही ठळक अनुभव इथे देत आहे- 
    वर्गामध्ये दंगा करणारी, जरा गुंड प्रवृत्तीची, पटकन उत्तर न देणारी, आपल्या डोळ्यात बघून व्यवस्थेला विरोध करणारी, अशा अनेक विद्यार्थ्यांना प्रेम लावून आपल्याकडे वळवणं, अभ्यासाला लावणं यात खूप मजा आहे. वर्गातल्या त्रासदायक विद्यार्थ्यांशी माझं नेहमीच चांगलं जमतं. त्यांच्यात झालेला बदल चांगल्यापैकी कळतो. ती मुलं खूप छान अभ्यासाला लागतात आणि तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवतात. 
   डॉ. संदिप घोडेकरसारखा शांत, अभ्यासू विद्यार्थी. आता तो डॉक्टर आहे. मी त्याच्याकडे पेशंट म्हणून जाते तर कधीही माझ्याकडून पैसे घेत नाही. त्यांच्या प्रेमाचीच ही एक पावती असते. अतुल वखारिया, अनिता पावसे यासारख्या विद्यार्थ्यांनी आमच्यावर पूर्णपणे विश्‍वास टाकला. त्यामुळे, आम्ही अतुलला ५५ टक्क्यांवरून ८५ टक्के तर अनिताला ६३ वरून ९३ टक्क्यांवर नेऊ शकलो. याउलट पण झालेलं आहे. काही विद्यार्थी ८५ टक्क्यांवरून ५५ वरही आलेले आहेत. कारण, बाहेरच्या फसव्या जाहिराती वाचून, शिकवणीमुळे वर्गात दुर्लक्ष होते. मग हळूहळू अभ्यासाची गोडी कमी होत जाते. शिक्षक-पालक सुसंवादाचा अभाव यामुळे त्या विद्यार्थ्यांत बदल करताच येत नाही. 
    मला आठवतंय. माझा एक विद्यार्थी ज्याला साधं स्वत:चं नांव कधी सांगता आलं नाही असा. मला मोठा प्रश्‍न पडला की, याला बोलतं कसं करावं? त्याच्याशी संवाद साधून, त्याच्यात आत्मविश्‍वास निर्माण करून वेळप्रसंगी त्याच्या मित्रांमार्फत त्याला बोलतं करायचा प्रयत्न करत होते. एक दिवस त्याने एका दमात इंग्रजीमधून संगणकाची व्याख्या सांगितली. (तो मराठी माध्यमातला मुलगा आणि मी तेव्हां संगणक विषय शिकवत होते.) आम्ही सगळे खूपच अचंबित झालो. एक शिक्षिका म्हणून माझ्या लक्षात आलं की, विद्यार्थ्यांमध्ये इतका प्रचंड बदल करण्याची ताकद शिक्षकात असते. 
    अकरावी-बारावीच्या विचित्र वयामध्ये प्रेम, आकर्षण, अभ्यासाचं टेन्शन, त्यात सायन्सला असल्यावर पुढे काय? करिअरचं टेन्शन आणि आश्‍चर्य म्हणजे काही विद्यार्थी यावर उपाय म्हणून वेगवेगळ्या बाबा-महाराजांच्या नादी लागतात. 
    अशीच माझी एक विद्यार्थिनी सगळं शिक्षण सोडून बाबा-महाराजांच्या आश्रमात जाऊन आली. परत तिला कायमचं तिकडे जायचं होतं. पण, तिच्या भावाच्या हे लक्षात आलं. तो तिला घेऊन आमच्या घरी आला. मी आणि माझा नवरा रोहितने तिला खूप समजावून सांगितलं. परतीचा मार्ग आपोआप कसा बंद होतो, ते समजून सांगितलं. मुख्य म्हणजे पु. ल. देशपांडे यांचं ‘तुझं आहे तुझपाशी’ हे पुस्तक वाचायला दिलं आणि अपेक्षित असा बदल तिच्यामध्ये झाला. तिचं ते खूळ डोक्यातून गेलं. ती त्या अवस्थेतून पूर्णपणे बाहेर आली. नंतर चांगली इंजिनिअर झाली आणि नोकरीही करत आहे. लग्न झालं, दोन मुलं आहेत. सुखी, समाधानी जीवन जगत आहे. 
