अक्षता पडण्यापूर्वी...    एक नवविवाहित जोडपं. लग्न होऊन केवळ दोन महिने झाले होते. दोघंही इंजिनीयर. दोनच महिन्यानंतर पाळी चुकली तिची. तिने घरीच झीशसर-पशुी वापरून खात्री केली आणि खूप नाराज झाली. इतक्या लवकर तिला ही जबाबदारी नको होती. अजून तर सासरच्या सगळ्यांची नीटशी ओळखदेखील झालेली नव्हती. नोकरीत देखील ती अजून नीट रूळली नव्हती. तिने नवर्‍याला सांगितलं, आणि झालं! लगेच त्याने त्याच्या आईला सांगून टाकलं. त्याची आई एकदम खूश. तिनं सुनेला काही बोलूच दिलं नाही. ‘डॉक्टरांकडे नेऊन आणते म्हणाली’ अन् सगळी सूत्रं हातात घेतली. सून बिचारी भिडस्त होती. दोघी माझ्याकडे आल्या तेव्हा सासूने अधिकारवाणीनं सांगितलं ‘गर्भ वाढावानी, यासाठी औषध द्या. आधीच हिचं वजन भलतंच कमी आहे.’ इंजिनीयर असणारी ती पोरगी गप्पच होती.
    आता या मुलीला नववा महिना आहे. त्या मुलीच्या चेहर्‍यावर दर तपासणीच्या वेळी स्पष्टपणे मला वाचता येतं, की हे मातृत्व तिच्यावर लादलं गेलेलं आहे. पण जे मला वाचता येतं, ते तिच्या सासूला, नवर्‍याला कळलं नसेल का? इतरांच्या इच्छेनुसार तिने ‘आई’ व्हायचं आहे. तिच्या मनाचं काय? लग्न झाल्यावर चट्कन गर्भधारणा होणार्‍या बर्‍याच मुलींची अशीच कोंडी होते. नोकरी नवी, संसारही नवा अन् त्यातच तिसरी मातृत्वाची जबाबदारी येऊन पडते. किती वेगवेगळ्या पातळ्यांवर स्वत:च्या मनाशी, अवतीभवतीच्या जगाशी आणि कुटुंबाशीदेखील त्यांना जुळवून घ्यावं लागतं. त्याची नीटशी आणि सखोल जाणीव कुणालाच नसते. ही मोठी शोकांतिका आहे. सगळ्यांना वाटतं, इतकं छान, पट्कन बाळ होतंय् तर काय नखरे करायचे मुलीने? उगीच हा गर्भ काढला आणि पुन्हा अडचणी आल्या तर? उगीच दवाखान्याच्या चकरा करत बसायचं? हा विचार त्या मुलीच्या गळी उतरवला जातो. तिचा ‘व्यक्ती’ म्हणून कुणीच विचार करत नाही. नवरा तर सगळ्या गोष्टी आईच्या हाती देऊन मोकळा होतो. उत्साहाने सुनेला दवाखान्यात नेणारी सासू- समाजाच्या नजरेत थोर ठरते. सुनेची काळजी घेणं, बाळ होणार म्हणून सगळ्यांनी खूश होणं... हे सगळं चांगलं असतं, तरीही सुनेच्या इच्छेचा विचारच केला जात नाही हे चूक नाही का? अशा अनेक मुली मी पाहते, दुर्बळ निर्णयक्षमता असणार्‍या आणि विशेष म्हणजे आधी थोडासा विचार केला असता, नीट नियोजन केलं असतं तर हे सगळं टळलं असतं हेदेखील मनात येऊन जातं. लग्न ठरल्यानंतर कोणतीही शिक्षीत स्वावलंबी शहरी तरूणीसुद्धा डॉक्टरकडे जाऊन विवाहपूर्ण सल्ला घेत नाही. तिच्या मनात देखील हा विचार येत नाही, हेच आश्‍चर्याचं वाटतं मला. जिचं लग्न दोन-तीन महिन्यांवर आलेलं आहे, अशी मुलगी ब्युटी पार्लरमध्ये, साड्यांच्या दुकानांमध्ये, ब्लाऊज शिवणार्‍या शिंप्याकडे (आजकालच्या भाषेत बुटीकमध्ये) भरपूर वेळ घालवणं. कारण, तिला लग्नात ‘हटके’ दिसायचं असतं. पण याच मुलीच्या किंवा तिच्या आईच्या मनात असा विचार येतच नाही, की लग्नानंतर हवं तेव्हाच मूल व्हावं यासाठी मी कसं नियोजन करावं, हे समजावून घेण्यासाठी डॉक्टरकडहीे जायला हवं. विवाहपूर्व समुपदेशन किंवा सल्ला खरं म्हणजे खूपच मोलाची गोष्ट आहे. परंतु, समाजाला याचं महत्त्व अजून फारसं पटलेलं नाही.
