माणसाने तर देवही बदलले आहेत !    आज ‘इस्लामी दहशतवादाला उत्तर’ म्हणत उभ्या राहिलेल्या हिंदुत्ववादी दहशतवाद्यांकडे कानाडोळा करणं समाजाला महागात पडेल. सिमी, एमआयएम वा इसिस यांच्यासारख्या संघटनांना मुस्लिम समाजातील मूठभरांचा पाठिंबा असतो (अन्यथा मुस्लिम लीग खूप मोठा पक्ष झाल्याचं दिसलं असतं!) आणि बजरंग दल, श्रीराम सेना यांनाही मूठभर हिंदूंचाच पाठिंबा असतो. पण, दोन्हीकडचे मूठभर दोन्हीकडच्या संपूर्ण समाजाचा कब्जा करून आपले तथाकथित धार्मिक व्यवहार संपूर्ण समाजावर लादू पाहतात.
    शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यातील ऐंशी टक्के शेतकरी हे हिंदू असतात; तेव्हा त्यांच्या आत्महत्यांमुळे या तथाकथित हिंदू रक्षकांच्या भावना दुखावल्याचं कधी ऐकिवात नाही. भारतातील महिला पाण्यासाठी सरासरी अडीच किलोमीटर चालते, आणि त्यात ऐंशी टक्के हिंदू स्त्रियाच ही पायपीट करतात, यावर कधी त्यांच्या भावना दुखावत नाहीत. देशात आज ‘सेक्युलर’ हा शब्द शिवीसारखा वापरणं हा एका सांस्कृतिक संघटनेचा रोजचा अजेंडा झालेला आहे. मात्र वास्तव हे आहे की, हिंदूंमधील निम्मी लोकसंख्या असलेल्या स्त्रियांना जेव्हा सती म्हणून सक्तीने जाळलं जात होतं, तेव्हा सतीची चाल बंद करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांच्यासारखा सेक्युलर माणूसच जन्मावा लागला! हिंदू हितरक्षक म्हणून त्या वेळी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही तथाकथित सांस्कृतिक संघटनेने बायकांना सती जाण्यापासून परावृत्त केलं नाही. उलट धर्माचार म्हणून सती जायला प्रोत्साहित केलं!
    जगभरातील धर्मवादी संघटनांनी धर्माला विकृत करून लोकांच्या मनात धर्माची भीतिदायक प्रतिमा उभी केली आहे. मध्ययुगात माध्यमं नव्हती, शिक्षण नव्हतं म्हणून हे चालून गेलं. आताच्या युगात शास्त्रीय माहिती सहज उपलब्ध असल्याने लोक चिकित्सा करतात आणि मग मुळात धर्मालाच नाकारतात! भारताच्या जनगणनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत तब्बल २९ लाख लोकांनी आपला धर्म ‘निधर्मी’ असल्याची नोंद केली. ही सुरुवात आहे. यापुढे धार्मिक उन्माद वाढवणार्‍या सर्व शक्तींविरोधात लोकांमध्ये जावं लागेल, आणि लोकांना काय चाललं आहे, यावर जागं करावं लागेल. हा लढा सुरुवातीला या धर्मातील कट्टर विरुद्ध त्या धर्मातील  कट्टर,  असा असल्याचं भासत असलं तरी अंतत: हा लढा सर्व धर्मातील कट्टर विरुद्ध निष्पाप सामान्य जनता असाच असतो. धार्मिक उन्मादाला नेस्तनाबूत करण्याची ताकद लोकशक्तीमध्येच आहे. त्या शक्तीला सर्व थरातून जागं करण्याची वेळ आता आलेली आहे.