    अशी अनेक उदाहरणं आहेत. काहींना आम्ही बाहेर काढू शकलो तर काहींना बाहेर काढू शकलो नाही किंबहुना ते आमच्याकडे येईपर्यंत उशीर झाला होता. एक विद्यार्थी माझ्याशी सतत मंत्रतंत्र विद्या, कवटी, भूत, याविषयीच बोलायचा. मी त्याला त्यातून बाहेर काढलं. पण, नंतर तो कुढल्यातरी महाराजांच्या आश्रमातच गेला. 
    मला यावर्षी गॅप घ्यायचा आहे, असं म्हणणारे पण खूप विद्यार्थी भेटतात. त्यांना खरंतर भीती असते समाजाची, आई-वडिलांची. आपण इतके हुशार असूनही काही कारणास्तव अभ्यास न झाल्यामुळे नापास होऊ किंवा कमी गुण मिळतील आणि मग समाज आपल्याला काय म्हणेल, लोक आपल्याला हसतील. अशावेळी तू गॅप घ्यायची नाही. तू मूर्ख आहेस का? असं न म्हणता, तू हुशार आहेस, कमी गुण मिळाले तरी आम्हाला चालतील. तू अभ्यास कर. अगदी परीक्षेच्या दिवशी आपण ठरवू. तुला तेव्हां वाटलं तर जरूर गॅप घे. आम्ही तुझ्या निर्णयाला नक्कीच पाठिंबा देऊ. तू आता बाकी विचार न करता अभ्यास कर, असा आत्मविश्‍वास त्याच्यात जर निर्माण केला तर गॅप घेण्याचे विचार हळूहळू कमी होतात. उलट अभ्यास करून तो मुलगा घवघवीत यश मिळवतो. 
    प्रयोगशाळेतून साहित्य चोरणं, हे तर अनेक चांगल्या घरातील मुलं करतात. घरातून वस्तू, पैसे चोरणं, कॉलेजच्या फीसाठी दिलेले पैसे दुसरीकडे उडवून टाकणं, असे उद्योगही करतात. या मुलांना थोडा धाक दाखवून, थोडं प्रेमाने समजून सांगून आणि मुख्य म्हणजे त्यांच्या चुकीला मोठ्या मनाने माफ करून टाकलं, की बरेचसे प्रश्‍न मिटतात. ती मुलं आयुष्यात कधीच कुणाचं काही चोरत नाहीत. 
    माझ्या एका विद्यार्थ्याने (आधी प्रयोगशाळेत चोरी केली तेव्हां मी त्याला ओरडले होते.) पुढच्या आयुष्यात एकदा त्याला पाचशे रुपयांची नोट सापडली तर ती त्याने प्राचार्यांकडे नेऊन दिली प्रमाणिकपणे. मला मेसेज करून त्याने हे सांगितलं तेव्हां मला खूप अभिमान वाटला त्याचा. 
    अशीच एक विद्यार्थिनी. तिने माझी गळ्यातली माळ (खोटीच होती) चोरली. तिला ओरडले. मग समजून सांगितलं. तिला ती माळ बक्षीस दिली. तिला इतका आनंद झाला; तिने परत कधीच चोरी केली नाही. अजूनही कधीतरी प्रेमाने मला भेटायला येते. 