    लग्नापूर्वी केस रंगवणं, केसांच्या वेगवेगळ्या स्टाईल आणि मुख्य म्हणजे तिचा पोशाख, आणि एकूण लुक यावर भरपूर चर्चा केली जाते. ज्या मुलाशी आयुष्यभर संसार करायचा आहे, त्याच्यासोबत होणार्‍या पहिल्या मीलनासाठी ही मुलगी स्वत:च्या त्वचेचं polishing करून घेते, केसांचे रंग बदलून घेते, अंगभर मेंदी आणि गोंदण करून घेते. त्यासाठी तास न् तास घालवते. मला एक नाजूक प्रश्‍न पडतो, ज्याच्याबरोबर सबंध आयुष्य काढायचं आहे त्यालाच पहिल्यांदा भेटताना या मुलींना स्वत:ला इतकं बेगडी स्वरूपात का बरं सादर करावं वाटत असेल? फॅशन किंवा ट्रेन्डच्या किती आहारी जायचं याला काही मर्यादा!! लग्न हे दोन मनांचंदेखील मीलन नव्हे का? अशा निष्फळ गोष्टींत वेळ घालवण्यापेक्षा ही मुलगी नवर्‍याचा स्वभाव, सवयी, ध्येय, स्वप्नं यांची ओळख का बरं नीट करून घेत नाही? स्वत:च्या आयुष्यातील स्वप्नांची, ध्येयांची, विचारांची त्याला का ओळख करून देत नाही? लग्नापूर्वीची यांची चर्चा केवळ एकमेकांना आपले फोटो पाठवून, प्रशंसेची उधळण करण्यापर्यंतच जाऊन का थांबते?
    आईवडील देखील असा विचार करत नाहीत, की डॉक्टरांचा विवाहपूर्व सल्ला घ्यायला हवा. मुलाच्या आणि मुलीच्या पालकांनी खरोखरच हा विचार केला पाहिजे. पती-पत्नीचे शरीरसंबंध हाच विवाहाचा मूळ पाया आहे. याबाबत संकोच करीत सर्वजणच त्याबद्दल एक मौन बाळगतात आणि दुर्दैवाने मुला-मुलीत या संबंधाने काही प्रश्‍न, अडचणी निर्माण झाल्या तर हे जोडपं घुसमटत रहातं. पण, कुणाशी बोलत नाही अन् सल्लाही घेत नाही. छोटे प्रश्‍न मग पुढे मोठे स्वरूप धारण करतात आणि वरवर सुखी समाधानी दिसणार्‍या घरात वादळाची सुरूवात व्हायला लागते. एका बाजूला आधुनिकता स्वीकारलेले हे सर्व लोक, लग्नाच्या समारंभातील अत्यंत आधुनिक पेहरावातलं सर्वांचं मनमोकळं वागणं, शहरातील लग्न समारंभाचं अनुकरण गावपातळीपर्यंत पोहोचतं. जसं पार्लसमध्ये जाणं, लग्नात सर्वांनी गाणी-नृत्य यात सहभाग घेणं, जेवणाची बुफे पद्धत स्वीकारणं अशी भरपूर यादी आहे. मग याच आधुनिकतेची, नवतेची कास धरून विवाहपूर्व समुपदेशन किंवा सल्ला का बरं घेऊ नये? आणि लग्नानंतर देखील पती-पत्नीच्या संबंधात काही अडचणी आल्या तर त्यांनी विवाहविषयक समुपदेशकांकडे (sex-counsellors) का बरं वेळीच जाऊ नये?