    जेव्हा शिकार करणं हा माणसाचा प्रमुख व्यवसाय होता, तेव्हा माणसानं आपला देव मल्हार बनवला. कुत्रा आणि घोडा हे त्याचे आवडते प्राणी आहेत, जे त्याला शिकारीसाठी उपयुक्त होते. तो जेव्हा शेती करू लागला, तेव्हा त्यानं शंकराला आपला देव बनवला. नंदी हे त्याचं आवडतं वाहन झालं. बैल हा त्याला शेतीसाठी उपयुक्त प्राणी होता. जेव्हा माणूस समूह करून जगू लागला, तेव्हा समूह-प्रमुख आला, त्यातूनच राजा आला. तेव्हा माणसानं विष्णू हा देव निर्माण केला. या विष्णूचा सगळा थाट राजेशाही आहे. राजाला राजवाडा असतो म्हणून या विष्णूलाही देवळाच्या रूपाने मोठा महाल, त्याला द्वारपाल वगैरे थाट सुरू झाला.
    आता माणूस एकीकडे लोकशाहीच्या मार्गाने पुढं चाललाय आणि दुसरीकडे विज्ञानाच्या मार्गाने! आजचा समाज आपला देव यापैकी कशातून निर्माण करून घेणार आहे, हा माझ्या निरीक्षणाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे संशोधन करताना सर्वसामान्य माणसाच्या देवाच्या गरजेचं पुरेपूर भान मला आहे. ही चर्चा सुरू झाल्यापासून कॉम्प्युटरला गणपती मानून त्याच्यासमोरच्या ‘माऊस’चं अस्तित्व मानण्याच्या बातम्या ऐकून खरोखरच यानंतरचा देव कसा निर्माण होणार आहे, हा मलाही उत्सुकतेचा विषय वाटू लागला आहे.
    कुठलंही संशोधन हा स्वल्पविराम असतो; पूर्णविराम नसतो! नवं सत्य समोर आलं की, संशोधनाच्या क्षेत्रात नवी-नवी विधानं केली जातात. संशोधन क्षेत्र प्रवाही असल्यामुळे हे घडत असतं. जुनं खोडून नवं मांडणं, नवे शोध लागले, की तेही खोडून पुन्हा नव्याने दिसलेलं सत्य मांडणं हेच या क्षेत्राचं बलस्थान आहे. या क्षेत्रात केलेल्या विधानाकडे समग्रपणे बघणं आवश्यक असतं. तंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या मानसिकतेचा दोष विज्ञानावर टाकण्यापेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोनच माणसाला सहिष्णूतेच्या तत्वज्ञानाकडे नेणारा आहे. त्यासाठी पूर्वग्रहदूषित मन आधी स्वच्छ करायला हवं.
    थोडक्यात काय, परिवर्तनशीलता हा निसर्गाचा स्थायीभाव असेल, तर माणसानेही त्या परिवर्तनशीलतेशी जोडून घेतलं पाहिजे. म्हणजेच जमान्याबरोबर बदलत राहिलं पाहिजे. कारण जुन्या काळातील रूढी-परंपरा त्याकाळी जरी योग्य असल्या, तरी काळानुरूप त्यात बदल होणं आवश्यक असतं. नाहीतर ‘शरीराने जगायचं २१ व्या शतकात आणि मनाने असणार १६ व्या शतकात’, अशी द्विधा मन:स्थिती होते; आणि जगणं दु:खदायक होतं. त्याचे परिणाम आज हरघडीला आपल्याला दिसताहेत. जो माणूस  विचारांच्या आधारे या चौकटी भेदतो, तोच समाजातील शोषण, कर्मकांड आणि कुप्रथांना पायबंद घालू शकतो. म्हणून ज्याचं अस्तित्व मानवी पंचेंद्रियांना जाणवत नाही, आणि सगळीकड़े एकसमयावच्छेदेकरून समान गुणधर्म व परिणाम दाखवत नाही, ती गोष्ट अस्तित्वात नाही असं त्याला ठामपण ेवाटत असतं. हा ठामपणा त्याला वैज्ञानिक पध्दतीने विचार केल्यामुळे आलेला असतो. या वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे त्याच्या डोक्यात सतत ‘असंच का? आणि तसंच का?’ असे प्रश्न पडत राहतात. तो त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रयत्नांचं यश म्हणजेच आजवर लागलेले नवनवे शोध... आजची प्रगती. म्हणूनच वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणं हा जीवन समृध्द करणारा अनुभव आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

~जगदीश काबरे

Leave your comment