    प्रेम आणि आकर्षण यातला फरक न कळणारे अनेक विद्यार्थी असतात. शिकवता शिकवता त्यांना त्यातला फरक आम्ही सांगतच असतो. नुकत्याच जन्माला आलेल्या मुलाला आपण चालायला लावत नाही. त्यासाठी त्याच्या पायात ताकद यायला पाहिजे. तसंच या वयाचं असतं. हे वय करिअरचं आहे. शिक्षणाचा टप्पा महत्त्वाचा आहे. प्रेमामुळे पोट भरत नाही. पोट भरण्यासाठी शिक्षण, नोकरी, व्यवसाय आवश्यक आहे. पण, तरीही ‘सोळावं वरीस धोक्याचं’ म्हणतात ना, तसं होतं. अनेक मुलं-मुली प्रेमात पडतात. अभ्यास होत नाही. पालक समजून घेत नाहीत. नैराश्य येतं. पालकांनी जर त्यांना समजून घेतलं, मुळात त्यांचं प्रेम स्वीकारलं, त्यांच्यावर विश्‍वास ठेवला तर त्या मुलांना दुसरीकडे आधार, संवाद शोधायची गरज उरणार नाही. सुसंवाद ठेवला तर खोटं बोलणं, लपवणं, पळून जाऊन लग्न करावसं वाटणं, असं काही होत नाही. म्हणून त्यांना समजून घेतलं पाहिजे. 


    या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांमध्ये येणारं नैराश्य. मुलं आपलं घर सोडून शहरात जातात तेव्हां येणारं न्यूनगंड. आपल्याला इंग्रजी येत नाही. आपण हुशार नाही. आपण दिसायला चांगले नाही. प्रेमात मिळालेला नकार. हळूहळू अशा एक ना अनेक गोष्टींची भर पडत जाते. पालकांना त्यांचे प्रश्‍न समजून घेता येत नाहीत. (खरंतर पालकांना वाटत असतं की, आपण त्यांना खूप चांगले समजून घेतोय. पण, प्रत्यक्षात समजून सांगताना ते स्वत:चीच मतं त्यांच्यावर लादत असतात.) नैराश्याच्या गर्तेत हळूहळू विद्यार्थी इतका जातो की, मग शेवट तर ठरलेलाच; आत्महत्या!
    मग आपण त्यांना वाचवू शकतो का? अर्थातच हो. विद्यार्थ्यांशी सुसंवाद ठेवा. त्यांचे निर्णय त्यांना स्वत:ला घेऊ द्या. त्यांच्या निर्णयाच्या चांगल्या-वाईट बाजू फक्त दाखवून द्या. त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करा. त्यांच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा द्या. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. तू एकटा नाहीस. तो आपोआपच नैराश्यातून बाहेर येईल. 
    मला एकदा रात्री दीड-दोन वाजता एका विद्यार्थ्याचा मेसेज आला की, मला जगावसं वाटत नाही. मग जवळजवळ पहाटेपर्यंत मी त्याच्याशी चॅट करून त्याला गुंतवून ठेवलं. समजूत घालत राहिले. त्याला त्यापासून परावृत्त करत राहिले. अगदी पहाटेच त्याच्या शेजारी राहणारे एक शिक्षक माझ्या ओळखीचे होते. त्यांना फोन करून कल्पना दिली. त्या मुलाच्या आई-वडिलांना निरोप द्यायला सांगितला. त्याला काही दिवस एकटं सोडू नका, असं सांगितलं. तुम्हाला हे समजलंय असं त्याला जाणवू देऊ नका. जणू काही घडलंच नाही असं त्याच्याशी वागा. यामुळे काय झालं, की पालकांचं त्याच्यावर लक्ष राहिलं. संवाद राहिला. तो वाईट प्रसंग टळला. आता तो छान शिकतोय. छान अभ्यास करतोय. 
    थोडक्यात काय, तर आपल्याला आपलं मूल महत्त्वाचं आहे. त्याचे मार्क्स, करिअर महत्त्वाचं नाही. त्याला समजून घ्या. सुसंवाद ठेवा. आणि हो, समजा प्रश्‍न वाढत चाललाय, तुमच्या समजावण्याच्या पलिकडचा होतोय, असं वाटलं तर जरूर समुपदेशकाचा सल्ला घ्या. 

~शुभदा कावळे

Leave your comment