    पण, दुर्दैवाने आजदेखील विवाहपूर्व सल्ला घेण्यासाठी कुणीच येत नाही. मुली असादेखील विचार करत नाहीत, की आपली आई अनेकदा उदास दिसते, कधी आई-वडिलांमध्ये एक तटस्थ अबोला असतो, कधीकधी आई डोळ्यातलं पाणी लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करते. मग संसार म्हणजे नेमकं काय गं आई? असं का त्या आईला विचारत नाही? आई मुलीला लग्नापूर्वी चार शब्द सांगत असते. पण ते कोणते, तर मोठ्या माणासांचा मान ठेवावा, सगळ्यांचं मन सांभाळावं. इतकंच, सरधोपटपणानं सांगते आई हे सगळं. सासरी जाणार्‍या मुलीच्या मनाचं काय? मुलांच्या लग्नापूर्वी त्याच्या घरी असा एखादा तरी संवाद होतो का, जिथे त्या घरातली सगळी मंडळी मिळून असा विचार करतात का, की उद्यापासून आपल्या घरात एक नवी सदस्य येणार आहे. आपल्या घरात तिने नीट रूळावं, हे घर तिला आपलं वाटावं यासाठी आपण सगळे तिच्याशी कसे वागणार आहोत? आपल्या आवडी-निवडी, आग्रह यांना आपण थोडी तरी मुरड घालणार आहोत की नाही? मला वाटतं, नवरा मुलगा असा विचारदेखील करतो आणि त्याच्या घरच्या लोकांनाही असे काही विचार स्पर्शून जातात, असं एखादं दुसरंच अपवादात्मक उदाहरण सापडू शकतं केवळ. अन्यथा, मानपान, धुमधडाका, हौसमौज, प्रतिष्ठा, यापलीकडे कुठला विचारच होत नसावा. लग्न म्हणजे हल्ली एक उत्सव- आजच्या भाषेत र्एींशपीं झाला आहे. आता मुली पूर्वीसारख्या अबोध, अडाणी नसतात. परावलंबी नसतात. त्यामुळे सासरी सगळंच त्या निमूट सहन करतीलच अशी फाजील अपेक्षा कुणी ठेवू नये. त्यांना सक्षमता, स्वातंत्र्य हे सारं कळतं आहे. पूर्वीचे संसार स्त्रियांच्या त्यागावर, समर्पणावर, अन्याय सोसत निमूट जगण्याच्या ताकदीवर टिकत होते. सध्या मुली पराकोटीची सोशिकता दाखवणं शक्य नाही अन् योग्यही नाही. त्या व्यक्ती म्हणून समाजाकडून सन्मानाची अपेक्षा करतात, कुटुंबाकडूनही करतात. हे रास्तच आहे. आणि म्हणूनच विवाहपूर्व वैचारिक देवाण-घेवाण पुरेशा गांभीर्याने होणं अतीव गरजेचं आहे. दोन्ही घरच्या पालकांनी, वधू-वरांनी आपापल्या अपेक्षा, विचार परस्परांसमोर स्पष्ट मांडायलाच हवेत. 
    एक मुलगी प्रसुतीसाठी आली होती. सिझेरीयन झालं. त्यामुळे सात दिवस ती माझ्या हॉस्पिटलमध्ये होती. पाचव्या दिवशी माझ्या तपासणी कक्षात येऊन बसली. बोलायचं आहे, म्हणाली. तिने जे सांगितलं, ते मला थक्क करणारं होतं. तिचा नवरा तिला बळजबरीने पोर्न व्हिडीओज दाखवत असतो आणि त्यातल्या बायांप्रमाणे तिला अनैसर्गिक गोष्टी करायला लावत असतो. तिला किळस येते, भीती वाटते, ती रडते. कधीकधी असह्य होऊन बेशुद्ध होते. तरी तिच्या नवर्‍याला कसलीही खंत वाटत नाही. अशातच गर्भ राहिला अन् ती माहेरी आली. पुन्हा तिकडे जायचं या कल्पनेनेच तिच्या अंगावर काटा येतो आहे. सांगता सांगता ती अनावर होऊन स्फुंदून स्फुंदून रडत होती.
    आंतरजालाच्या इतर सुविधांपेक्षा हे पोर्नोग्राफीचं जग सर्वांसाठी अष्टौप्रहर खुलं आहे. हे फारचं भयंकर आहे. त्यामुळे तरूण-तरूणींच्या संभोगाबद्दल काहीतरी अवास्तव कल्पना होऊन बसतात आणि पती-पत्नींच्या एका अत्यंत तरल नाजूक चिरस्थायी नात्याचा विचका होऊन जातो. त्यामुळे, कधी नव्हे इतकी आजच्या काळात sexologists च्या मार्गदर्शनाची, सल्ल्याची गरज निर्माण झाली आहे. मार्गदर्शन देण्यासाठी आणि स्त्रीपुरूष नात्यातील ताणतणाव सोडवण्यासाठी तज्ज्ञांची मुबलकता असून-देखील अनेक जोडपी मूक राहून ताण वाढवून घेत आहेत. वेळेवर आणि योग्य व्यक्तीकडे जाण्यासाठी त्यांचं पाऊल उचललं जात नाही. अनेक युवकांना, आपलं काही चुकतंय याचीच जाणीव नसते. पुरूषी वर्चस्व देखील जाणवतं. स्त्रीलाच दोष देण्याची वृत्ती तर असतेच. काही मोजक्या, दुर्मिळ उदाहरणांमध्ये असं होतं, की मुलगी जरा जास्तच आधुनिकतेने वागते, नको तितकी मोकळ्या विचारांची असते आणि मुलगा मात्र जरासा पारंपारिक, बुजरा असा असतो. अशाही जोडप्यांमध्ये विसंवाद होतो. इच्छा, तिचं लैंगिक समाधान किंवा स्पष्टच सांगायचं, तर मुळात संभोग या शब्दाचा अर्थच आहे, ‘सम-भोग’. हेच अजून खूपशा पुरूषांना कळत नसतं. हे नातं स्त्रीला देखील समाधान देणारं, तृप्ती देणारं, तिला स्वस्थता देणारं असावं, याचा विचार नव्वद टक्के पुरूष करतच नाहीत.
    स्त्रीचं प्रेम मनाकडून शरीराकडे प्रवास करतं. हळूहळू ते चरमसीमा गाठतं. पुरूषाचं प्रेम हे सरळ सरळ आक्रमक, शरीराकडून जात संपणारं असतं. स्त्रीला फुलवण्यासाठी थोडासा अवधी लागतो. मुळात तिला शब्दांनी, वागण्यातील हळूवारपणाने, थोडासा व्यक्ती म्हणून सन्मान देत बोलतं केलं, मनमोकळा संवाद केला, तर ती हळूहळू संभोगोत्सुक होते. स्पर्शसंवाद तर फारच परिणामकारक असतो. स्पर्शातून देह फुलत जातो. अन् मग स्त्री-पुरूष दोघांनाही अशा संबंधातून पूर्ण तृप्तीचा आनंद मिळतो. हे सगळं पुरूषांनी समजून घ्यावं. केवळ ‘गुगल सर्च ने’ सगळी उत्तरं मुळीच मिळत नसतात. अनुभव आणि त्या विषयातलं शास्त्रशुद्ध ज्ञान, कौशल्य या सगळ्या गोष्टी डॉक्टरच तुम्हाला नीट सांगू शकतात. कितीही थाटात आणि झगमगाटात विवाह झाला तरी खर्‍या अर्थाने विवाह यशस्वी व्हायचा असेल तर विवाहपूर्व सल्ला घेणं ही एक अगत्याची आणि महत्त्वाची सवय समाजाला लागली तर ‘नांदा सौख्यभरे’ हा आशिर्वाद शंभर टक्के खरा होईल.

~डॉ. वृषाली किन्हाळकर

Leave your comment